दहावीच्या विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार ‘विकीपीडिया’चा आधार
व्हीएस न्यूज – दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके नुकतीच बाजारात आल्यानंतर त्याबाबत अनेक बाबी समोर येत आहेत. इंटरनेटवरील विकीपीडियाचा आधार दहावीच्या मराठी भाषेच्या कुमारभारती या पुस्तकाच्या अध्यापनासाठी घ्यावा लागणार असून मागील काही वर्षांत यातील अनेक लिंक या अपडेट न झाल्यामुळे दहावीच्या मुलांचे भविष्य आता बेभरवशी विकीपीडियावर असणार आहे.
ज्या लेखक, कवी आणि साहित्यिकांची प्रकरण कुमारभारतीच्या या पुस्तकात आहेत, शिक्षण मंडळाने त्यांच्या माहितीसाठी एका खास पानावर त्या-त्या लेखकांच्या नावासह विकीपीडियावर असलेल्या लिंकची एक यादीच दिली असून यातील माहितीचा अध्यापनात संदर्भ म्हणून वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मागील काही वर्षांत यातील अनेक लिंक या अपडेट झालेल्या नाहीत तर विकीपीडियाने अनेकांवर टाकलेली माहिती विद्यार्थी आणि शिक्षकांनाही आता खरी मानून त्याचा आधार घ्यावा लागणार आहे.
यात ज्या साहित्यिकांची लिंक देण्यात आली आहे, त्यात कवीवर्य मंगेश पाडगावकर, दुर्गा भागवत, गिरीजा कीर, वि.स. खांडेकर, अरूणा सिन्हा, अरविंद जगताप, जगदीश खेबुडकर, ना.सी. फडके आणि अरुणा ढेरे यांच्या विकीपीडियावर उपलब्ध असलेल्या लिंक येथे देण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकात दिलेली पूरक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, संकेतस्थळे आणि लिंक याचा वापर करून पाठ्यघटकांशी संबंधित अधिक माहिती मिळवावी आणि त्या माहितीचा अध्यापनात संदर्भ म्हणून वापर करावा, असे यात म्हटले आहे.
दरम्यान, पहिल्यांदाच दहावीच्या मराठीच्या या पुस्तकात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासह कोणत्याही महिला संतांना फारशी जागा मिळाली नाही तर दुसरीकडे संत रामदास आणि मोरोपंतांना मात्र जागा देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाला ग्रामीण, स्त्री साहित्याचा काही भाग असला तरी आदिवासी साहित्यांचाही यात मेळ जमवता आला नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे पूरक संदर्भ ग्रंथांच्या १७ पुस्तकांच्या यादीत संत साहित्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता याचा अपवाद सोडल्यास इतर संतांच्या साहित्यालाही संदर्भ ग्रंथांच्या यादीत डावलण्यात आले असून त्याता माधुरी पुरंदरे यांच्या २ पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002