व्हिएस न्यूज - छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावर अक्षरश : धुमाकूळ घातला. माओवाद्यांनी जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या तेलंगण परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळल्या असून या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचीही माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
छत्तीसगडमध्ये दोरनापाल गावाजवळ सोमवारी मध्यरात्री जवळपास १०० माओवादी सुकमा- हैदराबाद महामार्गावर आले. त्यांनी महामार्गावर तीन बसेस आणि तीन ट्रक जाळले. यातील एका बसमध्ये पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी प्रवास करत होता. माओवाद्यांनी त्याची हत्या केली. जवळपास दोन तास माओवाद्यांचा हा धुमाकूळ सुरु होता,असे समजते. शुक्रवारी तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत १० माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. माओवाद्यांच्या कॅम्पवर त्यांचे मोठे नेते असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी पुजारीकंकर जंगलात घुसून कारवाई करत माओवाद्यांना दणका दिला होता. या कारवाईचा बदला घेण्यासाठी हा हिंसाचार घडवण्यात आल्याचे सांगितले जाते.