व्हिएस न्युज - भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (२६ नोव्हेंबर) पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान दौड’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिंचवडमधील क्रांतिकारकांच्या स्मारक परिसरातून निघालेली दौड पिंपरीतील भीमसृष्टी येथे पोहोचली. या दौडचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘संविधान ज्योती’च्या साक्षीने उपस्थितांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जपण्याचा संकल्प केला. यावेळी संविधान ज्योतीचे सर्वच मान्यवरांना आकर्षण होते. प्रत्येकाला ही 'संविधान ज्योत' हाती घेण्याची तीव्र ईच्छा यावेळी पाहायला मिळाली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही दौड आयोजित करण्यात आली. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. चिंचवड येथील क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे स्मारक आणि वासुदेव बळवंत फडके स्मारक परिसरातून दौडला प्रारंभ झाला. तेथून पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भीमसृष्टीपर्यंत मार्गक्रमण केले.

यावेळी आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे आणि उमा खापरे, महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे आणि माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांच्यासह संविधान ज्योत मानकरी रोहित हिंगे, सचिन सवणे, दिपक निकम, विशाल भालेराव, नितीराज जगताप, रूपेश सोनवणे, विकास जगताप, कृष्णा शिंदे, उमेश जाधव, गिरीश वाघमारे आदी उपस्थित होते.
संविधान दिनाच्या उपक्रमासाठी १५ लाखांची मंजुरी
संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर रवि लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या उपक्रमासाठी १५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. डॉ. सुहास कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘संविधान ज्योती’च्या माध्यमातून संविधानातील मूल्ये दैनंदिन आचरणात आणि सामाजिक जीवनात जपण्याचे आवाहन करण्यात आले. 'संविधान सन्मान दौड'ला मिळालेला प्रतिसाद पाहता, दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जाईल आणि संविधान ज्योत त्याचे प्रमुख आकर्षण राहील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
“संविधान दिनानिमित्त नागरिकांनी एकत्र यावं आणि न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्यं आपल्या रोजच्या वागण्यात कशी जपता येतील, याचा विचार करावा, या उद्देशाने 'संविधान सन्मान दौड' आणि 'संविधान सन्मान ज्योत'ची संकल्पना मांडली. या दौडमधील ‘संविधान ज्योत’ आपल्याला त्या जबाबदारीची आठवण करून देते. पिंपरी-चिंचवडकरांनी पहिल्याच वर्षी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद झाला. संविधानाच्या सन्मानासाठी शहराने दरवर्षी असंच एकत्र यावं, ही अपेक्षा आहे.”
- डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
