व्हीएस न्यूज - युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थिती बघता तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विशेष विमान आज सकाळी 9 वाजता आले. यामध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी 18 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत.
सद्या युक्रेनमधील अतिसंवेदशील परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेश गंगा’ ही विशेष मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. या अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1940’ या विशेष विमानाने 250 विद्यार्थी आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आहेत. सायंकाळी सहा वाजता पुन्हा येणाऱ्या विशेष विमानामध्ये राज्यातील 4 विद्यार्थी परत येणार आहेत.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्या वतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्य स्थळी पोहोचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002