व्हिएस न्यूज - न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्याय न मिळाल्या प्रमाणेच असतो. परंतू, त्याला छेद देणारा निकाल पिंपरी-चिंचवड न्यायालयाने मंगळवारी (ता.१४) दिला. विशेष म्हणजे जलद न्यायाची अपेक्षा असलेल्या महिलाविषयक खटल्यात हा निवाडा करण्यात आला, फक्त ४८ तासांत म्हणजे दोन दिवसांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दस्तगीर पठाण यांनी विनयभंगाच्या खटल्यातील आरोपीला दोषी धरून सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाच्या चपळाईबरोबर पोलिसांचाही जलद तपास या वेगवान न्यायाला कारणीभूत ठरला आहे. हा गुन्हा घडल्यानंतर चिंचवड पोलिस सह.पोलीस निरीक्षक आणि या गुन्ह्याचे तपासाधिकारी विकास मडके यांनी फक्त २४ तासांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्याला तशीच वेगवान साथ व सहकार्य त्यांना सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांचे मिळाले. त्यांनी हा खटला जलद चालवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्यच केली नाही, तर त्यावर जलदगतीने अंमलबजावणीही केली. त्याच्यामुळे १० तारखेला घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपीला लगेच दोन दिवसांत शिक्षा झाली.
सुरेशकुमार मोहनलाल (वय २२, रा. वेताळनगर चिंचवड मूळचा जम्मू-काश्मीर) असे त्याचे नाव आहे. या घटनेतील फिर्यादी २३ वर्षीय नवविवाहिता आहे. तिच्यावर अत्याचार करून आरोपीचा जम्मू-काश्मीरला पळून जाण्याचा बेत होता, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी व फिर्यादी एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी पहिल्या, तर आरोपी दुसऱ्या मजल्यावर रहावयास आहे. घटनेच्या दिवशी आरोपी हा फिर्यादींच्या उघड्या दरवाजातून घरात घुसला. त्याने दरवाजा आतून बंद करीत फिर्यादींचा विनयभंग केला.त्यावर त्यांनी आरडाओरडा केला. एवढेच नाही, तर आरोपीच्या तावडीतून त्यांनी सुटकाही करून दिली.
दरम्यान, त्यांच्या आरडाओरड्याने आरोपी घाबरला. दरवाजा उघडून त्याने पळ काढला. फिर्यादीही त्यांच्या मागे धावल्या. हे पाळून तळमजल्यावरील पार्किंगमधील रहिवाशांनी पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
त्यानंतर मडकेंसह पोलीस हवालदार केदारी, पोलीस नाईक सोनपेटे, पोलीस शिपाई बाविस्कर यांनी जलद तपास करून दुसऱ्याच दिवशी ११ तारखेला चार्जशीट दाखल केले. १२ तारखेला रविवारी कोर्टाला सुट्टी असते. अन्यथा २४ तास अगोदरच म्हणजे कालच सोमवारी हा निकाल लागला असता.
दरम्यान, या जलदगती निकालाने समाजात एक चांगला संदेश जाणार आहे. आरोपीला लवकर शिक्षा झाल्याने असे गुन्हे करण्यास आरोपी सहसा धजावणार नाहीत. परिणामी त्यांना व या गुन्ह्यांनाही आळा बसेल, अशी प्रतिक्रिया या खटल्यात सरकार तथा पोलिसांची बाजू मांडलेल्या सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांनी दिली. अशा निकालाने धास्ती निर्माण होऊन महिलांविषयक गुन्हे कमी होतील, असेही त्या म्हणाल्या.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002