व्हिएस न्यूज – सरकारी तपास यंत्रणा पंजाब नॅशनल बँकेला ११,४०० कोटींचा चुना लावून विदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीविरोधात वेगाने कामाला लागल्या असून नीरव मोदीच्या विविध ठिकाणी असलेल्या संपत्ती, फार्म हाऊस, महागड्या कार जप्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी आयकर विभागानेही छापे टाकले. पण आता त्याबाबत एक नवीनच माहिती समोर येत आहे. आयकर विभागाने जप्त केलेल्या २९ संपत्तीपैकी ५ संपत्ती अशा आहेत ज्या नीरव मोदीच्या नाहीत.
आयकर विभागाने हा घोटाळा समोर आल्यानंतर सर्वांत प्रथम २९ संपत्ती आणि मोदी आणि त्याच्या नातेवाईक, मित्रांची १०५ बँक खाती गोठवली आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नीरव मोदी किंवा त्याच्या कंपनीशी मुंबई आणि दिल्लीतील किमान तीन संपत्ती संबंधित नाहीत. मोदींचे दक्षिण मुंबईतील काला घोडा परिसरातील आयटीटीएस हाऊस येथे शोरूम दिसून येते. ते शो रूम आयकर विभागाने जप्त केले आहे. पण मुंबईतील एका सेठी नावाच्या उद्योगपतीचे आणि त्याच्या कुटुंबीयाच्या याच्या मालकीचे असल्याचे समजते. सेठी हे मोदींच्या निकटवर्तीय असून काला घोडा येथील जागा त्यांनी तीन वर्षांसाठी लिव्ह अँड लायसन्सवर घेतली होती. आता याप्रकरणी सेठी यांनी आयकर विभागाकडे धाव घेतली आहे. ही संपत्ती वृज सेठी,इंदिरा सेठी आणि ज्योती सेठी यांच्या मालकीची आहे.
नीरव मोदींनी याच्या लिव्ह अँड लायसन्स करारावर सही केली आहे. हा करार तीन वर्षांसाठी होता जो डिसेंबर २०१७ मध्ये संपला. दरम्यान, नव्या रिदम हाऊस येथे हे स्थलांतर करायचे असल्यामुळे मोदींनी हा करार तीन महिन्यांसाठी वाढवला. जो मार्च २०१८ मध्ये संपणार आहे. आता सेठी कुटुंबीयांनी आयकर विभागासमोर सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. आयकर विभागानेही ही संपत्ती मुक्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002