व्हीएस न्यूज - गुजरातमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून रोजगार निर्मितीत गुजरात कायम पहिल्या स्थानावर राहिले आहे. एकाही गुजरातील माणसाला नोकरीसाठी बाहेरच्या राज्यात जावे लागत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
जामनगर येथे झालेल्या निवडणूक प्रचार सभेत काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांचा मोदी यांनी खरपूस समाचार घेतला. मोदींच्या गुजरातमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तरुण बेरोजगार झाले आहेत, अशी टीका वारंवार काँग्रेसकडून केली जाते. या आरोपांना उत्तर देताना मोदी म्हणाले की, देशाच्या कोणत्याही कोप-यात जा आणि येथे एकतरी गुजराती माणूस रोजगाराच्या शोधात आला आहे का, असे विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल. उलट गुजरातमध्ये बाहेरील लोक रोजगाराच्या शोधासाठी येतात. त्यामुळे गुजरातमधील अनेक भागांमध्ये लघु भारत पाहायला मिळतो, असे मोदी म्हणाले.
जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे गांभीर्य काँग्रेसकडे असते, तर आज महाराष्ट्र, उत्तराखंड, मणीपूर, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून काँग्रेसला सत्ता सोडावी लागली नसती, असेही ते म्हणाले.