व्हिएस न्यूज - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने भारतात परतण्याची तयारी दर्शवली असून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आर्थर रोड तुरुंगात ठेवावे अशी अट त्याने सरकारसमोर ठेवली होती, असा दावा मंगळवारी ठाण्यातील न्यायालयात करण्यात आला. मात्र, सरकारने दाऊदचा प्रस्ताव अमान्य केला आणि अजूनही दाऊदला अटक झाली नाही, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.
दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला मंगळवारी ठाण्यातील जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मिरा रोडमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊद, त्याचा भाऊ इकबाल कासकर आणि अनीस हे तिघे आरोपी आहेत. कासकरच्या कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. यादरम्यान, कासकरची बाजू मांडणारे वकील श्याम केसवानी यांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली. दाऊदला भारतात परतायचे आहे. राम जेठमलानी यांनी सरकारला याबाबत माहिती देखील दिली. दाऊदने सरकारसमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र सरकारने दाऊदची मागणी फेटाळून लावली आणि त्याला अजूनही अटक होऊ शकली नाही, असे त्यांनी कोर्टात सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002