व्हीएस न्यूज - WWE (वर्ल्ड रेसलिंग इन्टरटेंनमेंट) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच द ग्रेट खली या भारतीय पैलवानाचं नाव येते. खलीनंतर जिंदर महलनेही WWEमध्ये नाव कमावलं. आता यांच्याबरोबरीने पॉवरलिफ्टर चॅम्पियन कविता देवी ही WWEच्या रिंगणात उतरणार आहे. तिने नुकतेच यासंबंधी WWE बरोबर करार केला आहे. कविता देवी WWEमधील पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. जिंदर महलनेच यासंबंधीची माहिती आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान दिली.
मुळची हरयाणाची असलेल्या कविताने रेसलिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण द ग्रेट खली (दलीपसिंग राणा) याच्या पंजाबमधील अॅकडमीमध्ये पूर्ण केले आहे. महिला कुस्तीपटू बी बी बुल बुल विरूद्ध लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कविता देवी कमालीची लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे कविता देवीने २०१६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
कविता देवीने यापूर्वी महिलांच्या मई यंग क्लासिक टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यापासून WWEच्या ओरलँडो येथील परफॉर्मन्स सेंटरमध्ये तिच्या प्रशिक्षणास सुरूवात होईल. WWEमध्ये सहभागी होणारी भारताची पहिली महिला खेळाडू होणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे कविता देवीने म्हटले आहे. मई यंग या जागतिक स्पर्धेत सहभाग नोंदवल्याचा मोठा फायदा झाला. जागतिक दर्जाच्या महिला रेसलरचा यात समावेश होता. माझ“यासाठी ही स्पर्धा अनुभव देणारी ठरली. आता WWE च्या महिला चॅम्पियनशीपचं जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्याची मला संधी आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.
जिंदर महलने कविताला शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, कविता WWEमध्ये येणे हे गौरवास्पद आहे. भारताची पहिला महिला WWE स्टार होण्याची तिला संधी आहे. भारतीय युवकांची ती प्रेरणास्थान ठरेल. तिच्या कारकिर्दीस शुभेच्छा. त्याचबरोबर WWE ने आणखी एका महिला खेळाडूंचा आपल्या चॅम्पियनशीपमध्ये समावेश केला आहे. जॉर्डनची शादिया बेसिसोबरोबरही त्यांनी करार केला आहे. WWE च्या रिंगणात उतरणारी ती पहिला अरब महिला ठरेल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002