दहा षटकांचे क्रिकेट सामने ऑलिम्पिकसाठी योग्य - सेहवाग
मुंबई
2017-12-01
व्हीएस न्यूज - क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग व्हावा, अशी साऱ्यांचीच इच्छा आहे. जर सामने १० षटकांचे खेळवण्यात आले तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता येऊ शकतो, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.
‘‘क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता यावा, असे आपण सारेच म्हणत आहोत. माझ्या मते दहा षटकांचे सामने खेळवले तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता येऊ शकतो. दहा षटकांचे सामने हे फुटबॉलच्या लढतींसारखे ९० मिनिटांमध्ये संपतील. त्यामुळे दहा षटकांच्या सामन्यांचा आराखडा मला ऑलिम्पिकसाठी योग्य वाटतो,’’ असे सेहवाग म्हणाला.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी-१० क्रिकेट लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये सेहवाग हा ‘मराठा अरेबियन्स’ या संघाचा कर्णधार आहे. ही लीग १४-१७ डिसेंबर या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. सेहवागच्या संघात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर व कामरान अकमल यांचा सहभाग आहे.