व्हीएस न्यूज - भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लक्ष्मण जगताप, आण्णा बनसोडे, महेश लांडगे, संग्राम थोपटे, प्रथम महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले आहे.
भोसरी सर्व्हे क्रमांक एक येथे गावजत्रा मैदाना शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे भव्यदिव्य देशातील दुसरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. यापुर्वी पतियाळा येथे असे केंद्र उभारण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी ८६०० चौरस मीटरच्या जागेत ५५११ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे.
यामध्ये तळमजल्यावर पैलवानांसाठी, सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह आणि ५०० व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, ५० व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर मुख्य हॉलमध्ये आर्कषक विद्युत रोषणाईसह १२x१२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली युवा पैलवानांना सराव करता येईल यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002