व्हीएस न्यूज - कोलकात्यात १६ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या जागी कर्णधारपदी रोहित शर्माची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. करीयरच्या महत्वाच्या टप्प्यावर असलेला विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. परंतू विराट काही दिवसांसाठी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ३१ वे शतक झळकवून विराटने सर्वाधिक शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र विराटला काही दिवसांसाठी क्रिकेटमधून ब्रेक हवा आहे. तसे त्याने बीसीसीआयला कळवले आहे. विराटने खासगी कारणांसाठी विश्रांती मागितली असल्याने पुन्हा एकदा त्याच्या आणि अनुष्काच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान विराट सुट्टीवर गेल्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी लागू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी कर्णधारपदी रोहितची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने मुंबईकर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीसाठी रहाणेला कर्णधारपद मिळू शकते. बीसीसीआयने दोन कसोटींसाठी संघ निवडला आहे. विराट तिस-या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे.
विराटच्या जागी रोहितची निवड करण्यामागे फॉर्म किंवा लीडरशीप क्वालिटी याचा काहीही संबंध नाही. फक्त भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता तात्पुरत्या स्वरुपाचा हा बदल केला जाऊ शकतो.
विराटच्या सुट्टी अर्जाबाबत नेमके कारण समोर अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मात्र, डिसेंबर महिन्यात विराटला अनुष्कासोबत लग्न करायचे असल्याने त्याने बोर्डाकडे सुट्टीची मागणी केली आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर दुसरीकडे जानेवारी २०१८ला टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वीच विराट-अनुष्काला लग्नगाठ बांधायची असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
कोहलीची विश्रांती लांबवली-
संघ निवडीआधी कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती मिळणार असल्याची मोठी चर्चा रंगली होती. मात्र, कोहलीने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका आणि लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यादरम्यान ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता व नागपूर येथे खेळविण्यात येतील. त्याचवेळी, कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये कोहलीला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, यानंतर होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खडतर दौ-यासाठी कोहली तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002