व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता मुंबईतील एका कार्यक्रमानंतर शरद पवारांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना बोलावून, त्यांच्याशी चर्चा केल्याचे फोटो समोर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनोहर जोशींच्या ‘अवघे पाऊणशे वयमान’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम दादरच्या शिवाजी मंदिरात झाला. हा कार्यक्रम संपल्यानंतर एक दृश्य सर्वांनी पाहिले आणि पुन्हा अनेक उलटसुलट चर्चा रंगायला सुरुवात झाल्या आहेत. शरद पवारांनी शिवाजी मंदिराच्या पार्किंगमध्ये शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना बोलवून घेतले आणि त्यांच्या कानात कुजबूज केल्यामुळे पवारांनी मिलिंद नार्वेकरांच्या कानात काय सांगितले असावे? याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, शरद पवारांनी या कार्यक्रमात बोलताना मनोहर जोशींची मुक्तकंठाने स्तुती केली. मनोहर जोशी यांचा छंद हा लोकलमधून प्रवास करताना, दुकानाच्या पाट्या वाचन होता. ते त्यामुळे बांधकाम क्षेत्रात येतील असे मला वाटे, अशा मिश्किल शब्दात त्यांनी जोशींच्या कामाचा गौरव केला. तसेच त्यांनी यावेळी मनोहर जोशी हे अतिशय काटकसरी व्यक्तीमत्त्व असल्याचेही सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळातील कामांना यावेळी उजाळा दिला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002