बँकेच्या कर्जाचा तगादा थेट आईच्या दारात; पीडित महिला आणि कुटुंबीयांची पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली माहिती
व्हीएस न्युज - बँकेच्या कर्जवसुलीच्या नावाखाली एका ५९ वर्षीय महिलेला वारंवार फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ, चारित्र्यहनन आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी (दि.२१) पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संबंधित महिलेचा मुलाच्या कर्जव्यवहाराशी थेट संबंध नसतानाही तिला, तिच्या पतीला, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना धमकावण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सांगवी परिसरातील समता नगर येथे राहणाऱ्या एका ५९ वर्षीय महिलेने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ पासून अनोळखी मोबाइल क्रमांकावरून वारंवार फोन करून त्यांच्याशी अश्लील भाषेत संवाद साधण्यात आला. त्यांच्या चारित्र्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. तसेच पती आणि मुलालाही शिवीगाळ करून धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे.
२४ ऑक्टोबर रोजी पुन्हा फोन करून मुलाने बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरले नसल्याचा जाब विचारण्यात आला. पैसे न भरल्यास घरी येऊन मारहाण करण्याची तसेच कुटुंबीयांना त्रास देण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारानंतर महिलेचा मुलगा आनंद कर्नावट याने पुण्यातील लॉ कॉलेज रोड येथील येस बँकेच्या कर्ज विभागात जाऊन कर्जासंदर्भात चौकशी केली. बँकेतील व्यवस्थापक दत्ता कणसे आणि रोहित भोगरिया यांच्याकडे चौकशी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही धमकीचे फोन सुरूच राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
महिलेचा दुसरा मुलगा निखिल कर्नावट यानेही संबंधित अनोळखी व्यक्तीविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यालाही पैशांची मागणी करून धमकावण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात येस बँकेचे मालक,चालक आणि व्यवस्थापक यांची भूमिका तपासण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. संबंधित व्यक्ती बँकेचा कर्मचारी आहे की कर्जवसुली एजंट, त्याला कर्जदाराच्या कुटुंबीयांचे मोबाइल क्रमांक कोणी दिले आणि बँकेच्या वसुली प्रक्रियेत त्याची नेमकी भूमिका काय आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
कर्जवसुलीच्या नावाखाली एका वयस्कर महिलेला अश्लील शिवीगाळ करणे, तिच्या पतीचा आणि नातेवाईकांचा अपमान करणे, मित्रमंडळींना फोन करण्याची धमकी देणे, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
केवळ अनोळखी मोबाइलधारकाविरोधात कारवाई न करता संबंधित येस बँकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि वसुली एजंटचीही चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेत कर्नावट परिवाराकडून करण्यात आली.
पोलिसांच्या तपासाकडे लक्ष
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक रोहित अजय पाटील यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
संबंधित मोबाइल क्रमांकाचे कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल्स, बँकेतील कर्जवसुली विभागाची माहिती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांची चौकशी करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली.
कर्जवसुली करायची म्हणून महिलांचा सन्मान आणि कुटुंबाची प्रतिष्ठा पायदळी तुडवण्याचा अधिकार कोणालाही नाही. या प्रकरणात पोलिस संबंधित बँकेवर गुन्हा दाखल करणार का असं सवाल उपस्थित होत आहे.
