व्हीएस न्युज - पोलिसांनी पकडलेल्या वाळूचा ट्रक पळवून लावण्यात मदत केल्या प्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले. ही कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केली. या कारवाईमुळे पोलीस आयुक्तालयातील वसुली करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
विनोदकुमार अर्जुन पुजारी असे निलंबित करण्यात आलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मोटे हे दहा मार्चला रात्रीची गस्त घालत होते. पहाटे चारच्या सुमारास जुळे सोलापूरातील कुसुमराज मंगल कार्य़ालयाजवळ बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करीत असलेला ट्रक त्यांनी पकडला. पकडलेला ट्रक आणि ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई करत असताना पुजारी हा त्या ठिकाणी आला. त्याने मोटे यांना त्यांची ओळख विचारून ट्रक सोडण्यास सांगितले. तसेच आपण वाहतूक शाखेत नोकरीस असून वाळूच्या गाडीचा वसुलदार असल्याचे सांगत पकडलेला ट्रक सोडून हे प्रकरण येथेच मिटवा असेही सांगितले.
पुजारी याने त्याची दुचाकी मोटे यांच्या सरकारी वाहनासमोर आडवी लावली. या संधीचा फायदा घेत ट्रक चालकाने वाळूचा ट्रक घेऊन फरार झाला. पुजारी याच्यामुळेच ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला असल्याची तक्रार मोटे यांनी विजापूर पोलीस ठाण्यात आणि नियंत्रण कक्षात नोंदवली. तसेच या घटनेचा अहवाल वरिष्ठ अधिका-यांना सादर केला.
वरिष्ठांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून चौकशी सुरु केली. प्रकरणाची चौकशी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सकळे यांच्याकडे दिली. सकळे यांनी या प्रकरणाची चौकशी आणि तपास करुन आज (शनिवार) पोलीस शिपाई विनोद पुजारी याला निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबन कालावधीत पुजारी यांची नेमणूक पोलिस मुख्यालय तेथे असणार असून दररोज दोन वेळेस हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुजारी याने घटनास्थळी जाऊन कायदेशीर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षकांना कारवाई करण्यास मज्जाव केला. तसेच यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होईल असे वर्तन केले असल्याचे पोलीस आयुक्त तांबडे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002