व्हीएस न्यूज – सुशील कुमारनेही आज राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये फ्री-स्टाइल कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. सुशील कुमारनेही महाराष्ट्राच्या राहुल आवारे पाठोपाठ कुस्तीत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे. पैलवान सुशीलकुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत ७४ किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली. सुशील कुमारने जिंकलेल्या या सुवर्ण पदकाबरोबर हॅटट्रीक केली आहे. भारताच्या खात्यामध्ये त्याने जिंकलेल्या पदकामुळे एकूण १४ सुवर्ण पदके जमा झाली आहेत. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये आतापर्यंत ४ पदके पटकावली आहेत. सुशील कुमारने ७४ किलो वजनी गटात दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिस्पर्धीला अवघ्या १ मिनीट २० सेकंदात आसमान दाखवले आहे.
व्हीएस न्यूज – पात्रता फेरीत खेळताना यूएईकडून ३ गड्यांनी झालेल्या पराभवामुळे झिम्बाब्वेचा सन १९८३ नंतर पहिल्यांदाच २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगले. झिम्बाब्वेला पुढील वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळण्यासाठी कोणत्याही परिस्थिती यूएईला पराभूत करणे आवश्यक होते. पण त्यांचाच पराभव झाला.
आमच्याकडे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी अनेक संधी चालून आल्या होत्या. आमचा आतापर्यंतचा खेळ चांगला होता. पण आमच्यासाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रेम क्रिमरने पराभवानंतर दिली. आम्ही अंतिम फेरीत जाऊ याचा आम्हाला विश्वास होता. मला वाटते, असाच विचार बहुतांश लोकांनी केला असेल. पण आमचा पराभव झाला,असेही तो म्हणाला.
झिम्बाब्वेला आयसीसी विश्वचषक पात्रता फेरीतील सुपर सिक्समधील पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात ४० षटकांत २३० धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संघ ७ गडी गमावून २२६ धावाच करू शकला. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या यूएई संघाने सुरूवातीला मिळालेल्या धक्क्यातून सावरत ४७.५ षटकांत २३५ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजा हा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ४१ धावा देत ३ गडी टिपले.
व्हीएस न्यूज – कोलकाताच्या संघाला आयपीएलमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या गौतम गंभीरवर बोली न लावल्यामुळे यंदा केकेआरचा कर्णधार कोण ? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दिनेश कार्तिक पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या सत्रात कोलकाता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्त्व करणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रॉबिन उथप्पाकडे देण्यात आली आहे. नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली. दिनेशकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय आयपीएलमधील अनुभव आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव पाहता घेतल्याचे, संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने दिनेश कार्तिकवर अकराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात ७.४ कोटी रुपयांची बोली लावली होती. दिनेश कार्तिकसोबत रॉबिन उथप्पाही कोलकात्याच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र अखेर दिनेश कार्तिकने यामध्ये बाजी मारली आहे.
व्हीएस न्यूज – भारताने आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवला असून भारताने या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली आहे. ३ फेब्रुवारीला आता भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने शुभम गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय गोलंदाजांनी या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघावर जोरदार हल्ला करत ६९ धावांवरच रोखले आणि विजय मिळवला.
भारतीय गोलंदाजांसमोर भारताच्या २७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी गुडघे टेकले. २० च्यावर धावा पाकच्या एकाही फलंदाजाला करता आल्या नाही. भारताकडून इशान पोरलने ६ षटकांमध्ये १७ धावा देत ४ गडी बाद केले. त्याने दोन निर्धारीत षटकेही टाकली. तर शिवा सिंग व रायन परागने प्रत्येकी दोन आणि अभिषेक शर्मा व अनुकूल रॉयने प्रत्येकी एक गडी बाद केला.
व्हीएस न्यूज - U-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नवोदीत पापुआ न्यू गिनीआचा १० गडी राखून धुव्वा उडवला. पापुआ न्यू गिनीआच्या संघाला अवघ्या ६४ धावांमध्ये सर्वबाद केल्यानंतर, भारताने हे आव्हान अवघ्या काही षटकांमध्ये पूर्ण केलं.
भारताचा कर्णधार पृथ्वी शॉने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्याने ३९ चेंडुत ५७ धावांची वादळी खेळी केली. पृथ्वी शॉच्या या खेळीत १२ चौकारांचा समावेश होता, या विजयासह भारताने सुपर लिग प्रकारात प्रवेश मिळवला आहे. याआधी पहिल्या साखळी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी विजय मिळवला होता.
त्याआधी भारताचा डावखुरा फिरकीपटू अनुकूल रॉयने ५ बळी घेत पापुआ न्यू गिनीआच्या संघाला खिंडार पाडलं. ज्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या ६५ धावांचं आव्हान मिळालं होतं. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना हा झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : पापुआ न्यू गिनीआ, सर्वबाद ६४. (अनुकूल रॉय ५/१४, मवी २/१६) विरुद्ध भारत ६७/०. (पृथ्वी शॉ ५७*, मनजोत कालरा ९*) निकाल – भारत १० गडी राखून विजयी
व्हीएस न्यूज - वर्षातील पहिल्याच दिवशी, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १८ चेंडूत अर्धशतक झळकावणारा कॉलिन मुन्रो याने बुधवारी शतकांचा विश्वविक्रम केला. वेस्ट इंडिज विरुद्ध, न्यूझीलंडचा सलामीवीर मुन्रोने ५३ चेंडूंत माऊंट मौनांगीमध्ये १०४ धावा केल्या. त्यात १० षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यात मुन्रोचे हे तिसरे शतक आहे. त्याचबरोबर, क्रिकेटच्या या आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये ऐवढी शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ७ जानेवारी रोजी मुन्रोने याच मैदानावर पहिल्यांदा १०१ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने भारतविरूद्ध नोव्हेंबरमध्ये राजकोट येथे १०९ धावा केल्या.
न्यूझीलंडने मुनोच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजसमोर २४४ धावांचे आव्हान ठेवले होते. या विजयाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ १२४ धावाट गारद झाला. न्यूझीलंडने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आणि ११९ धावांनी सामन्यात विजय मिळविला. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. न्यूझीलंडचा हा ११९ धावांनी विजय टी-२० मधील तिसरा सर्वात मोठा विजय आहे. सर्वात मोठा विजय मिळविण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावे आहे. श्रीलंकेने २००७मध्ये केनियाविरुद्ध १७२ धावांनी विजय मिळविला होता.
मुन्रोचे टी-२० मधील ३ आंतरराष्ट्रीय शतक…
१. विरुध्द वेस्टइंडीज, १०४ धावा – मौनांगी, जानेवारी २०१८
२. विरुद्ध भारत, १०९ * धावा – राजकोट, नोव्हेंबर २०१७
३. विरुद्ध बांगलादेश, १०१ धावा – मौनांगी, जानेवारी २०१७
व्हीएस न्यूज - सध्याच्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे, असे मत उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले.
‘‘दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी होईल, असा आत्मविश्वास आम्हाला आहे. या दौऱ्यात जर आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर आम्हाला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता येईल. आम्ही या आव्हानासाठी सज्ज आहोत. आमच्यासाठी प्रत्येक सत्र महत्वाचे असेल. प्रत्येक सत्रानुरुप आम्ही खेळ करू,’’ असे अजिंक्य म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाबत अजिंक्य म्हणाला की, ‘‘दक्षिण आफ्रिकेचा संघ हा चांगलाच समतोल आहे. त्यांच्याकडे सातत्याने वेगवान मारा करणारे गोलंदाज आहेत. त्यामुळे या दौऱ्यात कोणत्याही क्षणी आम्ही गाफिल राहणार नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना हा महत्वाचा असेल.’’
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर एकही सराव सामना खेळायला मिळणार नाही. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने फलंदाजांना चांगला सराव मिळावा म्हणून अतिरीक्त गोलंदाज या दौऱ्यासाठी नेले आहेत. या निर्णयाचे कौतुक अजिंक्यने केले आहे. तो म्हणाला, ‘‘संघ व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे आम्हाला चांगला फलंदाजीचा सराव करता येणार आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या शैलीत वेगळेपणा आहे आणि त्याचाच फायदा आम्हाला सरावादरम्यान नक्कीच होणार आहे.’’
मुलाखतीतून दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा
व्हीएस न्यूज – विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणा-या रोहितने भारताला वन-डे मालिकेपाठोपाठ टी-२० मालिकेतही विजय मिळवून दिला आहे. इंदूरच्या टी-२० सामन्यात रोहितने आपल्या शतकी खेळीत १० उत्तुंग षटकार ठोकले. मात्र लहानपणी क्रिकेट खेळताना रोहितला आपल्या याच आक्रमक फलंदाजीमुळे जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. अशी हदय आठवण त्याने निवेदक गौरव कपूर याच्या कार्यक्रमात सांगत, आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
माझ्या लहानपणी दिवसभरातला बहुतांश वेळ टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघण्यामध्ये जायचा. यानंतर शाळेत असताना बराचवेळ मी, माझे भाऊ आणि मित्रपरिवार सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळायचो. लहानपणीही सोसायटीत क्रिकेट खेळताना मी अनेक घरांच्या काचा फोडल्या आहेत. माझे शेजारी माझ्या या आक्रमक फलंदाजीने नेहमी त्रस्त असायचे. काही जणांनी कंटाळून पोलिसांत आमच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर एक दिवस पोलिसांनी घरी येऊन मला सांभाळून क्रिकेट खेळण्यास सांगितले. यापुढे तुझी तक्रार आली तर तुला जेलमध्ये टाकेन, असा सज्जड दमच मला पोलिसांनी भरला. मात्र त्यानंतरही आम्ही क्रिकेट खेळणे कधीही सोडले नाही.
याव्यतिरीक्त रोहित शर्माने गौरव कपूरने घेतलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आणि क्रिकेट कारकिर्दीतले अनेक किस्से सांगितले. बायको रितीकासोबतची पहिली भेट, ड्रेसिंग रुममधली सहका-यांसोबतची धमाल-मस्ती अशा अनेक खुमासदार आठवणींनी भरलेल्या या एपिसोडला सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002