टीम इंडियाची अंडर १९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक
ख्राईस्टचर्च
2018-01-30
व्हीएस न्यूज – भारताने आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवला असून भारताने या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली आहे. ३ फेब्रुवारीला आता भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने शुभम गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय गोलंदाजांनी या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघावर जोरदार हल्ला करत ६९ धावांवरच रोखले आणि विजय मिळवला.
भारतीय गोलंदाजांसमोर भारताच्या २७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी गुडघे टेकले. २० च्यावर धावा पाकच्या एकाही फलंदाजाला करता आल्या नाही. भारताकडून इशान पोरलने ६ षटकांमध्ये १७ धावा देत ४ गडी बाद केले. त्याने दोन निर्धारीत षटकेही टाकली. तर शिवा सिंग व रायन परागने प्रत्येकी दोन आणि अभिषेक शर्मा व अनुकूल रॉयने प्रत्येकी एक गडी बाद केला.