सहा वर्षांमध्ये नीरव मोदीला मिळाली १ हजार २१३ हमीपत्रे – अरूण जेटली
नवी दिल्ली
2018-03-14
व्हीएस न्यूज -पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेतून १० मार्च २०११ ला नीरव मोदीला पहिले खोटे हमीपत्र मिळाले होते. तर पुढील सहा वर्षात अशा प्रकारची १ हजार २१२ हमीपत्रे मिळाल्याची माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली.
नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांना भारतीय बँकांच्या विदेशातील शाखांमधून कर्ज मिळवण्यासाठी पीएनबीच्या कर्मचाऱ्यांकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) देण्यात आले. मोदीला एकाच दिवशी देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या पीएनबीमधून पाच वेळा देखील एलओयू देण्यात आल्याचे उघड झाले असल्याचे राज्यसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना जेटली यांनी ही माहिती दिली.
५३ खरी हमीपत्रे या सहा वर्षांत देखील देण्यात आली होती. यापैकी पहिले ५ मार्च २०११ मध्ये व शेवटचे ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये देण्यात आल्याचे जेटलींनी सांगितले. यावर्षी २३ जानेवारीला पीएनबीच्या मुख्य कार्यालयाला खोट्या कारभाराची माहिती मिळाल्यानंतर लगेच २५ जानेवारील तपास गटाने आपला अहवाल दिला. त्यानंतर २९ जानेवारीला घोटाळा झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आली आणि मुंबई सीबीआयकडे तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती जेटली यांनी दिली.