व्हिएस न्यूज - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना संरक्षणासाठी एक नवीन बस मिळणार असून या बुलेटप्रूफ बसची किंमत सात कोटी रुपये एवढी अवाढव्य असणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर चंद्रशेखर राव हे राज्याच्या विविध भागांमध्ये जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यावेळी नक्षलवादग्रस्त भागांचा ते दौरा करणार आहेत. त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन या बसची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात तेलंगणा छत्तीसगढ सीमेवर 10नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते त्यानंतर माओवाद्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तेलंगणा रस्ते व इमारत विभाग ही बस विकत घेणार असून तिची अंदाजे किंमत सात कोटी रुपये आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.
यापूर्वी चंद्रशेखर राव यांच्यासाठी बुलेटप्रूफ मर्सिडिज-बेंझ बस विकत घेण्यात आली होती. तिची किंमत चार कोटी रुपये आहे. ती बस तीन वर्षांपूर्वी घेण्यात आली होती. चंद्रशेखर राव यांना सध्या झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असून त्यात 24 तास वैयक्तिक सुरक्षेची तरतूद आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या प्रगती भवन येथे ही बुलेट प्रूफ खिडक्या आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002