व्हीएस न्युज - पिरगुंट येथील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत हकनाक बळी गेलेल्या १५ कर्त्यां महिलांचे कुटुंबीय सुन्न झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिला कंपनीच्या पॅकिंग विभागात काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. सोमवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेची वार्ता कळताच महिलांच्या कुटुंबीयांवर आघात झाला असून या दुर्घटनेने मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे परिसरावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गीता भारत दिवारकर (वय ३८) मूळच्या मुंबईच्या होत्या. पती आणि मुलांसोबत त्या उरवडे परिसरात स्थायिक झाल्या होत्या. गीता यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर त्यांची बहीण जयश्री मोरे यांना अश्रू अनावर झाले. जयश्री मोरे म्हणाल्या, ‘गीता खूप कष्टाळू होती. मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना मोठे करण्याचे तिचे स्वप्न होते. कष्ट करून तिने उरवडे परिसरात दोन खोल्यांचे घरबांधले. दहा महिन्यांपूर्वी गीता या कंपनीत नोकरीला लागली. तिच्या पतीला गुडघ्यांचा त्रास आहे. गीताने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. मुलं हाताशी येत असताना काळाने तिच्यावर घाला घातला.’
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या त्रिशला संभाजी जाधव (वय ३३) मूळच्या सोलापूरच्या होत्या. नोकरीच्या शोधात त्या मुळशीत स्थायिक झाल्या होत्या. मनमिळावू स्वभावाच्या असलेले जाधव दाम्पत्याचे सर्वाशी चांगले संबंध होते. त्यांना मुले आहेत. या दुर्घटनेमुळे आम्हाला धक्का बसला असून त्यांचे कुटुंबीय सोलापूरहून पुण्याकडे येत आहेत, असे जाधव दाम्पत्याचे शेजारी राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली आणि त्याला जबाबदार कोण यासाठी शासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सांगितले. उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची वळसे पाटील यांनी पाहणी केली. मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे या वेळी उपस्थित होते.
स्वप्नांची राखरांगोळी
रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व जण कष्टकरी वर्गातील होते. प्रत्येकाला मुलांना मोठे करायचे होते. नोकरीच्या शोधात त्यांनी मिळेल ते काम केले. एक नोकरी गेल्यानंतर पुन्हा दुसरी मिळवून सर्व जणी संसाराचा गाडा हाकत होत्या. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्वच महिलांच्या कुटुंबावर मोठा आघात झाल्याची भावना नातेवाईक व्यक्त करत होते.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002