व्हीएस न्यूज - इमारतीसमोर टेम्पो पार्क करण्यासाठी भाजी विक्रेत्यांकडे सुरक्षारक्षकाने हप्ता मागितला. मात्र, भाजी विक्रेत्यांनी हप्ता देण्यास नकार दिला. यावरून सुरक्षा रक्षकासह पाच जणांच्या टोळक्याने 13 टेम्पोची तोडफोड केली. तसेच या टोळक्याने एकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. याबाबत पाच जणांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि. 11) सकाळी म्हातोबानगर, वाकड येथे उघडकीस आला.
पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. सुरक्षारक्षक किरण प्रकाश घाडगे (वय 25), चंद्रकांत सीताराम गायकवाड (वय 22), मयूर संजय अडागळे (वय 26), सागर प्रकाश घाडगे (वय 27, सर्व रा. म्हातोबानगर, वाकड), अविनाश नलावडे (रा. आदर्शनगर, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मारुती साहेबराव काळे (वय 30, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण घाडगे हा म्हातोबानगर येथील एका व्यावसायिक वापराच्या इमारतीचा सुरक्षारक्षक आहे. या इमारतीसमोर म्हातोबानगर परिसरातील भाजी विक्रेते त्यांचे टेम्पो पार्क करतात. मागील काही दिवसांपासून किरण घाडगे भाजी विक्रेत्यांकडे टेम्पो पार्क करण्यासाठी हप्ता मागत होता. मात्र, भाजी विक्रेत्यांनी किरण याला हप्ता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो चिडून होता.
दरम्यान, गुरुवारी रात्री फिर्यादी काळे टेम्पो पार्क करून रस्त्यावर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी घाडगे याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडे ‘महिना दोन हजार रूपये हप्ता द्या. नसता तुम्हाला धंदा करू देणार नाही’, अशी मागणी केली. त्यावर काळे यांनी हप्ता देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी किरण घाडगे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तेरा टेंम्पोची तोडफोड केली.
तोडफोड करणाऱ्या टोळक्यावर जबरी चोरीचाही गुन्हा दाखल
आरोपींनी टेम्पोची तोडफोड केल्यानंतर सचिन अशोक शेलार (वय 26, रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शेलार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी मारहाण करीत त्यांच्या खिशातील 600 रुपये जबरदस्ती काढून घेतले. याबाबत शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002