व्हीएस न्यूज – मोठ्या प्रमाणात अनेक संघटनांनी जिल्ह्यात ‘पद्मावत’ या चित्रपटाला विरोध दर्शवला असून हा चित्रपट नंदुरबार शहरातील चित्रपटगृहात प्रदर्शित केल्यास कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयाचे नोटीस नंदुरबार शहर पोलिसांनी चित्रपटगृह मालकांना दिल्या आहेत. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मथुरे यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या २५ जानेवारीला देशभरात संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावत ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही संघटनांचा चित्रपटाला प्रखर विरोध आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या पाच दुरुस्त्या करुन अखेर मोकळा झाला आहे.
वास्तविक पाहता सेन्सॉरने परवानगी दिल्यानंतर हा चित्रपट ज्या चित्रपटगृहात दाखवला जाणार चित्रपटगृहात आणि तेथे येणाऱ्या प्रेक्षकांना संरक्षण देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. चित्रपट प्रदर्शित केल्यास काही अनुचित घडले अन् कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयांच्या नोटीस देऊन पोलीस जबाबदारीतून हात झटकू शकत नाहीत, अशी चर्चा सध्या नागरिकांत होत आहे.