व्हीएस न्यूज - भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर १९ विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून भारताने दुबळ्या झिम्बाब्वेवर १० गडी राखून मात केली. भारतीय संघाने याआधी साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीआ संघांना पराभवाचा धक्का दिला होता.
भारतीय आक्रमणाला सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाला तोंड देता आले नाही. २० धावांच्या मोबदल्यात ४ फलंदाजांना भारताचा डावखुरा फिरकीपटू अनुकूल रॉयने माघारी धाडले. अभिषेक शर्माने २२ धावांत २ बळी मिळवले. झिम्बाब्वेचा संघ गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे ४८.१ षटकात १५४ धावांत गारद झाला.
भारतीय संघाने प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचे आव्हान सहजरित्या पार केले. भारताला सलामीवीर शुभमन गिल आणि हार्विक देसाईने अर्धशतकी खेळी करुन विजय मिळवून दिला. शुभमनने ५९ चेंडूत ९० धावांची खेळी केली तर हार्विक देसाईने ७३ चेंडुत ५६ धावांची खेळी केली. भारताने २१.४ षटकांमध्ये झिम्बाब्वेने दिलेले आव्हान पूर्ण केले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने स्वतः भारतीय संघाच्या डावाची सुरुवात न करता इतर फलंदाजांना फलंदाजीचे कौशल्य आजमावण्याची संधी दिली.