व्हिएस न्यूज - त्रिपुरामध्ये भाजपाचा विजय झाल्यानंतर अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांच्या त्रिपुरातील पुतळ्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी बुलडोझर फिरवला. पुतळा तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून पुतळा पाडताना भाजपा कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचे दिसते. तर राज्याच्या अन्य भागांमध्येही हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्याने सत्तास्थापनेपूर्वीच पक्षासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
२०१३ मध्ये त्रिपुरात डाव्या पक्षांच्या विजयानंतर कृष्ण देवनाथ या स्थानिक कलाकाराने ३ लाख रुपये खर्च करुन लेनिन यांचा पुतळा तयार केला. या पुतळ्याची उंची ११.५ फुट इतकी होती. बेलोनिया येथे हा पुतळा होता. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक‘भारत माता की जय’ असा जयघोष करत तिथे आले. त्यांनी जेसीबी देखील आणला होता. कार्यकर्त्यांनी लेनिन यांचा पुतळा पाडला. माकपचे स्थानिक नेते तापस दत्ता म्हणाले,प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लेनिन यांचा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे शीर धडापासून वेगळे केले आणि त्याच्याशी फुटबॉल खेळू लागले. भाजपाचा डाव्या पक्षांवर असलेला राग यातून दिसतो, असा आरोप त्यांनी केला.
पोलिसांनी या प्रकरणी जेसीबी चालकाला अटक केली आहे. जेसीबी देखील जप्त करण्यात आला आहे. तर भाजपाचे जिल्हासचिव राजू नाथ यांनी या घटनेमागे भाजपा कार्यकर्त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट केले. जनतेने रागापोटी हे कृत्य केले, असे त्यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002