व्हीएस न्यूज - कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये काही अमुलाग्र बदल करत आयसीसीने काही दिवसांपूर्वी कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेत आयसीसीशी संलग्न असलेल्या प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सामने खेळायचे आहेत. २०१९ च्या विश्वचषकानंतर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेत सहभागी होण्याआधी आयसीसीवर दबावतंत्र टाकायला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने द्विपक्षीय कराराचं पालन केलं तरच आम्ही आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेत भाग घेऊ असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
” जोपर्यंत बीसीसीआय आमच्यात झालेल्या कराराचं पालन करत नाही, तोपर्यंत आम्ही वन-डे लीग आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या करणार नाही. या कराराचं पालन झालं तरच पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवेल”,असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
जर भारत-पाक सामन्यांशिवाय आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेला महत्व प्राप्त होणार नाही. प्रत्येक क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयसीसीच्या करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. मात्र २०१४ साली बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या कराराचं बीसीसीआय पालन करत नाही. तोपर्यंत पाकिस्तान आयसीसीच्या करारावर स्वाक्षऱ्या करणार नाही असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलाय.
२०१४ साली भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारानूसार दोन्ही संघाना २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळणं अनिवार्य होतं. मात्र पाकिस्तानकडून सतत होणारे अतिरेकी हल्ले पाहता, भारताने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे क्रीडासंबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारत-पाक क्रिकेट सामन्यांचं घोंगड हे भिजत पडलंय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या भूमिकेवर आयसीसी काय निर्णय घेतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002