व्हिएस न्युज - माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक आणि कामगारांमध्ये दहशत माजवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय 30, रा. वाकड, पुणे), समीर नझीर शेख (33, रा. काळेवाडी, पुणे), मयुर बाळासाहेब सरोदे (23, रा. पुनावळे, पुणे) व करण सदाफळ चव्हाण (24, रा. पुनावळे, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील माऊली चौकात 5 जुलै रोजी तक्रारदार अनिकेत रवींद्र वाडीया (वय 24, रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीस सर्व्हिसेस प्रा.लि.चे असिस्टंट मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे हे प्रमोशनल ऍक्टीव्हीटी करत होते. त्यावेळी त्याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून आरोपी जोगदंड व त्याच्यासोबत आणखी दोन ते तीनजण आले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगी शिवाय येथे कामगार कसे ठेवले? काम कसे काय करत आहात? अशी विचारणा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्या हातातील टायटनचे घडयाळ व सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, पोटाला, कंबरेला आणि पायाला मार लागला. त्यामुळे त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकातील सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि पोलिस उप निरीक्षक सचिन चव्हाण यांना सदर गुन्ह्यातील आरोपी बबलू जोगदंड आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सदर आरोपींचा शोध घेत असताना सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना त्यांच्या विश्वासू बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बबलू जोगदंड त्याच्या इतर साथीदारांसोबत वाशी, नवी मुंबई येथे लपून बसला आहे. सपोनी.संतोष पाटील यांनी स्टाफच्या मदतीने सापळा रचून वाशी, नवी मुंबई येथून बबलू जोगदंड आणि समीर शेख यांना अटक केली. त्यानुसार जोगदंड याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आणि इतर साथीदारांची माहिती दिली वर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले . रमाकांत जोगदंड (30) हा सराईत गुन्हेगार अजून तो माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002