व्हीएस न्यूज - गेली १८ वर्ष भारतीय गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे बाळगणारा आशिष नेहरा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. येत्या १ नोव्हेंबरला आशिष नेहरा न्यूझीलंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळणार आहे. नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.
होय, आशिष नेहराने आपल्या निवृत्तीचा निर्णय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपर्यंत आशिष नेहरा खेळणार होता, मात्र यानंतर आपल्या निवृत्तीसाठी हीच वेळ योग्य असल्याचं बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणलं आहे. आशिष नेहरानंतर भारतीय गोलंदाजीची धुरा ही भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या त्रिकुटावर असणार आहे. याचसोबत आशिषने आगामी आयपीएल हंगामातही न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. २०१७ साली झालेल्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे आशिष नेहरा आयपीएलचे सामने खेळू शकला नव्हता.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानूसार न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर आशिष नेहरा आपल्या निवृत्तीची घोषणा करु शकतो. नेहराने आतापर्यंत १७ कसोटी, १२० वन-डे आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र अनेक वेळा दुखापतीमुळे नेहराला संघाबाहेर बसावं लागलं होतं. आपल्या १८ वर्षांच्या कालावधीत आशिष नेहराने भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली आहे. विशेषकरुन टी-२० सामन्यांमध्ये नवीन चेंडु हाताळण्याची आशिष नेहराची हातोटी वाखणण्याजोगी आहे. याच कारणासाठी निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आशिष नेहराला संघात जागा दिली आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात नेहराला संघात जागा मिळाली नव्हती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002