स्वाभिमानावरुन राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांना चिमटे
मुंबई
2018-03-09
व्हीएस न्यूज –तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा मिळण्याबाबत होत असलेली चालढकल पाहून ‘एनडीए’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अवघ्या वर्षभरावर २०१९ च्या लोकसभा निवडणुका आलेल्या असताना एनडीएला चंद्राबाबूंनी रामराम करणे ही मोठी घडामोड मानली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच राजकीय घडामोडीचा आधार घेत पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून शिवसेनेला टीकेचे लक्ष्य बनवले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या, ‘सत्तेतून बाहेर पडू’ या घोषणेची खिल्ली उडवली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात चंद्राबाबू नायडू यांना हातात बॅग आणि दुसऱ्या हातात एक गाठोड घेऊन घराबाहेर पडताना दाखवले असून दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमकीची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंनी यात कसला आला आहे ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावे हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन पहा, असा मार्मिक संदेश देत पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.