फेडरेशन कप योगा स्पर्धेत सुशांत तरवडेला तीन सुवर्ण, महाराष्ट्राला 14 पदके
पिंपरी-चिंचवड
2017-12-16
व्हिएस न्यूज - कर्नाटक स्टेट अमॅच्युर योगा असोसिशन यांच्या वतीने व योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय फेडरेशन कप व आंतरराष्ट्रीय योगा मोहत्सवात महाराष्ट्राला 14 पदके मिळाली. तर महाराष्ट्राच्या सुशांत तरवडेने तीन सुवर्ण पदके पटकाविली.
कर्नाटक येथील शांतीवन धर्मस्थळ येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अशोककुमार अगरवाल, वीरेंद्र हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत देशातील 28 राज्यातील व इराण, व्हतनाम या देशातील आंतरराष्ट्रीय योगपटू मिळून एकूण 450 स्पर्धकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रा संघाबरोबर संघव्यवस्थापक म्हणून अनिता पाटील, प्रशिक्षक म्हणून जतीन सोळंकी, महाराष्ट्र योगा असोसिशनचे चंद्रकांत पांगारे उपस्थित होते.
महाराष्ट्र संघातील यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे : देवदत्त भारदे याने 17 ते 25 वयोगटात योगासन प्रकारात चौथा, सुशांत तरवडे यांनी 17 ते 35 वयोगटात आर्टिस्टिक सिंगल प्रकारात प्रथम, चंद्रकांत पांगारे यांनी 17 ते 60 वयोगटात योगासन प्रकारात द्वितीय, सुशांत व देवदत्त यांनी 17 ते 35 वयोगटात आर्टिस्टिक पेअरमध्ये प्रथम, देवदत्त व सुशांत यांनी 17 ते 35 वयोगटात रिदमिक पेअरमध्ये द्वितीय, श्रेया कंधारे हिने 7 ते 17 वयोगटात आर्टिस्टिक सिंगलमध्ये चौथा यांनी यश संपादन केले.
आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात देवदत्त्त भारदे याने 17 ते 25 वयोगटात योगासन प्रकारात चौथा, सुशांत तरवडे यांनी 17 ते 35 वयोगटात आर्टिषस्टिक सिंगलमध्ये प्रथम, देवदत्त व सुशांत यांनी 17 ते 35 वयोगटात रिदमिक पेअर प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला.
या यशस्वी स्पर्धकांचे महाराष्ट्र योगा असोसिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, अनिता पाटील यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.