व्हीएस न्यूज - पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वासीम अक्रमने सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा खरा हिरो म्हटले आहे. एका पुस्तक प्रदर्शनाच्या सोहळ्यादरम्यान झालेल्या चर्चेमध्ये अक्रमने सचिनवर स्तुती-सुमने उधळली.‘गल्फ न्युज’वरून या कार्यक्रमातील चर्चेचे प्रेक्षेपण करण्यात आले.
सचिन एक उत्तम खेळाडू तर आहेस शिवाय तो एक महान व्यक्तीही आहे. इतक्या दिर्घ कारकिर्दीमध्ये सचिनचे नाव कोणत्याच वादात आले नसल्याचे कौतूक वाटते असे अक्रम म्हणाला. खेळाच्या मैदानावर आणि बाहेर म्हणजेच‘ऑन अॅण्ड ऑफ द फिल्ड’ सचिन नेहमी क्रिकेटच जगत आला. सचिनच्या रुपात जगाने सर्वात महान खेळाडूचा खेळ पाहिल्याचे समाधान अक्रमने व्यक्त केले.
सचिनबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दलच्या आठवणींनाही अक्रमने यावेळी बोलताना उजाळा दिला. जेव्हा मी सचिनला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच या मुलात काहीतरी खास असल्याचे मला जाणवले. पाकिस्तान विरुद्धच त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याचे खेळण्याचे तंत्र आणि पद्धत पाहून मला आश्चर्य वाटले. त्याच्या आवडत्या लेंथला चेंडू टाकल्यावर तो ज्याप्रकारे चेंडूवर तुटून पडायचा ते पाहून आश्चर्यच वाटायचे असे अक्रमने सांगितले. सचिनच्या पदार्पणात मला वाटलेली शक्यता त्याने खरी करुन दाखवली आणि विशेष म्हणजे मी त्याची प्रत्येक झेप पाहिली आहे. त्याचे आवडते फटके खेळताना मी त्याला मैदानात पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शकत साजरे करुन तो क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या पंक्तीमध्ये सामिल झाल्याचे अक्रम म्हणाला.
अक्रमने भारताचे आघाडीचे माजी फलंदाज सुनिल गावस्कर यांचीही भरभरून स्तृती केली. मी अनेक महान फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. मात्र भारताच्या सर्वोत्तम आघाडीच्या फलंदाजांपैकी एक असणाऱ्या सुनिल गावस्कर यांची विकेट माझ्यासाठी नेहमीच खास राहील. आजच्या खेळाडूंना फलंदाजी कशी करावी हे शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी गावस्करांची फलंदाजी नक्की पहावी. हेल्मेट न घालता फलंदाजी करणारा हा फलंदाज कायमच अव्वल राहिल्याचे विशेष कौतूक वाटते असेही अक्रम म्हणाला.
कोहली सध्याचा सर्वोत्तम खेळाडू
तीनही प्रकराच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा संभाळणाऱ्या विराट कोहलीला अक्रमने सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये अत्तापर्यंत ३२ शतके केली आहे. त्यातील अनेक शतके ही प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना म्हणजे दुसऱ्या डावात झळकवली आहेत यावरूनच कोहलीचा दर्जा कळून येतो असे अक्रम म्हणाला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002