व्हीएस न्युज -महाराष्ट्र बॅाक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन (नागपुर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या '९ व्या सब ज्युनिअर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप २०२३-२४' मध्ये खराळवाडी स्पोर्ट्स क्लबच्या निश्चय सुभाष जिनवाल ने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. निश्चय हा पिंपरी येथील खराळवाडी परिसरातील रहिवासी आहे.
पिंपरी चिंचवड संघाचे प्रतिनिधित्व करत निश्चय जिनवाल (वय -१४) याने सब ज्युनिअर ६४ ते ६७ वजनी गटात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले आहे.याने जिद्द, चिकाटी,एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचे वडील सुभाष जिनवाल हेच त्याचे प्रशिक्षक आहेत. तो खराळवाडी येथील पोतदार इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्हा अॅमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन ऑफ नागपूर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन रवी नगरातील विद्यापीठ मैदानाजवळील सुभेदार सभागृहात २२ ते २६ जुलै दरम्यान करण्यात आले होते. नागपूर ,गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, ठाणे, मुंबई, पुणे अशा एकूनच ३३ मुलांचा व ३३ मुलींचा जिल्हा व शहर संघ सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून ४५६ खेळाडू सहभागी झाले होते.
त्याने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कडवी झुंज देत अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदक पटकाविले. निश्चयने पिंपरी चिंचवड शहराचे नाव लौकीक केले आहे.यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
व्हिएस न्युज - माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक आणि कामगारांमध्ये दहशत माजवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय 30, रा. वाकड, पुणे), समीर नझीर शेख (33, रा. काळेवाडी, पुणे), मयुर बाळासाहेब सरोदे (23, रा. पुनावळे, पुणे) व करण सदाफळ चव्हाण (24, रा. पुनावळे, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील माऊली चौकात 5 जुलै रोजी तक्रारदार अनिकेत रवींद्र वाडीया (वय 24, रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीस सर्व्हिसेस प्रा.लि.चे असिस्टंट मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे हे प्रमोशनल ऍक्टीव्हीटी करत होते. त्यावेळी त्याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून आरोपी जोगदंड व त्याच्यासोबत आणखी दोन ते तीनजण आले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगी शिवाय येथे कामगार कसे ठेवले? काम कसे काय करत आहात? अशी विचारणा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्या हातातील टायटनचे घडयाळ व सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, पोटाला, कंबरेला आणि पायाला मार लागला. त्यामुळे त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकातील सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि पोलिस उप निरीक्षक सचिन चव्हाण यांना सदर गुन्ह्यातील आरोपी बबलू जोगदंड आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सदर आरोपींचा शोध घेत असताना सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना त्यांच्या विश्वासू बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बबलू जोगदंड त्याच्या इतर साथीदारांसोबत वाशी, नवी मुंबई येथे लपून बसला आहे. सपोनी.संतोष पाटील यांनी स्टाफच्या मदतीने सापळा रचून वाशी, नवी मुंबई येथून बबलू जोगदंड आणि समीर शेख यांना अटक केली. त्यानुसार जोगदंड याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आणि इतर साथीदारांची माहिती दिली वर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले . रमाकांत जोगदंड (30) हा सराईत गुन्हेगार अजून तो माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे.
व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध विभागात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार काम करीत आहे. संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे पालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी द्यावेत, अशी मागणी भाजपा कामगार सेलचे सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी केली आहे.
याबाबत लांडगे यांनी आयुक्त सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून दर महिन्याला 30 ते 35 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे महापालिकेत विविध विभागात ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरचिटणीस लांडगे यांनी केली आहे.
"पगार स्लीप न देणे म्हणजे कामगाराला त्याच्या हक्क पासून वंचित ठेवणे . प्रत्येक सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी पगार स्लिप आणि नियुक्ती पत्र महत्वाची असते. पगार स्लिपला महत्वाचे कागदपत्र देखील मानले जाते. जर तुम्ही इन्कमटॅक्स फाइल करीत आहात, किंवा बॅंकेतून कर्ज घेऊ इच्छिता त्यावेळी ही स्लिप महत्वाची असते. तसेच एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्विकारण्याआधीसुद्धा आधीच्या नोकरीची सॅलरी स्लिप महत्वाची ठरते. कंत्राटी कामगारांना पगार स्लीप नसल्याने अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे अशक्य झाल्याने ते सावकारी कर्जाकडे वळत आहेत. पगार स्लीप उपलब्ध झाल्यास अडचणीच्या वेळेस कंत्राटी कामगारांना बँकेतून सहज कर्ज घेता येईल आणि देशाचे नुकसान सुद्धा होणार नाही" असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लांडगे म्हणाले.
व्हिएस न्युज - राजकारण, समाजकारण, स्त्री-पुरुष संबंध, उद्योग-व्यवसाय अशा विविध विषयांचे वैश्विक परिमाण सिनेमात आवश्यक आहे. तरच, भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळेल, असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले. चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सांगवीतील निळूभाऊ फुले रंगमंदिरात दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते व लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा मुलाखतकार श्रीकांत चौगुले यांनी विविध विषयावर त्यांना बोलते केले.
यावेळी भाजप नेते शंकर जगताप, लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे आदी उपस्थित होते.
जवळपास दीड तास चाललेल्या या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीच्या आजपर्यंतच्या प्रवासातील विविध टप्प्यांवर डॉ. पटेल आणि नखाते यांनी भाष्य केले. डॉ. पटेल म्हणाले की, सिंहासन, सामना अशा चित्रपटातील विषय आणि त्यातील सिद्धांत आजही काही प्रमाणात दिसतात. मात्र जागतिक पातळीवर सिनेमा पोहोचवण्यासाठी आता केवळ भारतीय राजकारणाकडे पाहून चालणार नाही. विश्वातील लोकशाहीचे धागे आणि त्याची मुळे आपल्या लोकशाहीत शोधून वैश्विक परिमाण देणारा सिनेमा आला पाहिजे. राजकारणाबरोबरच स्त्री पुरुष नातेसंबंध, समाजकारण, उद्योग व्यवसाय आदी विविध विषयांबाबतही वैश्विक परिमाण शोधणे आवश्यक आहे, तोपर्यंत भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळणार नाही. चित्रपट हा इतिहासाचा साक्षीदार असतो. तो त्या काळातला ऐतिहासिक दस्ताऐवजही ठरतो. त्यामुळे बदलते जग आणि वास्तवाचे भान हे चित्रपटात उतरले पाहिजे. चित्रपटाच्या या चौकटीत संपूर्ण जग असते.
डॉ. पटेल म्हणाले की, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे समर नखाते यांना गुरू मानतात. गुरू वाट दाखवतो, परंतू, पुढची वाटचाल शिष्यालाच पार पाडावी लागते. समर नखाते माझे पहिले गुरू आहेत. सामना चित्रपट करताना मी अगदीच नवखा होतो, सिनेमाचे तंत्र त्यांनी मला सांगितले. निळूभाऊ फुले हे माझे परममित्र होते. त्यांच्यासारखा नम्र माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहात येऊन आनंद वाटला. आमच्या निळूभाऊंचे नाव या रंगमंदिराला दिल्याबद्दल मी पिंपरी-चिंचवडकरांचे आभार मानतो.
समर नखाते म्हणाले, चित्रपटासाठीचे तंत्रज्ञान आता सर्वत्र आहे. पण केवळ तंत्रज्ञानाने भागत नाही, तर सिनेमाची एक वेगळी भाषा असते. सिनेमा केवळ चित्र दाखवत नाही, तर माणूसपणाची कक्षा विकसित करतो. भारतात प्रादेशिक चित्रपट समृद्ध आहेत, त्यातून भारतीय संवेदना, अविष्कार जगभरात पोहोचायला हवा. तंत्र आणि मांडणीपेक्षाही अभिव्यक्ती पडद्यावर काय येते हे महत्त्वाचे आहे.
भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, मनोरंजनाचे पूर्णपणे पॅकेज असलेला टीडीएम हा मराठी सिनेमा घेऊन येतो आहे. ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यासाठी प्रेक्षकांची साथ हवी आहे. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास नवनवे मार्ग सापडत जातात व प्रश्न सुटत जातात. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते.
व्हिएस न्युज - प्रसिद्ध लेखक अजित कुमार झा यांनी लिहिलेल्या 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया: इयर २०१४ ते २०२२' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये नुकतेच करण्यात आले. ईशान्य क्षेत्र विकास आणि संस्कृती, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, खासदार भुवनेश्वर कलिता, पद्मश्री आलोक मेहता, ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार बिपलव कुमार देब, प्रसिद्ध पत्रकार राजू वाघमारे, सचिन ईटकर, विविध सरकारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति उपस्थित होते.
ईशान्य प्रदेशाच्या विकासाचा इतिहास नोंदवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या उन्नतीसाठी दृढनिश्चय आणि संकल्प केला आहे. गेल्या सात वर्षांत (२०१४-२०२२) ईशान्य भारतात विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्याचे सिंहावलोकन या पुस्तकात केले आहे. अजित कुमार झा हे एक अनुभवी सरकारी अधिकारी आहेत, आणि त्यांचे हिंदीतील पुस्तक, 'सशक्त पूर्वोत्तर, दक्षिण पूर्व एशिया का द्वार' खूप गाजले होते. पुस्तक प्रकाशनानंतर 'ईशान्य क्षेत्राचा आणखी विकास कसा करायचा आणि या क्षेत्राच्या यशाला भारताच्या वेगवान विकास गतीशी कसे जोडता येईल' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड विश्वविद्यालय तर्फे ईशान्य भारतातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्हिएस न्युज - आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय चित्रपटांतून मांडले पाहिजे. या माध्यमातून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. तर आणि तरच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा तेव्हा बाजूला राहतो, असे मत प्रसिध्द लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते यांच्या हस्ते कऱ्हाडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे, गायक वैभव शिरोळे आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले की, ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. कोणताही चित्रपट करताना अडचणी येतातच. मलाही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मी त्याला सामोरा गेलो. शेतकरी हा सर्वात सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडत नाही. मीही शेतकरी असल्याने त्याच वाटेने जातो. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास अडचणी नक्कीच दूर होतात. नवनवे मार्ग सापडत जातात. प्रश्न सुटत जातात. चांगली माणसं भेटत जातात. प्रामाणिकपणा आणि माणुसकीची कास सोडायची नाही, हे मात्र मनाशी ठाम असायला हवे. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे भाऊराव यांनी सांगितले.
आजपर्यंतच्या वाटचालीत रसिक प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले. दिशा फाऊंडेशनकडून झालेला माझा सन्मान म्हणजे आपल्या माणसांकडून मिळालेले प्रोत्साहन आहे. कौतुक माणसाच्या अंगात दहा हत्तीच बळ देत असते, अशा भावना भाऊराव यांनी यावेळी व्यक्त केल्या.
प्रास्ताविक जगन्नाथ शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. राजेश सावंत यांनी आभार मानले.
व्हीएस न्युज - आगामी महापालिका निवडणुकीत ‘अब की बार १०० पार’चा निर्धार भाजपाने केला आहे .शहरातील बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी कडून भर देण्यात येत आहे. ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथनिहाय जबाबदारी आणि कर्तव्य निश्चित करण्यात आली आहेत.याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मार्गदर्शन केले. अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.
पक्ष संघटन आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर पक्षश्रेष्ठींनी भर दिला आहे. आगामी काळात संपूर्ण शहरात असे अभियान पक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे, असं भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केलेल्या नियोजनाप्रमाणे ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ सुरू करण्यात आले. त्याची प्रशिक्षण बैठक भोसरीत पार पडली.
भोसरी विधानसभा मतदार संघात ‘‘बूथ सशक्तिकरण अभियान’’ ची सुरूवात आणि प्रशिक्षण बैठक घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, विलास मडिगेरी, संतोष लोंढे, निगडी- चिखली मंडल अध्यक्ष महादेव कवितके, सुरेश म्हेत्रे, कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा सोशल मीडिया प्रमुख हनुमंत लांडगे आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण बैठकीमध्ये बूथ सशक्तीकरण अभियानाचे पीपीटी प्रेझेंटेशन करण्यात आले. तसेच, बूथमधील कार्य, सर्व समाज घटकांचा विचार करून ३० कार्यकर्त्याची यादी तयार करणे व सत्यापित करणे, बूथ समितीमधील ११ कार्यकर्त्यांचे कार्य विभाजन, मन की बात प्रमुखाची कामे, लाभार्थी संपर्क प्रमुख, कार्यक्रम प्रमुख यांच्यासह पेज प्रमुखांच्या कामाचे नियोजन करण्यात आले. तसेच, भाजपाच्या ‘सरल’ ॲपबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ‘मन की बात’ बूथ बैठक दर महिन्याला निश्चित करण्यात आली. येत्या २६ मार्च रोजी प्रत्येक बूथमध्ये आणि ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ चा १०० वा कार्यक्रम प्रत्येक गावात भव्य आणि नाविन्यपूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
प्रशिक्षण बैठकीत सूत्रसंचालन भोसरी चऱ्होली मंडल अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केले. तर दक्षिण भारत आघाडी अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - "दिलेल्या लिंकवर तुमचा पॅनकार्ड अपडेट करा, तुमचं SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे" असे भासवून लिंक वर क्लिक करण्यास भाग पाडून एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा घातला. सदरची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.या प्रकरणी अशोक विठ्ठलराव मडावी (वय- ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईल नंबरवरून SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे. तुमचं पॅनकार्ड अपडेट करा अशा आशयाचा इंग्रजीत टेक्स्ट मॅसेज आला. त्यात एक लिंक दिलेली होती. शहानिशा न करता त्यावर क्लिक करून तक्रारदार यांनी पॅनकार्ड अपडेट केले तसेच माहिती आणि ओटीपी भरून दिला. काही सेकंदातच त्यांच्या SBI बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचं समजताच अशोक विठ्ठल मडावी यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर महिला सफाई कर्मचाऱ्यांनी 7 मार्चपासून ठिय्या आंदोलन केले होते. 12 प्रकारच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या पैकी 11 मागण्या मान्य झाल्या असून आयुक्त राजेश पाटील यांनी लेखी दिले आहे. त्यामुळे गेल्या दिवसांपासून सुरू असलेले महिला सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित झाले असल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याचेही बाबा कांबळे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकांतर्गत सफाई करण्याचे काम ठेकेदारांना दिले आहे. हे ठेकेदार मनमानी पद्धतीने महिला सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ठेकेदारांच्या या मनमानिविरोधात महिला सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर ठिय्या मांडत आंदोलन छेडले. तीन दिवस आंदोलन केल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांच्या सोबत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे देखील या वेळी उपस्थित होते. या वेळी 11 मागण्या मान्य करण्यात आल्याचे लेखी आयुक्तांनी दिले.
या मागण्यांमध्ये सर्व सफाई कामगार महिला, पुरुष पैकी कोणालाही कंत्राटी कामगारांना नवीन ठेकेदार कामावरून कमी करू नये. अर्ध वेळ कामास घेतल्यास पुढील दिवसाचा किमान वेतन प्रमाणे पगार द्यावा. कंत्राटी कामगारांना कामाच्या ठिकाणी जास्त कामे व अतिरिक्त कामे, मातीचा ढीग उचलणे हाताने, मैला उचलने व इतर अतिरिक्त कामे सांगण्यात येऊ नयेत. सफाई कंत्राटी कामगार महिलांना कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, पिळवणूक थांबून कामाच्या ठिकाणी मोकळेपणा मिळाला पाहिजे. मागील वर्षाचे बोनस देण्यात यावे सफाई कामगाराचे बोनस थकित 18 ते 21 थकित बोनस देण्यात यावे. सफाई कामगारांना मनपाने कायमस्वरूपी कामावर घ्यावे. कंत्राटी पद्धत बंद करा. नवी मुंबईच्या धरतीवर सफाई कामगारांना घरकुल योजना राबविण्यात यावी. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आदींचा समावेश होता.
दिलेल्या लेखी आश्वासनांची लवकर अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्याकडून दर वर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलेचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा "सलाम 2022 पुरस्कार" हा महिला सक्षमीकरण, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन व डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या रोटरीच्या जिल्हा राज्यपाल मा. मंजू फडके, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, संचालिका व विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर, सल्लागार डॉ. पी. जयराज तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सारंग माताडे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व गणेश वंदना आणि गान सम्राज्ञी लता दीदीना आदरांजली वाहत त्यांनी गायलेल्या निवडक गाण्याचे सादरीकरण पब्लिक स्कूलच्या महिलांनी केले. आणि कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रणजित पाटील प्राचार्य डॉ डी वाय पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांनी केले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने विविध सामाजिक कार्याचा आढावा अध्यक्ष संतोष जाधव यांनी मांडला. मनोगत –
सारंग माताडे, सचिव- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन - “समाज कार्यातून ठसा उमठवणाऱ्या अष्टपैलू व्यक्तीचा सन्मान करताना आज स्त्रीत्वचा सन्मान होत असल्याची भावना” सचिव सारंग माताडे यांनी व्यक्त केली. मंजू फडके, रोटरीच्या जिल्हा राज्यपाल - “नुसती नाती नाहीत तर समाज घडवणारी, दुसऱ्याला पुढे घेऊन जाणारी, मुलांना संस्कार देणारी, चांगला देश निर्माण करणारी आणि नात्याबरोबर समाजामध्ये एकमेकांसाठी उभी राहणारी कोण असेल तर ती स्त्री आहे याचा मला अभिमान वाटतो, आज या दिनानिमित्त कर्तृत्त्ववान महिलाचा एक गुण आपण आत्मसात करूयात आणि एका महिलेने दुसऱ्या महिलेला पुढे जाण्यासाठी साथ देऊया तरच या दिनाचे सार्थक होईल”. असे मत मंजू फडके रोटरीच्या जिल्हा राज्यपाल यांनी व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या, माझ्या हस्ते डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांचा सन्मान होतो आहे याचा मला फार आनंद होत आहे. डॉ. भाग्यश्रीताई पाटील, प्र-कुलपती - डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे - “आज मला मिळालेला सलाम पुरस्कार माझ्या सोबत कार्यरत असणाऱ्या महिलांना मी समर्पित करते, स्त्री असणे ही भाग्याची देणगी असल्याचे मी समजते असे मत डॉ भाग्यश्रीताई पाटील व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या की, शेती क्षेत्रापासून सुरू झालेला माझा प्रवास शिक्षण, आरोग्य, कला आदी क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत मला सर्वाचेच पाठबळ मिळाले. हा प्रवास सहज सोपा नव्हता त्यासाठी कष्ट करण्याची ताकद व जाणीव माझ्या आई वडीलांकडून मिळाली. आपण ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी महिलांनी कायमच सकारात्मक विचार घेऊन चालाल तरच यशस्वी व्हाल” असे मत डॉ भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबची आम्हाला कायम साथ असते. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विविध महाविद्यालयांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. उज्ज्वला शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, प्राचार्य मृदुला महाजन, प्राचार्य डॉ. रेखा पाठक यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिमा चव्हाण, प्रा. अलकनंदा माताडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार डॉ. मृदुला महाजन यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पुणे येथील कोथरुड परिसरातून राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएनं) एका व्यक्तीला केली आहे . इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन या व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी अटक करण्यात आलेल्या आयसिससाठी काम करणाऱ्या जोडप्यासोबत ही व्यक्ती संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
कोथरुडमधून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तल्हा खान असं आहे. कोंढवा येथील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या तल्हा खानच्या घरावर एनआयएने सोमवारी सायंकाळी छापेमारी केली. यामध्ये त्यांना काही महत्वाची कागदपत्र आणि डिजीटल स्वरुपातील साहित्य सापडलं आहे. हे सर्व साहित्य एनआयएने ताब्यात घेतलं आहे. तल्हा खान हा इस्लामिक स्टेट खुरासना या संघटनेचा हस्तक असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
या प्रकरणात आधीच चार जणांना अटक करण्यात आलीय. तल्हा खान हा अटक केलेल्या चार जणांपैकी नबील सिद्दीक खत्रीच्या संपर्कात होता. मार्च २०२० मध्ये दिल्लीतील लोधी कॉलीनी पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. काश्मीरमधील एक पती-पत्नीचं जोडपं आयसिससाठी तरुणांना काम करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा खुलासा मागील वर्षी झाला होता.
या दोघांना अटक करुन चौकशी केली असता पुण्यातील एक मुलगी या दोघांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. याच मुलीच्या संपर्कात नबील सिद्दीक खत्री होता. तर तल्हा खानही खत्रीच्या संपर्कात होता असं आता समोर आलं आहे. त्याच आधारे त्याला एनआयएने ताब्यात घेतलंय. या चौकशीमधून आणखी काही लोकांपर्यंत एनआयए पोहचू शकते अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.
व्हिएस न्यूज - बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नागपूर येथील विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मात्र हैदराबाद येथील एका चित्रपट निर्मात्यानं या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर आता न्यायालयानं या निर्मात्याला तब्बत १० लाखांचा दंड ठोठावला आहे.
अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करणारे हैदराबादस्थित चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने कुमार यांना ही रक्कम एका महिन्याच्या आत पंतप्रधानांच्या कोविड-19 रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याने रक्कम वेळेत जमा न केल्यास, जिल्हाधिकार्यांनी ३० दिवसांच्या आत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून ती पीएम फंडात पाठवावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002