जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन संपन्न.
व्हीएस न्यूज - अहिंसेचे काटेकोरपणे पालन करणारा जैन समाज उद्योग, व्यवसाय, व्यापारात ज्याप्रमाणे अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. रवीवारी (दि. ६ मार्च) जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय सी. जैन, नगरसेवक नाना काटे, जयश्री गावडे, विजय जगताप, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, डॉ. अशोक पगारिया, रमणलाल लुंकड, दिलीप सोनिगरा, राहुल मुनोत, राजेंद्र धोका, सतीश खाबिया, डॉ सुहास लुंकड, राजेंद्र चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. श्रीरंग बारणे उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, संत, महात्म्यांनी सांगितलेल्या विश्वातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होण्यासाठी सांगितलेल्या मार्गावर चालणारा जैन धर्म. मनुष्य, प्राणी व वनस्पती या सर्व सजीवांमध्ये आत्मा आहे. या प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे हि संत महात्म्यांची शिकवण जैन धर्मिय आचरणात आणतात. सेवाभावी वृत्ती, दान आणि परोपकार हे जैन बंधू भगिनींचे सद्गुण इतरांना प्रेरणादायी आहेत असेही खा. श्रीरंग बारणे म्हणाले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष संजय सी. जैन यांनी मागील वर्षभरात संस्थेच्या वतीने केलेल्या सामाजिक ,सांस्कृतिक ,धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचा आढावा घेतला. स्वागत संजय सी जैन आणि सपना जैन यांनी केले. आभार संस्थेचे सचिव सचिन मुथा यांनी मानले.
व्हीएस न्यूज - कुस्ती, कबड्डी सारखे देशी खेळ माणसाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ करतात आणि त्यातूनच एक उत्तम व्यक्तिमत्व घडते. कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र प्रशिक्षण केंद्र देशात एकमेव भोसरीत उभारण्यात आले याचा आम्हाला अभिमान आहे. मागील पाच वर्षांत जी विकासकामे झाली त्या हे मोठे काम आहे. महापौर, आमदार, स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक हे अभिनंदनास पात्र आहेत. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि देशाचे तसेच भोसरीचे नाव जगात मोठे करतील असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी व्यक्त केला.
भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फडणवीस यांनी भोसरी पंचक्रोशीतील दिवंगत पैलवान व वस्ताद यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उपस्थित पैलवान वस्ताद यांचा सन्मानाने आदराने उल्लेख केला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे होत्या. प्रमुख पाहुणे भाजपा शहर अध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, प्रथम महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, पक्षनेते नामदेव ढाके, ‘ई’ प्रभाग विभाग विकास डोळस, स्थानिक नगरसेवक संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भिमाताई फुगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदींसह नगरसेवक, नगरसेविका तसेच शहरातील कुस्ती शौकीन व वस्ताद उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, भोसरी गावजत्रा मैदाना शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे भव्यदिव्य देशातील दुसरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. यापुर्वी पतियाळा येथे असे केंद्र उभारण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी ८६०० चौरस मीटरच्या जागेत ५५११ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये तळमजल्यावर पैलवानांसाठी, सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह आणि ५०० व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, ५० व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर मुख्य हॉलमध्ये आर्कषक विद्युत रोषणाईसह १२x१२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली युवा पैलवानांना सराव करता येईल यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी व्यक्त केला आहे.स्वागत आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, प्रास्ताविक स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे आणि आभार विजय फुगे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून येथे उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन कोठेही होत नसून या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. स्ट्रॉबेरीला प्राप्त भौगोलिक मानांकनाचा उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी उत्पादकांनी एकत्र येऊन पणन मंडळांच्या योजनांचा लाभ घ्यावा व एकत्रित येऊन विक्री तंत्र अवलंबवावे, असे आवाहन सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत “स्ट्रॉबेरी पीक उत्पादन, सुगी पश्चात हाताळणी, विपणन, प्रक्रिया संबंधी कार्यशाळा” भिलार ता. महाबळेश्वर येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. या कार्यशाळेस सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे प्रकल्प संचालक दिपक शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, पणनचे सह सचिव डॉ. धपाटे, कृषीचे उपसंचालक विजय राऊत, कृषी व पणन विभागाचे अधिकारी तसेच महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरची नवीन ओळख आहे. यासाठी स्व. बाळासाहेब भिलारे व येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांना आधिकाचा फायदा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या मँग्नेट प्रकल्पात स्ट्रॉबेरीचा समावेश केला आहे. मँग्नेटसाठी स्ट्रॉबेरी पिकासंबंधी महाबळेश्वर भागातील दोन संस्थांचे प्रस्ताव आहेत. या माध्यमातून स्ट्रॉबेरीच्या काढणी पश्चात हाताळणीसाठी प्रशितकरण, शीतगृह, पॅक हाउस, शीतवाहन, प्रक्रिया युनीट इत्यादी सुविधा निर्माण होणार आहेत.
मॅग्नेट अंतर्गत स्ट्रॉबेरी पिकाची शास्त्रोक्त लागवड, काढणी पश्चात हाताळणी, विक्री व प्रक्रिया यासाठी उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था व इतर घटकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिका येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रधान सचिव अनूप कुमार म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्ट्रॉबेरी उत्पादनामध्ये देशपातळीवर अग्रेसर असून महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक स्थान निर्देशन मानांकन प्राप्त झाले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी जीआय मध्ये नोंदणी करुन घ्यावी तसेच क्यूआर कोडचा जास्तीत जास्त वापर करावा. भिलार ता. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमुळे येथे ॲग्रो टुरिझम हब तयार होईल. टिश्यू कल्चर लॅब तयार करण्यासाठी कृषि विभाग, कृषि विद्यापिठे व इतर विभागाच्या सहकार्यातून प्रयत्न करण्यात येईल. स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिकेचे येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी वाचन करावे म्हणजे स्ट्रॉबेरीच्या संदर्भात अधिकाधिक माहिती मिळण्यास मदत होईल.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक पध्दतीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. पाऊस व लहरी हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाबळेश्वर येथे टिश्यू कल्चर लॅब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाबळेश्वर येथील स्थानिक बाजारपेठेसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधीची तरतूद करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येईल. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा पॉलिसी घेणेही आवश्यक आहे.
यावेळी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांच्या हस्ते स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी स्ट्रॉबेरी विक्री व प्रक्रियेसंबंधी, बाजारपेठ व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पणनचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले.
व्हीएस न्यूज - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जळगाव विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले.
यावेळी त्यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.
व्हीएस न्यूज - युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थिती बघता तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विशेष विमान आज सकाळी 9 वाजता आले. यामध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी 18 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत.
सद्या युक्रेनमधील अतिसंवेदशील परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेश गंगा’ ही विशेष मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. या अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1940’ या विशेष विमानाने 250 विद्यार्थी आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आहेत. सायंकाळी सहा वाजता पुन्हा येणाऱ्या विशेष विमानामध्ये राज्यातील 4 विद्यार्थी परत येणार आहेत.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्या वतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्य स्थळी पोहोचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
व्हिएस न्यूज - महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज (रविवार) आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच, या विभागाचे मंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर, या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत. तसेच, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणावरून भाजपाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवाय, ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं सांगितलं आहे.शिवाय परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच!पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
व्हिएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजेच येत्या 13- 14 डिसेंबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. 13 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ धाम च्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
बाबा विश्वनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उभरल्या जाव्यात, अशी पंतप्रधान मोदी यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. इथे येणाऱ्या भाविकांना कायम, अव्यवस्था, गर्दीचे छोटे रस्ते, आणि गंगेत स्नान करण्याच्या जागांवर अस्वछता याचा त्रास सहन करावा लागतो. गंगाजल घेणे आणि मंदिरात ते अर्पण करण्याच्या प्रथेच्या पालनातही त्यांना त्रास होतो. त्यामुळे, त्यांना विविध सुविधा देण्यासाठी, श्री काशी विश्वनाथ धाम, या भव्य प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे.या पवित्र प्रयत्नाची सुरुवात करण्यासाठी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या जागेवर भूमीपूजन करण्यात आले होते.
या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पंतप्रधान स्वतः देखरेख ठेवून होते, या प्रकल्पाविषयी, नियमितपणे माहिती, आढावा घेणे आणि देखरेखीचे काम त्यांनी वेळोवेळी केले. तसेच, कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रकल्पातील सुविधा सर्व भाविकांसाठी-अगदी दिव्यांगांसाठीही अधिकाधिक सहज साध्य होण्यासाठीच्या सूचना आणि सल्लेही त्यांनी वेळोवेळी दिले. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.
या प्रकल्पामध्ये श्री काशी विश्वनाथ मंदिराभोवतालच्या 300 हून अधिक मालमत्तांची खरेदी आणि अधिग्रहण समाविष्ट आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या तत्वांच्या आधारे या अधिग्रहणांसाठी परस्पर वाटाघाटी करण्यात आल्या. या प्रयत्नात सुमारे 1400 दुकानदार, भाडेकरू आणि घरमालकांचे पुनर्वसन सौहार्दपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रकल्पाच्या विकासाशी संबंधित अधिग्रहण किंवा पुनर्वसन या संदर्भात देशातील कोणत्याही न्यायालयात खटला प्रलंबित नाही हीच या यशाची साक्ष आहे.
हा प्रकल्प विकसित करताना सर्व वारसा वास्तूंचे जतन केले जावे, हे देखील पंतप्रधानांचे ध्येय होते. जुन्या मालमत्ता नष्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, 40 हून अधिक प्राचीन मंदिरे पुन्हा सापडली तेव्हा ही दूरदृष्टी उपयुक्त ठरली. या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले असून, मूळ रचनेत कोणताही बदल होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. या प्रकल्पाची व्याप्ती अशी की, हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पसरला आहे, तर पूर्वीची जागा फक्त 3000 चौरस फूट इतकी मर्यादित होती.
कोविड महामारी असूनही, प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाले आहे. वाराणसी दौऱ्या दरम्यान, पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला भेट देतील आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होतील.
14 डिसेंबर रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.
ही परिषद टीम इंडियाच्या भावनेला पुढे नेण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत प्रशासनाशी संबंधित सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची संधी प्रदान करेल.
व्हीएस न्यूज - अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) च्या सदस्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी, इतर गोष्टींबरोबरच, या दृष्टिकोनातून अधिनियमित करण्यात आलेला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध){PoA} कायदा, १९८९ ची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय १३ डिसेंबर २०२१ रोजी अत्याचाराविरोधात राष्ट्रीय हेल्पलाइन (NHAA) सुरू करणार आहे.
NHAA संपूर्ण देशभरात टोल फ्री क्रमांक १४५६६ वर चोवीस तास उपलब्ध असेल. देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाईल किंवा लँड लाईन क्रमांकावरून व्हॉईस कॉल/VOIP करून त्यावर प्रवेश केला जाऊ शकतो. ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असेल. त्याचे मोबाईल अॅप्लिकेशनही उपलब्ध असेल.
भेदभाव नष्ट करून सर्वांना संरक्षण प्रदान करणे हा उद्देश असलेल्या कायद्यातील तरतुदींबद्दल माहितीपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा या हेल्पलाइनचा हेतू आहे. प्रत्येक तक्रार प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) म्हणून नोंदवली गेली आहे, दिलासा दिला गेला आहे, सर्व नोंदणीकृत तक्रारींची चौकशी केली गेली आहे आणि दाखल केलेल्या सर्व आरोपपत्रांवर निर्णयासाठी न्यायालयात खटला चालवला जाईल - हे सर्व कायद्यातील दिलेल्या कालमर्यादेच्या आत ही प्रणाली सुनिश्चित करेल.
वेब आधारित स्वयं-सेवा पोर्टल म्हणून देखील उपलब्ध, NHAA नागरी हक्क संरक्षण (PCR) कायदा, १९५५ आणि त्याच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करेल. पीओए कायदा, १९८९ आणि पीसीआर कायदा, १९५५ चे पालन न केल्याबद्दल पीडित/तक्रारदार/एनजीओकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीसाठी एक डॉकेट क्रमांक दिला जाईल.
तक्रारदार/एनजीओना दाखल तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन जाणून घेता येईल. कोणत्याही चौकशीला IVR किंवा ऑपरेटरद्वारे हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये उत्तर दिले जाईल. ही हेल्पलाइन सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ही संकल्पना स्वीकारेल आणि तिला योग्य फीडबॅक व्यवस्था असेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ८१ वा वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले.
शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
तसेच शरद पवार हे गेली ४० वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला.
अमोल कोल्हे भाषणात पुढे म्हणाले की, देशातील कुठल्याही नेत्याला शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. भुज भूकंपावेळी शरद पवार यांची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील वाहवा केली होती, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी यावेळी करुन दिली.
तसेच जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील शिवरायांचा मावळा पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, या शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.
२०२४ नाही, त्यापुढचा विचार करा-
विचारांची लढाई उभी करायची असेल, तर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मार्गदर्शन घ्यावे. विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो की, २०२४ चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस पक्षाने सेवादल नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधींचा विचार त्यामागे होता, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - वैद्यकीय क्षेत्रातील बदल स्विकारण्यासोबतच वैद्यकीय शिक्षण विभागात आमुलाग्र बदलासाठी सर्व मिळून समन्वयाने काम करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले.
ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे (दि.१०) आयोजित पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, ससूनचे अधीष्ठाता डॉ. विनायक काळे, डॉ. मुरलीधर तांबे आदी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने केलेले काम कौतुकास्पद आहे. कोरोनाचा धोका अजुनही टळलेला नाही, त्यामुळे यापुढील काळातही आपल्याला खबरदारी घेत आरोग्य यंत्रणेसह सज्ज रहावे लागणार आहे.
ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक असून एकत्रित प्रयत्नाने कोरोनावर पुर्णपणे मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यापुढेही अडचणीतून तत्परतेने मार्ग काढण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.
वैद्यकीय सेवांचा दर्जा कायम राखला जावा, तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा देण्यासाठी काम करावे, असेही ते म्हणाले. कोरोना उपाययोजना, ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, फायरसेप्टी, सुरक्षा यंत्रणा, उपलब्ध मनुष्यबळ, उपचार सुविधा, उपचारासाठीचे विमाकवच, लसीकरण आदींचाही श्री देशमुख यांनी आढावा घेतला.
यावेळी पुणे विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांनी सादरीकरणाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत माहिती दिली.
यावेळी बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागप्रमुखांसह पुणे विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख अधिष्ठाता उपस्थित होते.
व्हीएस न्युज - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच या शासनाने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. या दोन वर्षाच्या काळात अनेक क्षेत्रात दमदार कामगिरी करून केवळ जनसेवा म्हणूनच या राज्याला अग्रेसर करण्याचे अनेक निर्णय घेतले आहेत. कोकण विभागात सामाजिक न्याय विभागातही खूप मोठे कार्य उभे राहीले आहे.
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचे संनियंत्रण सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले. या स्मारकाची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक १४ एप्रिल २०२४ पूर्वी पूर्ण उभारण्यात येणार आहे.या स्मारकाचे काम प्रगतीत आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या शहरापासून महाविद्यालयाचे अंतर ५ कि.मी.वरून वाढवून १० कि.मी. पर्यंत करण्याचा निर्णय, त्याचबरोबर आता तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात बदल करून आता वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचादेखील विचार केला जात आहे. प्रथमच योजनेचा कोटा १०० टक्के पूर्ण. फाईन आर्टस्, फिल्म मेकिंग या विषयांचा समावेश करून आणखी ५० जागा वाढविणे प्रस्तावित आहे. परदेश शिष्यवृत्ती २०२०-२१ साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात देशात किंवा परदेशात अडचण येऊ नये, यासाठी विद्यापीठे बंद असताना देखील ऑनलाईन शिक्षण व उपस्थिती ग्राह्य धरून परदेश शिष्यवृत्ती देयकांचा लाभ देण्यात आला.
ग्रामीण व शहरी भागातील गाव-वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे रद्द करून त्यांना समताधिष्ठित किंवा महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय, ग्रामविकास, नगरविकास, महसूल आदी विभागांशी समन्वय साधून गाव-वस्त्यांची जातिवाचक नावे कायमची हद्दपार व्हावीत, या दृष्टीने कार्यपद्धती अंतिम करण्यात येत आहे. एम.फिल. व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी बीएएनआरएफ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन अधिछात्रवृत्ती) २०२०-२१ मध्ये अर्ज केलेल्या सर्व ४०८ विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी ही अधिछात्रवृत्ती १०५ विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र कोविड काळात पैशामुळे कोणाचेही शिक्षण बंद पडू नये, यासाठी विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत २० हजार रुपये एकरकमी मदत केली जाते, कर्ता व्यक्ती मरण पावल्यापासून एक वर्षाच्या आत अर्ज केला जावा, हा पूर्वीचा नियम बदलून आता तीन वर्ष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयास १२.७९ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. महाविद्यालय इमारत, ग्रंथालय आदींच्या विकासासाठी हा निधी वापरात आणला जात आहे. 17 एप्रिल २०२० रोजी राज्यभरात अडकलेल्या सुमारे दीड लाख ऊसतोड कामगारांना कोविड विषयक आरोग्य तपासणी करून घरपोच सुखरूप पाठवण्यासाठी विशेष निर्णय. या निर्णयानुसार एसटी बस व कारखान्यांना दिलेले वाहन आदींचा वापर करून एप्रिल २०२० मधील कडक लॉकडाऊनच्या काळातील राज्यातील सर्वात मोठे व यशस्वी स्थलांतर करण्यात आले.
दीड लाख ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरादरम्यान एकही कोविड पॉझिटिव्ह किंवा अन्य कोणतीही दुर्घटना घडली नाही. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन, विभागीय स्तरावर तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा समावेश करून तृतीयपंथीयांची नोंदणी करणे सुरू, तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना, निवासी वसतिगृह सुरू करणे प्रस्तावित. दिव्यांगांच्या सर्व शाळा ‘दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र’ व्हाव्यात, यासाठी दिव्यांग शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना यासाठीचे ५ दिवसीय विशेष प्रशिक्षण, दिव्यांग व्यक्तींना विशेष साहाय्यक उपकरणे मोफत मिळावीत, यासाठी दानशूर व्यक्ती व संस्था व गरजू दिव्यांग यांची एकत्र सांगड घालणारे ‘महाशरद हे पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलवर देण्यात येणाऱ्या देणग्या व मदत करमुक्त असावी, यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत.
‘बार्टी’ च्या सर्व योजना एका क्लिकवर मिळाव्यात, यासाठी ‘ई-बार्टी’ हे मोबाईल अॅप सुरु. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पासपोर्टच्या धर्तीवर ऑनलाईन व एकाच हेलपाट्यात पूर्ण व्हावी, यासाठी बार्टीमार्फत नियोजन करून जिल्हानिहाय जात पडताळणी समित्या स्थापन. प्रत्येक महिन्याला प्रलंबित प्रकरणांची तपासणी करून महिन्याअखेरच्या आत त्या महिन्यातील प्रकरणे निकाली काढण्यात येतात. मातंग समाजाचे मागासलेपण दूर व्हावे, यासाठी समाजाचा बारकाईने अभ्यास होऊन सद्यस्थिती समोर यावी. यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटूंबातील दहावीच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी पुढील दोन वर्षात प्रत्येकी प्रत्येकी एक लाखाप्रमाणे दोन लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली.
या योजनेंतर्गत 2021 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या ४०१० दियाथ्यांचे बार्टीकडे अर्ज प्राप्त झाले असून, ३९०१ अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली.बार्टीमार्फत यूपीएससी व एमपीएससी करणाऱ्या विद्याथ्यांना लॉकडाऊन काळात विशेष ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम, २०२० मध्ये बार्टीचे ९, तर २०२१ मध्ये विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी. २०२०-२१ मध्ये ८० हजार विद्याथ्यांनी प्रशिक्षण घेतले. बाटीमार्फत पोलीस भरती व अन्य रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम २०२०-२१ मध्ये ३.२० लाट विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण, पार्टमार्फत दक्षिण, रेल्वे, पोलीस भरती तसेच कॉपरिट क्षेत्रातील नोकन्यांच्या टन राज्यातील ३० केंद्रावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचा निर्णय. याअंतर्गत निवड झालेल्या विद्याथ्यांना प्रतिमहिना ६हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल, तसेच पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी प्रत्यकी३हजार रुपये देण्यात येतील.३० केंद्रावरून फोन सत्रात ६०० प्रमाणे दरवषी एकूण १८ हजार विद्याथ्यांना असे पाच वर्षात ९० हजार विद्याथ्यांना प्रशिक्षण देण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतर्गत ५०० पेक्षा अधिक अनुसूचित जातीतील लोकवस्ती असलेल्या ठिकाणी ४० लाख रुपये खर्चुन संविधान सभागृह बांधण्यास निधी देण्याचा निर्णय. या संविधान सभागृहात सभागृह, अभ्यासिका, ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
महाजावास अभियान २०२०-२१ अंतर्गत दीड लाख परकुलांना रमाई आवास योजनेचा प्रत्यक्ष निधी देऊन विहित वेळेत बांधकाम पूर्ण झाले.सफाई कामगारांचे प्रा प्राधान्याने सोडवण्यासाठी राज्य शासन स्तरावर स्वतंत्र कार्यासन (स्वतंत्र कक्ष) निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच या सर्व निर्णयांची माहिती घेतल्यानंतर असे लक्षात येईल की, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष निर्णय घेण्यात आले आहेत.
– विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई
व्हीएस न्युज - अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्या घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाई करुन औषधसाठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन यांनी गुप्तवार्ता विभागास व मे. इंटास फार्मासुटीकल प्रा. लि.या उत्पादकाने दिलेल्या तक्रारी अनुषंगाने Gobucel Injection,10% (Intravenous Human Normal Immunoglobulin for Intravenous Use IP 10%) Batch No.97130072, M/s Intas Pharmceuticals, Ahemdabad या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यात विक्री होत असल्याच्या गोपनीय माहिती आधारे मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव जिल्हा जळगाव या घाऊक औषध विक्रेत्याकडे गुप्तवार्ता विभाग व जळगाव कार्यालयाच्या पथकाने दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी चौकशीसाठी छापा टाकला असता या पेढीने संशयित बनावट औषधाचा २२० वायल्स इतका साठा चंडीगड येथून विनाखरेदी बिल प्राप्त केला व त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पंजाब येथील मे. श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअर या पेढीस करण्यात आल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पुढील चौकशीत मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स,चाळीसगाव या पेढीने मंजूर असलेल्या जागेतून विनापरवाना जागेत स्थलांतरण केले असल्याचे देखील आढळून आले. त्यामुळे कारवाईच्या वेळेस उपलब्ध असलेला अंदाजे रू २.७७ लक्ष किमतीचा इतर औषधसाठा पंचानाम्यांतर्गत जप्त करण्यात आला. या प्रकरणी मे.जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव या पेढीने खरेदी बिलाशिवाय संशयित बनावट Gobucel Injection 10% ची खरेदी करून त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पेढीस केली असल्याने पेढीचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके व मे. श्रीक्रिधा इंटरनँशनल हेल्थकेअर चे मालक सुनील ढाल यांचे विरुद्ध भा. द. वि. च्या विविध कलमाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ४४६/२०२१ दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत गुप्तवार्ता विभाग मुख्यालयातील सर्वश्री ग. रा. रोकडे, सहायक आयुक्त, वि. रा. रवी औषध निरीक्षक, सुरेश देशमुख, औषध निरीक्षक नाशिक व जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री तासखेडकर व औषध निरीक्षक श्री अनिल माणिकराव यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी पुढील तपास अन्न औषध प्रशासन, जळगाव व चाळीसगाव पोलीस संयुक्तरित्या करत आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंह व सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002