व्हीएस न्यूज - व्हॉट्सअॅप या अग्रगण्य मेसेजिंग अॅपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी भारतीय तरुणाचे नाव आघाडीवर आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा यांची व्हॉट्स अॅपच्या सीईओपदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नीरज अरोरा हे गेल्या सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत.
व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांनी चार दिवसांपूर्वी कंपनीला रामराम ठोकला होता. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत नीरज अरोरा यांचे नाव आघाडीवर आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा हे गेल्या सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत. ते व्हॉट्स अॅपमध्ये सध्या बिझनेस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. टेकक्रंच या वेबसाईटच्या वृत्तानुसार सध्या ते व्हॉट्स अॅप चौथ्या क्रमांकावर आहेत. व्हॉट्स अॅपमधील ‘ऑल थिंग्स बिझनेस’ या विभागाचे ते प्रमुख आहेत.
नीरज अरोरा हे दिल्ली आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. पदवी घेतल्यानंतर २००६ साली त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजी केले. दिल्ली आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर ते २००० साली अॅसिलिओन या कंपनीत नोकरीला लागले. यानंतर त्यांनी टाइम्स इंटरनेट लिमिटेडमध्येही काम केले. जवळपास १८ महिने ते तिथे कार्यरत होते. याशिवाय ते पेटीमच्या संचालक मंडळातही होते. यानंतर विविध कंपन्यांमध्ये काम केल्यावर २००७ मध्ये ते गुगलमध्ये गेले. डिसेंबर २००७ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत ते गुगलमध्ये कार्यरत होते. गुगलमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंट मॅनेजर यापदावरुन ते प्रिन्सिपल कॉर्पोरेट डेव्हलपमेंट या पदावर पोहोचले. गुगलनंतर ते व्हॉट्स अॅपमध्ये रूजू झाले.
व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी अरोरा यांची नियुक्ती झाल्यास ते सुंदर पिचाई (गुगल), सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट) यांच्या रांगेत जाऊन बसतील. मात्र, व्हॉट्स अॅपच्या सीईओपदावर नियुक्ती झाल्यास अरोरा यांच्यासमोर काही आव्हाने असतील. व्हॉट्स अॅप विकत घेणाऱ्या फेसबुकवर डेटा चोरीच्या आरोपांमुळे टीका होत आहे. व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांचे बिझनेस मॉडलवरुनच कंपनीशी मतभेद झाले आणि त्यांनी राजीनामा दिला, अशी चर्चा आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002