संविधानाच्या सन्मानासाठी चिंचवड ते भीमसृष्टी धावले पिंपरी-चिंचवडकर!
आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा संयुक्त उपक्रम; ८५ वर्षीय अशोक बेलापूरकर यांचा उत्स्फूर्त सहभाग ठरला आकर्षण

व्हिएस न्युज - भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी सकाळी ‘संविधान सन्मान दौड’चे आयोजन करण्यात आले. आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दौडमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
चिंचवड ते पिंपरीतील भीमसृष्टीपर्यंत धाव घेत सहभागी नागरिकांनी भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा जागर केला.
चिंचवड येथील क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक चौकातून सकाळी सात वाजता दौडला प्रारंभ झाला. विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत दौडचा पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीमसृष्टी येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास समारोप झाला.
या उपक्रमाला महापौर रवी लांडगे, उपमहापौर शैलजा बाबर, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले की, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करताना संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार आणि नागरिक म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये यांची जाणीव समाजात निर्माण करणे, हा संविधान सन्मान दौड आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश आहे.
संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकांपुरती किंवा एका दिवसाच्या कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत. मतभेद असले तरी एकमेकांच्या विचारांचा आदर करणे, प्रत्येकाला समानतेची वागणूक देणे आणि सामाजिक सलोखा जपणे, यातूनच संविधानाचा खरा सन्मान होईल, असेही त्यांनी नमूद केले.
८५ वर्षीय अशोक बेलापूरकर यांचा उत्साह तरुणांनाही प्रेरणादायी!
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित या दौडमध्ये पिंपरी-चिंचवडमधील ८५ वर्षीय अशोक बेलापूरकर यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. चिंचवड ते पिंपरी हे अंतर त्यांनी इतर धावपटूंच्या बरोबरीने पूर्ण केले. वयाच्या ८५व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि संविधानाप्रती असलेली बांधिलकी उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या सहभागाने या दौडला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “संविधानाचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकून घेणे आणि कोणताही भेदभाव न करता त्याचे प्रश्न सोडवणे, ही माझी जबाबदारी आहे. आज आपण संविधानाच्या सन्मानासाठी एकत्र धावलो आहोत. आता समता आणि बंधुता आपल्या रोजच्या वागण्यात जपूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हेच खरे अभिवादन ठरेल.”
– शंकर जगताप आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ
