व्हीएस न्यूज - “महेंद्रसिंह धोनीसाठी सौरव गांगुलीने संघात
आपली जागा सोडून फलंदाजीसाठी धोनीला बढती दिली, ‘दादा’ने दाखवलेल्या या औदार्यामुळेच महेंद्रसिंह धोनी आज चांगला फलंदाज होऊ शकला आहे.” इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने हे वक्तव्य केलं आहे. जर गांगुलीने धोनीला फलंदाजीत बढती दिली नसती तर आज महेंद्रसिंह धोनी कदाचीत या तोडीचा फलंदाज बनला नसता, असंही सेहवाग म्हणाला.
“मी संघात असताना आम्ही फलंदाजीत काही नवीन प्रयोग करत होतो. जर सलामीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर सौरव गांगुलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कऱण्याचं ठरवलं होतं. मात्र सलामीवीर चांगली सुरुवात करुन देण्यात अयशस्वी झाले तर इरफान पठाण किंवा महेंद्रसिंह धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार असं ठरलं होतं.” ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग बोलत होता.
तरुण खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याकडे सौरव गांगुलीचा कल होता. त्यामुळे धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय गांगुलीने घेतला, धोनीची कामगिरी सुधारण्यासाठी सौरवने घेतलेला हा निर्णय त्याच्यासाठी महत्वाचा ठरल्याचंही सेहवागने नमूद केलं. फार कमी कर्णधार स्वतःची जागा इतर खेळाडूंना बढती देतात, मात्र काळाची पावलं ओळखून गांगुलीने तो निर्णय घेत धोनीला बढती देण्याचा निर्णय घेतला.
व्हीएस न्यूज - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथने खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे या मालिकेतूनच माघार घेतली आहे. स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका ४-१ अशा फरकाने गमावली होती. त्यानंतर आता स्मिथने माघार घेतल्याने ट्वेन्टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या आहेत. स्मिथच्या अनुपस्थितीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. टी-२० मालिकेत भारताचे आव्हान परतवण्यासाठी त्याला फलंदाजीसह कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे. दुसरीकडे यष्टीरक्षक पेनला सलामीवीराची भूमिका पार पाडावी लागू शकते.
टी-२० मालिकेतील पहिला सामना आज रांचीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी सराव करत असताना स्मिथच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर स्मिथला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची एमआरआय तपासणीनी केल्यानंतर तो मैदानात उतरण्यास सज्ज होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी स्मिथ सराव करताना दिसला नाही. आगामी अॅशेस मालिकेचा विचार करुन ऑस्ट्रेलिया बोर्डाने त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून अॅशस मालिका रंगणार आहे.
एकदिवसीय मालिकेतील सातत्य कायम राखून टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करण्यासाठी विराट ब्रिगेड उत्सुक असेल. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन पुन्हा मैदानात उतरत असून तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जलदगती नेहरा गोलंदाजीतील धार दाखवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाले आहे. त्याला टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002