व्हीएस न्यूज - नवीन घर खरेदी जवळपास थंडावली असल्याचा विपरीत परिणाम हा बँका आणि वित्तसंस्थांकडील घरासाठी कर्ज मागणीत लक्षणीय घसरणही दाखविणारा ठरला आहे. व्याजाचे दर दीड ते दोन टक्क्यांनी कमी होऊनही त्याचा फायदा बँका आणि गृहवित्त कंपन्यांना झालेला दिसून येत नाही.
चालू वर्षांत एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत बँका आणि गृहवित्त कंपन्यांच्या घरांसाठी कर्ज वितरणात मागील वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ३२.७ टक्क्यांची घसरण दिसली आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या सांख्यिकी संस्थेने पुढे आणली आहे. गत पाच वर्षांतील ही गृहकर्जाच्या मागणीतील सर्वात मोठी घसरण आहे. २०१५-१६ सालात गृहकर्ज वितरणात ४.२७ टक्क्यांची तर त्या आधी २०१४-१५ सालात ही घसरण २६.८९ टक्क्यांची होती. नोटाबंदी, त्यापाठोपाठ आलेले ‘रेरा’ हे नियामक प्राधिकरण ज्यामुळे नवीन गृहप्रकल्पांच्या प्रस्तुतीला चाप बसला. १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्याने बांधकाम सामग्रीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे विकासकांनीच नवीन प्रकल्पाचे काम थांबविले, अशी विश्लेषकांनी या घसरणीची कारणमीमांसा केली आहे.
गेल्या वर्षभरात गृहकर्जावरील व्याजाचे दर हे दीड ते दोन टक्क्यांनी कमी झाले आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गृहकर्ज स्वस्त करताना, ते ८.३० टक्के असा सर्वात कमी व्याजदराने घर इच्छुकांना देऊ केले आहे. स्टेट बँकेपाठोपाठ अन्य काही बँकांनी व्याजाचे दर या निम्न पातळीवर आणले आहेत. गेल्यावर्षी नोटाबंदीपश्चात, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये घरांच्या विक्रीत ४१ टक्क्यांची घट दिसून आली आहे. घरांसाठी मागणी नसल्याचा परिणाम गृहकर्जाच्या मागणीवरही गंभीररूपात झाला असल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002