व्हीएस न्युज - बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा मोबाईल क्रमांक दिला नाही म्हणून त्याच्या पीएला धमकी दिल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शनिवारी वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.
शेरा ऊर्फ शेरु असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याला सोमवारपर्यंत मुंबईत चौकशीसाठी आणले जाईल. शेरुविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याची करेली परिसरात प्रचंड दहशत असल्याचे बोलले जाते. दबंग अभिनेता सलमान खान हा वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. चार दिवसांपूर्वी त्याच्या पीएला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून सलमानचा मोबाईल क्रमांक मागितला होता. मात्र तो देण्यास पीएने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातच फोन करणार्याने पीएला ‘मुंबईत येऊन तुझा गेम करू’ जिवे मारण्याची धमकी दिली. तीन दिवसांपूर्वीच सलमानच्या पीएने वांद्रे पोलीस ठाण्यात तशी तक्रार केली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध 504, 506 भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी ज्या क्रमांकावरुन ही धमकी देण्यात आली होती, त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता फोन करणारा उत्तर प्रदेशातील शेरु ऊर्फ शेरा असल्याचे स्पष्ट झाले. वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने शेराला अलाहाबादच्या करेली परिसरातील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. सलमानच्या पीएला धमकावल्याची कबुलीही त्याने दिली.
शेरु हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. करेली परिसरात काही स्थानिक गुंडांची प्रचंड दहशत असून त्यात शेरुचा समावेश आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून याच मोबाईलवरून सलमानच्या पीएला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002