तलवार दाम्पत्याच्या सुटकेला सीबीआयचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नवी दिल्ली
2018-03-09
व्हीएस न्यूज - अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरुषी-हेमराज हत्येप्रकरणी डॉक्टर राजेश तलवार आणि नूपूर तलवार यांना मुक्त केल्याच्या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायदेशीरपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
हेमराज यांची पत्नी खुमकला यांनीही यापूर्वी गेल्या १६ डिसेंबर २०१७ रोजी याचिका दाखल केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा असून या प्रकरणाचा नव्याने तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नोएडामध्ये डॉ. तलवार यांच्या घराच्या छतावर हेमराजचा मृतदेह आढळून आला होता. एवढेच नाही तर तेथे रक्त आणि झटापट झाल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याची गरज आहे.
आरुषी-हेमराज हत्येप्रकरणातील राजेश आणि नूपूर तलवार हे मुख्य संशयित आहेत. २०१३ मध्ये सीबीआय न्यायालयाने या दोघांनाही हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर या दोघांनीही या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यात पुराव्याआभावी या दोघांनाही मुक्त करण्यात आले होते.