व्हीएस न्यूज - २०१७ वर्षापाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचं २०१८ या आगामी वर्षातलं वेळापत्रकही व्यस्त असणार असे संकेत मिळत आहेत. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ३ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. वर्षभर घरच्या मैदानावर खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा भारतासाठी एखाद्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिला परदेश दौरा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर ८ ते २० मार्चदरम्यान भारतीय संघ श्रीलंकेत तिरंगी वन-डे मालिका खेळणार आहे. भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या ३ संघांमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक संघ दोन सामने खेळणार असून अंतिम सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडीयमवर खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या तिरंगी मालिकेचं आयोजन केलेलं आहे. १९९८ साली श्रीलंकेच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त निधास चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिरंगी मालिकेत सहभागी होण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला विनंती केली होती. यानंतर बीसीसीआयने श्रीलंका आणि भारत यांच्यात घरच्या मैदानावर छोटीशी मालिका खेळण्याची अट घातली होती. यानूसार भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यानंतर बीसीसीआयने तिरंगी मालिकेत आपण सहभागी होत असल्याचं कळवलं आहे.
“श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने आयोजित मालिकेत भारतीय संघाला सहभागी होता आलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. श्रीलंका हा आमचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे या महत्वाच्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या तिरंगी मालिकेचं आमंत्रण आम्ही स्विकारलं आहे.” बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने, ६ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002