व्हिएस न्यूज - सर्वसामान्य पुणेकरांसाठी पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर रेल्वेकडून तिकिट अथवा पास मिळेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळाली आहे. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून ओळखपत्र द्यावे लागेल. हे ओळखपत्र पुण्यामध्ये कोणाकडून दिले जाणार याबाबत मात्र रेल्वेकडून सांगण्यात आलेले नाही.
यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांकडून क्यूआर कोड देण्यात येत होता. तो क्यूआर कोड रेल्वे स्टेशनवर दाखवल्यानंतर तिकिट अथवा पास दिला जात होता. मात्र आता सर्व नागरिकांसाठी लोकल सेवा सुरु झाली असल्याने नागरिकांना दोन्ही डोस नंतर 14 दिवस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र स्थानिक प्रशासनाकडे देऊन त्यांच्याकडून ओळखपत्र घ्यावे लागेल.ते ओळखपत्र रेल्वेकडे द्यावे लागणार आहे.
त्यानुसार रेल्वेकडून नागरिकांना तिकिट अथवा पास दिला जाणार आहे. लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू झाल्याचा आनंद असला तरी दोन्ही डोस झाल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाल्याचे ओळखपत्र नेमके पोलीस की महापालिका यापैकी कोणाकडून घ्यायचे याबाबत मात्र साशंकता आहे.
राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळावी यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी मागणी केली होती. मुंबई प्रमाणेच पुणे- लोणावळा लोकल सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पाठपुरावा केला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002