व्हीएस न्यूज - काळेवाडी फाटा येथील पीर बाबा मंदिराजवळ एका अज्ञात व्यक्तीने वाहनाने सात वर्षाच्या मुलाला त्याच्या आई आणि वडिलांना धडक देऊन पळून गेल्याची घटना पहाटे ०४.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. या अपघातात आई आणि वडील जखमी झाले पण सात वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेला.
संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले.
पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तिघांना एका वाहनाने धडक दिली. त्यानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सात वर्षांचा मुलगा संघर्ष याचा जागीच मृत्यू झाला होता तर त्याचे आई आणि वडील जखमी झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मूगळीकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि संतोष पाटील आणि सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हा तत्काळ उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सह पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, पोलीस नाईक अतिक शेख, पोलीस नाईक विक्रांत चव्हाण यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी काळेवाडी फाटा परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अज्ञात वाहन आणि वाहन चालकाचा सुगाव लागला आणि त्याला अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक आरसा आढळला होता. तो वाहनाच्या डाव्या बाजूचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरून देखील तपास करण्यात आला. हा अपघात एका अशोक लेलँड टेम्पोने केला असून तो टेम्पो थेरगाव येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला. त्यावरील चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी हा टेम्पो त्याचा मित्र तेजस शशिकांत बारसकर याच्याकडे होता. पोलिसांनी तेजस याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपघात झाल्यानंतर आरोपी तेजस घटनास्थळावरून घाबरून पळून गेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक जितेंद्र गिरनार करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002