व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून आले आहेत. गावडे पॅनेलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांना एकूण 2534 मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना 2525 मते मिळाली आहेत.
परंतु अंबर चिंचवडे यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी अध्यक्ष पदाचा निर्णय राखून ठेवला आहे.
शुक्रवारी( दि. 25 फेब्रुवारी) मतदान झाले यानंतर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 10 पैकी 8 पदाधिकारी निवडून आले. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले.
तर आपला महासंघ पॅनेलचा सुप्रिया सूरगुडे यांनी उप अध्यक्ष पदासाठी 2616 मते मिळवून विजय मिळवला.चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 25 पैकी 18 उमेदवार निवडून आले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना 2682, महादेव बो यांना 2608, सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना 2683, चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना 2615, सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना 2665, कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना 2640, संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना 2702, मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना 2615 मते मिळाली आहेत.
अध्यक्ष पदाचा निर्णयाबाबत निवडणूक अधिकारी तुकाराम जाधव सोमवारी माहिती देणार आहेत.
व्हीएस न्यूज - मराठी व हिन्दी रंगभूमीचे सिने कलाकार श्रेयस तळपदे यांनी नुकतीच पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्चला भेट दिली.
डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलचे विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांना आमंत्रित केले होते. यावेळी श्रेयस यांचे समारंभपूर्वक स्वागत केले तसेच रुग्णालयातील सुविधांना भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधला.
हॉस्पिटल बद्दल बोलताना सिने अभिनेते श्रेयस तळपदे म्हणाले “2011 खाटांच्या या रुग्णालयामध्ये पायाभूत व जागतिक दर्जाच्या सेवा आणि सुविधापाहून मी भारावून गेलो आहे आणि आज मला खूप आनंद होत आहे हे रुग्णालय अनेक रुग्णांना सर्वोत्तम रुग्णसेवा देण्यास सक्षम आहे”.
या दरम्यान त्यांनी बालरोग वॉर्डला भेट दिली आणि तेथे दाखल असलेल्या मुलांशी संवाद साधला यावेळी रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आधुनिक लायब्ररी, पर्यावरणपूरक ऑपरेशन थिएटर, आय व्ही एफ सेंटर, 3 टेस्ला विडा मशीन, दा विंची 4 जनरेशन रोबोटिक सर्जरी युनिट आणि 24X7 यशोदा माता दुग्ध पेढी तसेच अत्याधुनिक 140 खाटांच्या ICU सुविधाना भेटी दिल्या हे सर्व पाहून त्यांनी हॉस्पिटलचे कौतुक केले.
"मराठी चित्रपट, हिंदी मालिका, सिनेमा, नाटक अश्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने नाव कमावले आहे. भूमिका कोणतीही असो आपल्या उत्तम अभिनयाने श्रेयस तळपदे नेहमीच स्वतःची अशी वेगळी छाप सोडत असतात" असे मत डॉ. यशराज पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी पाटील व प्र - कुलपती डॉ भाग्यश्रीताई पाटील या दोघांनीही सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या मराठी व हिंदी रंगभूमीवरील दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या पुण्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ आज राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील १०९८ उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही श्री. निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील ६६६ पदांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील १०९८ परीक्षा केंद्रांवर ३ लाख ६२ हजार ३१९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाला आणि कर्वे रोडवरील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या केंद्रांवर सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेची निंबाळकर यांनी पाहणी केली.
दि. २३ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात आली, त्यावेळीही नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती.
भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’ मध्ये – निंबाळकर
राज्यातील सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ सुरळीतपणे पार पडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.
स्वतः अध्यक्ष परीक्षा केंद्रांना भेटी देत असून परीक्षा प्रक्रिया आणि नियोजनाची माहिती घेत आहेत. आयोगाकडे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया लवकर करण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’मध्ये असून दोन दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा निकाल व गुणवत्ता यादी त्याच दिवशी जाहीर केली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.
व्हीएस न्यूज - सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास असल्याने म्हाडाच्या घरासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. सर्वसामान्य नागरिकांचा हा विश्वास म्हाडाने जपावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या २७०३ नवीन सदनिका व ५८ व्यापारी संकुलासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात गरजूंना घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळाली. सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न आहे.
कोरोना संकट काळातदेखील म्हाडाने मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून दिली. म्हाडाच्या घरासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. म्हाडाच्या पारदर्शक कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास आहे. म्हाडाच्या घरामुळे गरजूंच्या घराची स्वप्नपूर्ती होते. सर्व सोयीसुविधायुक्त घरे देण्यासोबतच म्हाडाने पुणे शहराच्या विकासासाठी आणखी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुणे शहराची राज्यात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशी ओळख आहे. देशातही ही ओळख निर्माण करू, असेही अजित पवार म्हणाले.
व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी, विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्या वतीने (दि.२६) आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, शिक्षण समिती सदस्या अरूणा थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, नव्या युगाच्या आव्हानांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक नुकसान भरून काढावे लागणार आहे. कोरोनानंतर शाळेत येणारा विद्यार्थी ताणतणावात राहणार नाही, असे शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. पालकांचाही यामध्ये सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक, देशाचे भविष्य आहेत. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्यही त्यांना शिकवायला हवे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाइतकेच विज्ञान तंत्रज्ञान, कौशल्यांचा विकासही महत्वाचा आहे. कलाकौशल्यापासून संवाद कौशल्यापर्यंत प्रत्येक गोष्टी जमल्या पाहिजेत. समाजात यशस्वी झालेल्या व्यक्तींनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची सांगड घालून त्याचा उपयोग जीवनात केल्याने ते यशस्वी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा कित्ता गिरवला पाहिजे. त्यांच्यासारखी विज्ञानाची कास धरली पाहिजे. असे कौशल्य विद्यार्थ्यांनी मिळवावे त्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. शिक्षणाच्या प्रभावी उपयोगासाठी, देशाच्या, समाजाच्या विकासासाठी ते आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले बदल केले आहेत, राज्यातील काही भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला पायाभूत सुविधा देण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे. दुर्गम, डोंगरी भागातील शिक्षक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीही आपण सर्वतोपरी सहकार्य करू.
महिलांना सन्मान मिळाला पाहीजे, यासाठी राज्य शासनाने चौथे महिला धोरण आणण्याचा निर्णय घेतला असल्याचेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
जि.प. अध्यक्षा श्रीमती पानसरे म्हणाल्या, कोरोना कालावधातीही शिक्षकांनी ज्ञानदानाचे अत्यंत चांगले कार्य केले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरू राहीले. ग्रामीण भागातील अनेक शाळा आदर्श करण्यासाठी शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. शिवतरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सामान्य ज्ञान मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
व्हिएस न्यूज - पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिक्युअर आयटी सोलुशन कंपनीचा जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला, शहरातील अनधिकृत फ्लेक्स, मनपामध्ये जुन्या ठेकेदारांचे भाजपच्या पदाधिका-यांबरोबर संगनमत या विरोधात मी वेळोवेळी महानगरपालिके सभागृहात आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. याबाबत पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती आणि मला वेळोवेळी डावलण्याचे त्यांचे धोरण होते. त्याच्या निषेधार्थ मी गुरुवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे असे प्रतिपादन नगरसेवक तुषार कामठे यांनी केले.
शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तुषार कामठे यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर आणि मनपातील भ्रष्टाचारी अधिका-यांवर टिका केली. यावेळी ते म्हणाले की, महानगरपालिकेच्या तिजोरीची लुट करण्याचे स्थानिक भाजपा आमदार आणि पदाधिका-यांचे धोरण सामाजिक जाणिवेचे संस्कार घेऊन मी समाजकारणात आलो आणि पहिल्याच निवडणुकीत मायबाप जनतेने मला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. जनतेच्या डोळ्यात आशा होती, बदल घडण्याची तीच आशा माझी प्रेरणा झाली, आणि मी अथकपणे कामाला सुरुवात केली, मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेचा पाईक आहे.
केंद्रातील तसेच राज्यातील विविध नेत्यांचे विचार मला विकासाभिमुख वाटतात. म्हणूनच पाच वर्षात जे काही करायचं ते जनतेसाठी, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या लोकांसाठी हे मनाशी ठाम ठरवून मी शिकत गेलो, कामे करत गेलो, पण पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती, तरीही त्याकडे मी दुर्लक्ष करून सर्वांचा सन्मान करत होतो, सतत जमिनीवर राहून लोकांमध्ये काम करण्याचेच संस्कार असल्यामुळे लोकांच्या प्रश्नांची व वेदनांची जाणीव मला होतीच. त्यातूनच पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न हाती घेऊन मी आवाज उठवला आंदोलन केले, उपोषणही केले आणि विश्वास बसणार नाही असा जनसमुदाय माझ्यासोबत उभा राहिला, कचऱ्याच्या समस्यासाठीचे आंदोलन असेल, दारूचे दुकान बंद करण्यासाठीचे आंदोलन, अनधिकृत फ्लेक्सच्या विरोधात आंदोलनात तर माझ्यावरच गुन्हा दाखल केला.
जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवणे असो, जे काही शक्य होत ते सर्व मी गेली पाच वर्षे करत होतो, पण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माझ्या भाजप पक्षाचे शहरातील नेते, पदाधिकारी किंवा आमदार यांचे कधीच सहकार्य लाभले नाही, उलट माझी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अडवणूकच करण्यात आली ही वेदना अनेक दिवसांपासून मनात सलत होती. पण तरीही मी जनसेवेचा वसा सोडला नाही, आणि सोडणारही नाही.
नुकताच जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सिक्युअर आयटी सोलुशन या ठेकेदाराबद्दल मी पुराव्यांसाहित आवाज उठवला, पण शहरातील भाजप नेत्यांनी या विषयातही मला सहकार्य केले नाही, नाईलाजाने ह्या भ्रष्टाचाराबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता त्यांनी तात्काळ ह्या विषयात कारवाईचे आदेश दिले, वेळप्रसंगी माझ्या पक्षातील नेत्यावर जरी गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर परंतु माझ्या पिंपरी चिंचवडकर जनतेला मी कधीच धोका देऊ शकत नाही आणि भ्रष्टाचार कधीच खपवून घेऊ शकत नाही असे अजित पवार यांनी सांगितले आणि त्यानंतरच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाला.
त्यावेळी खऱ्या अर्थाने मी शहरातील नेत्यांमध्ये शोधत असलेली राजकीय प्रगल्भता आणि धडाडी मला अजित पवार यांच्यामध्ये दिसली. काहीही झाले तरी जनतेवर अन्याय होऊ द्यायचा नाही या भूमिकेतून त्यांनी मी दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक असूनही तात्काळ माझ्या रास्त मागणीची दखल घेतली आणि मला सर्वोतोपरी मदत केली. भारतीय जनता पक्षाचा मूळ सर्वसमावेशक विचार मला त्यावेळी त्यांच्यामध्ये दिसला आणि अनेक दिवसांपासून माझ्या मनात सलत असलेल्या वेदनेला फुंकर मिळाली, अशा प्रगल्भ नेत्यांचे सहकार्य मिळाले तर भविष्यात जनतेच्या आयुष्यात नक्कीच आमूलाग्र बदल घडविण्याची ताकद आपल्याला मिळेल हे लक्षात घेऊन पूर्ण विचाराअंती मी तुषार गजानन कामठे अधिकृतरित्या माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.पण जनतेशी माझी असलेली बांधिलकी आजन्म कायम राहिल यात तिळमात्रही शंका नाही. मायबाप जनतेने आजवर माझ्यावर जे प्रेम केलं, विश्वास दाखविला तोच विश्वास पुढच्या काळातही मला नक्कीच मिळेल असा विश्वास नगरसेवक तुषार कामठे यांनी व्यक्त केला.
व्हीएस न्युज - रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी आज रोजी पुणे शहरातील सर्व संघटना एकत्र आल्या जवळपास २५ हजार रिक्षा चालक आणि मालकांनी पुणे आरटीओ वरती भव्य मोर्चा काढला आणि तीव्र आंदोलन करण्यात आले,
ट्रान्सपोर्ट कमिटीमध्ये ओला उबेर मधील टू व्हीलर बंद करण्याचा ठराव पारित करून या वरती ताबडतोब बंदी आणून ओला उबेर मधून टू व्हीलर बुकिंग केले जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल,पुणे सायबर क्राईम ब्रँच यांच्यासोबत विभागाची बैठक सुरू असून कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने टू व्हीलर वाहतुकीबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत तपास सुरू आहे, मुक्त परवाना बंद करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला असून लवकरच मुक्त परवाना बंद होईल,असे आश्वासन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी यावेळी दिले,
येत्या दोन दिवसात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन चक्काजाम करू असा इशारा देखील यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला
महाराष्ट्र रिक्षा पंचायत बाबासाहेब कांबळे ,महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना किशोर चिंतामणी ,आम आदमी रिक्षा संघटना, श्रीकांत आचार्य सल्लागार ,संजय कवडे पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, अंकुश नवले भाजपा वाहतूक आघाडी, फारुख बागवाले आशीर्वाद रिक्षा संघटना,अजिंक्य रिक्षा संघटना नितीन भुजबळ आदी प्रमुख संघटनांनी यावेळी एकत्रित येऊन आंदोलन केले, याप्रमाणे अंदाजे 22 रिक्षा संघटनांचा पाठिंबा मिळाला व या संघटना देखील सहभागी झाल्या होत्या अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.
व्हिएस न्यूज - दहशतवादी विरोधी पथकाकडील अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीच्या मुसक्या अवळून त्याच्या ताब्यातील १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा सह ३३,४१,९००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कैलास साहेबराव पवार (वय-३५, रा. गडदेवस्ती, डोंगर गाव, पेरणे, पुणे) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ फेब्रुवारीला अंमलीपदार्थ विरोधी पथक-१ च्या पोलिसांना सदर आरोपी हा लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाडेबोल्हाई रोडवरील, गडदेवस्ती, डोंगरगाव याठिकाणी त्याच्या राहत्या घरातून गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी आरोपी पवार याने त्याच्या घरात व घरासमोर लावलेल्या करोला टोयाटो या चारचाकी गाडीत २५,७५,३००/- रु. किमतीचा १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील २५,७५,३००/- रु. किमतीचा गांजा, ५०,६००/- रुपये रोख रक्कम, १५,०००/- रुपये किमतीचा एक मोबाईल फोन व ७,००,०००/- रु. किमतीची कार असा एकूण ३३,४९,९००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-१ चे सहा. पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, विशाल दळवी, मारुती पारधी, राहुल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी येथील खराळवाडी परिसरातील खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आली. गणेश जयंती निम्मित खराळआई तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश जिनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. फुलांच्या आकर्षक रचना, रांगोळ्यांचे रेखीव गालिचे आणि रोषणाईने सजविलेल्या गणपती मंदिरांमध्ये शुक्रवारी सकाळपासून मंत्रोच्चाराला सुरुवात झाली. अथर्वशीर्ष पठण, गणेश वंदन, गणेश यागासह धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून भक्तांनी गणेश जन्म उत्साहात साजरा केला. सायंकाळी गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सन्माननीयांची उपस्तीथी लाभली त्यात नगरसेवक समीर मासुळकर , माजी नगरसेवक सद्गुरू कदम ,शिवसेनेचे भोसरी विधानसभेचे समन्वयक दत्तात्रय भालेराव ,पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपअध्यक्ष रीमा रंजन , सामाजिक कार्यकर्ते आझम पानसरे,सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड आदी मान्यवरांनी बाप्पांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला व खराळआई तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश जिनवाल आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
गणेश जयंती साजरी करण्यासाठी मंडळाचे आधार स्तंभ व सल्लागार अॅड. जयवीर यादव , उद्योजक- सुनील सुतार,कामगार नेते- नरेश जिनवाल,संपादक - सागर सूर्यवंशी ,उद्योजक -शैलेश मंगळवेढेकर, उद्योजक प्रकाश तेलंगी,सामाजिक कार्यकर्ते -सुभाष जिनवाल यांचे सहकार्य लाभले, या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष मोहम्मद दिकसंगी ,सजावट प्रमुख किरण साळुंखे ,सचिव निलेश दूनघव,वर्गणी प्रमुख सागर जोजन , खजिनदार नितीन दूनघव , सह खजिनदार संतोष शिंगे, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्युज - रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रोपांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, डॉ. कीर्ती गायकवाड, डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण, उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे यांच्या मार्गदर्शनखाली या सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तृतीयपंथीयांकडून काळेवाडी येथे वृक्षरोपण आणि रोपांचे वाटप करण्यात आले. यासाठी उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी व इतर कर्मचाऱ्यांचे साहाय्य लाभले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथीयांमार्फत नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच वाहतुकीचे व कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. नवीन थेरगाव रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात.
गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार आणि आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य अधिकारी बी.बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, मुकादम शिवपुत्र नंदर्गे, श्रीकांत कदम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे म्हणाले, की समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. तो बदलण्याची गरज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त तृतीयपंथीयांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. यापुढेही असे समाजहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही उंडे यांनी केले.
डॉ. कीर्ती गायकवाड म्हणाल्या, की आज प्रजासत्ताक दिना निमित्त रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे समाजाच्या दृष्टीने उचललेले पाऊल अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडे समाजाने एक आदर्श म्हणून पाहावे आणि त्याप्रमाणे कृती करावी. डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण आणि इतर सर्व रुग्णालयातील स्टाफने संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि तृतीयपंथी यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव तृतीयपंथी सिद्धी कुंभार यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या आणि सहभाग घेणाऱ्या नवीन थेरगाव हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी , उद्यान विभागाचे अधिकारी गोसावी साहेब आणि इतर कर्मचारी , वाहतूक विभाग पिंपरी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उंडे साहेब आणि इतर कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी, आणि पत्रकारांनी सर्वांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, सामाजिक कार्यास हातभार लावण्याचा निर्धार रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेने केला आहे या पुढे तृतीयपंथी लोकांसोबत समाजातील इतर घटकांची होईल तेवढी मदत करण्याचा निर्धार केला आहे. तृतीयपंथी सुद्धा ह्याच समाजाचा एक भाग आहे आणि त्यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा संविधानिक अधिकार आहेत याची जाणीव करून देण्यासाठी रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्था या पुढे काम करणार आहे .
व्हीएस न्यूज - चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आणि गुरुवारी (29 आणि 30 डिसेंबर) 'प्राचीन भारतीय संस्कृती' या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमाला आणि 'भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन' या विषयावरील कार्यशाळेचे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी चापेकर समितीचे अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे आणि कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी गिरीष प्रभुणे यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे (आयसीसीआर) अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
"भारतीय संस्कृतीचा उगम कधी आणि कसा झाला, भारतीयांचे मूळ भारतात आहे की भारताबाहेर याविषयीचे वास्तव समोर आणणारे वैज्ञानिक पुरावे गेल्या काही वर्षांत जगासमोर आले. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ वसंत शिंदे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय गटाने राखीगढी या हरियाणातील पुरास्थळाचे उत्खनन करून तिथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांचे डीएनए विश्लेषण केले. त्या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीनुसार राखीगढी येथे राहणारी माणसे आणि आजचे भारतीय यांच्या डीएनएमध्ये समानता असून, राखीगढी आणि आजचे भारतीय या दोघांचेही मूळ प्राचीन काळापासून भारतातच आहे. यापूर्वी सापडलेल्या पुरातत्वशास्त्रीय पुराव्यांना आता डीएनए अभ्यासाची जोड मिळाल्याने भारतीयांचे मूळ भारताबाहेर असल्याचा सिद्धांत आता कालबाह्य झाला असल्याचे वैज्ञानिक जगताने मान्य केले.
डॉ. वसंत शिंदे या संपूर्ण संशोधनाविषयी, तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी दोन भागांतील जाहीर व्याख्यानांतून 29 आणि 30 डिसेंबर रोजी सचित्र सादरीकरण करतील." "जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक स्थळे, रचना, कलाकृती, लिखित- मौखिक साहित्य, पारंपरिक कौशल्ये देशाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सर्व घटकांविषयीच्या शास्त्रीय नोंदी लोकसहभागातून जमा करून त्यांची सद्यःस्थिती नोंदविणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे.
या प्रकल्पासाठीची ही पहिली कार्यशाळा होत आहे. यात डॉ. प्रमोद दंडवते, डॉ. श्रीकांत गणवीर, गिरीश प्रभुणे, प्रदीप रावत, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुणचंद्र पाठक, रमेश पडवळ आणि मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत. त्याच प्रमाणे दोन्ही दिवस पारंपरिक कला आणि कौशल्यांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी सहभागींना मिळणार आहे", असे गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.
या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि वारसाप्रेमी यांनी नोंदणी केली आहे. डॉ. वसंत शिंदे यांची जाहीर व्याख्याने, तसेच कार्यशाळेतील काही व्याख्याने सोशल मीडियावर फेसबुक लाइव्हव्दारे ऑनलाइनही प्रसारित करण्यात येतील," असे प्रभुणे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - काळेवाडी फाटा येथील पीर बाबा मंदिराजवळ एका अज्ञात व्यक्तीने वाहनाने सात वर्षाच्या मुलाला त्याच्या आई आणि वडिलांना धडक देऊन पळून गेल्याची घटना पहाटे ०४.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. या अपघातात आई आणि वडील जखमी झाले पण सात वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेला.
संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले.
पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तिघांना एका वाहनाने धडक दिली. त्यानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सात वर्षांचा मुलगा संघर्ष याचा जागीच मृत्यू झाला होता तर त्याचे आई आणि वडील जखमी झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मूगळीकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि संतोष पाटील आणि सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हा तत्काळ उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सह पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, पोलीस नाईक अतिक शेख, पोलीस नाईक विक्रांत चव्हाण यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी काळेवाडी फाटा परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अज्ञात वाहन आणि वाहन चालकाचा सुगाव लागला आणि त्याला अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक आरसा आढळला होता. तो वाहनाच्या डाव्या बाजूचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरून देखील तपास करण्यात आला. हा अपघात एका अशोक लेलँड टेम्पोने केला असून तो टेम्पो थेरगाव येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला. त्यावरील चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी हा टेम्पो त्याचा मित्र तेजस शशिकांत बारसकर याच्याकडे होता. पोलिसांनी तेजस याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपघात झाल्यानंतर आरोपी तेजस घटनास्थळावरून घाबरून पळून गेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक जितेंद्र गिरनार करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002