व्हिएस न्यूज – अश्लील हावभाव करून वेश्यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विकासनगर, देहूरोड येथे सोमवारी (दि. 21) दुपारी करण्यात आली.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी वैशाली कपिल आशिवाल यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास देहूरोड- कात्रज बायपास मार्गावर विकासनगर, देहूरोड येथील द्वारका लॉजच्या समोर सात महिला उभ्या होत्या. त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातावरे करून थांबवत होत्या. तसेच अंगविक्षेप करून त्यांच्याशी लगट करून असभ्य वर्तन करीत होत्या. तसेच छेड काढून शब्दाने बोलून त्यांना वेश्यागमनासाठी उत्तेजित करीत होत्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. यातील मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगेला त्याच दिवशी वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॉम्प्लेक्सच्या समोर रिक्षा उभी करत असल्याने तो हे कृत्य केल्याच समोर आलं होतं. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर वाकड येथे 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या किरण घाडगेसह पाच जणांची वाकड पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढली आहे. संबंधित आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढली असल्याचं वाकड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
वाकड परिसरातील म्हातोबा नगर येथे नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असून त्याच्या समोर तेथील काही रिक्षा चालक रिक्षा उभी करत असत. तसेच, ते तिथे लघुशंका करायचे असं आरोपी सुरक्षा रक्षक घाडगे याचं म्हणणं असून त्यांना वारंवार सांगून ही ते तिथे रिक्षा पार्क करायचे. याचाच राग मनात धरून तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री इतर मित्रांच्या मदतीने पार्क केलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले होते.
व्हीएस न्यूज - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जातो, पण मुलींना बारावीपर्यंत शिक्षण मोफत असतानाही प्रत्यक्षात अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये शुल्क घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. इमारत निधी, शाळा परिसर विकास निधी, वार्षिक संमेलन, स्नेहसंमेलन या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट होते. शहरात ६२० शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. अनुदानित-विनाअनुदानित शाळांमध्येही मुलींकडून कुठलेही शुल्क आकारायचे नाही, असे स्पष्ट आदेशच आहेत. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच माहिती नियमित दिली जाते. पण, या संस्थांकडून सर्रासपणे शुल्काची वसुली केली जाते.
अनुदानित शाळांना वेतन तसेच, वेतनेतर अनुदान सरकारकडून मिळते. त्यासाठी दर महिन्याची बिले सरकारकडे सादर करावी लागतात. १९८६ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क त्यांच्या संख्येसह बँकेत सादर करावे, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षीच्या एकूण वसूल शुल्काच्या (१/१२) इतकी रक्कम शाळांनी सहकारी बँकेत भरायची. त्याचे प्रमाणपत्र दर महिन्याच्या पगार बिलासोबत जोडायचे आहे. मुलीने प्रवेश घेतल्यापासून एक महिन्याच्या आत प्रतिपूर्तीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे आहे.
शुल्क आकारण्याचा संबंधच येत नाही
विनाअनुदानित संस्थेत मुलींकडून आकारलेल्या शुल्काबाबत सरकारने नियम ठरविले आहेत. अनुदानित शाळांकडून संबंधित इयत्तेत आकारलेल्या प्रमाणित शुल्काइतकेच शुल्क आकारायचे आहे. सरकारकडून प्रतिपूर्तीने मान्य केलेले शुल्क, उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुल्क सोडून इतर कोणतेही शुल्क आकारूच नये, असे स्पष्ट आदेश आहेत. पण, या शाळाही अनुदानित संस्थांप्रमाणेच मुलींकडून पैसे वसूल करतात. शिवाय सरकारकडूनही पैसे वसूल करताहेत.
मुलींना बारावीपर्यंत शिक्षण मोफत असतानाही शुल्क वसूल करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी कराव्यात.
- विलास पाटील, तक्रार निवारण अधिकारी, शिक्षण विभाग
व्हीएस न्यूज – सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क धारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना देखील काही नागरीक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा बेशिस्त 153 नागरिकांवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे,
एमआयडीसी भोसरी (30), भोसरी (04), पिंपरी (17), चिंचवड (02), निगडी (01), आळंदी (06), चाकण (00), दिघी (01), सांगवी (05), वाकड (18), हिंजवडी (16), देहूरोड (09), तळेगाव दाभाडे (12), तळेगाव एमआयडीसी (16), चिखली (05), रावेत चौकी (05), शिरगाव चौकी (04), म्हाळुंगे चौकी (02)
व्हीएस न्यूज - इमारतीसमोर टेम्पो पार्क करण्यासाठी भाजी विक्रेत्यांकडे सुरक्षारक्षकाने हप्ता मागितला. मात्र, भाजी विक्रेत्यांनी हप्ता देण्यास नकार दिला. यावरून सुरक्षा रक्षकासह पाच जणांच्या टोळक्याने 13 टेम्पोची तोडफोड केली. तसेच या टोळक्याने एकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. याबाबत पाच जणांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि. 11) सकाळी म्हातोबानगर, वाकड येथे उघडकीस आला.
पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. सुरक्षारक्षक किरण प्रकाश घाडगे (वय 25), चंद्रकांत सीताराम गायकवाड (वय 22), मयूर संजय अडागळे (वय 26), सागर प्रकाश घाडगे (वय 27, सर्व रा. म्हातोबानगर, वाकड), अविनाश नलावडे (रा. आदर्शनगर, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मारुती साहेबराव काळे (वय 30, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण घाडगे हा म्हातोबानगर येथील एका व्यावसायिक वापराच्या इमारतीचा सुरक्षारक्षक आहे. या इमारतीसमोर म्हातोबानगर परिसरातील भाजी विक्रेते त्यांचे टेम्पो पार्क करतात. मागील काही दिवसांपासून किरण घाडगे भाजी विक्रेत्यांकडे टेम्पो पार्क करण्यासाठी हप्ता मागत होता. मात्र, भाजी विक्रेत्यांनी किरण याला हप्ता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो चिडून होता.
दरम्यान, गुरुवारी रात्री फिर्यादी काळे टेम्पो पार्क करून रस्त्यावर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी घाडगे याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडे ‘महिना दोन हजार रूपये हप्ता द्या. नसता तुम्हाला धंदा करू देणार नाही’, अशी मागणी केली. त्यावर काळे यांनी हप्ता देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी किरण घाडगे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तेरा टेंम्पोची तोडफोड केली.
तोडफोड करणाऱ्या टोळक्यावर जबरी चोरीचाही गुन्हा दाखल
आरोपींनी टेम्पोची तोडफोड केल्यानंतर सचिन अशोक शेलार (वय 26, रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शेलार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी मारहाण करीत त्यांच्या खिशातील 600 रुपये जबरदस्ती काढून घेतले. याबाबत शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा येथील संघटनेच्या शिबिरात घेतला निर्णय.
व्हीएस न्युज - कोरोना लॉकडाऊन मुळे मागील 14 महिने रिक्षा व्यवसाय बंद होता. यामुळे रिक्षाचे हफ्ते थकले आहेत. परंतु आता सरकारने लॉकडाऊन शिथील करताच फायनान्स कंपनीच्या वतीने रिक्षा कर्ज हफ्त्यासाठी तगादा लावण्यात येत आहे व रिक्षा ओढून नेल्या जात आहेत. यामुळे पुणे पिंपरी-चिंचवड सह महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालक त्रस्त झाले असून फायनान्स कंपनीच्या या मनमानी कारभारा विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर शुक्रवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 11.00 मोर्चा आंदोलन करण्यात येणार असून महाराष्ट्रातले सर्व विभागीय आयुक्त कार्यालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबासाहेब कांबळे यांनी केले आहे.
कष्टकरी पंचायत वतीने लोणावळा येथे संघटना पदाधिकारी यांचे पावसाळी विचार मंथन शिबीर आयोजित केले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसेच पुण्यामधील मोफत रिक्षा रुग्ण वाहिका सेवा उपक्रमातील सहभागी रिक्षा चालक योद्ध्ये यांचा बाबा कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी घर कामगार महिला सभा अध्यक्षा श्रीमती आशाताई कांबळे, कष्टकरी जनता आघाडीच्या महिला अध्यक्ष अनिता साळवे, उपाध्यक्ष जयश्री येडके, मधुरा डांगे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, कला आणि सांस्कृतिक आघाडी विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुराद काजी, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, विजय ढ़गारे, जाफर भाई शेख, संजय दौंडकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालक फेरीवाले घरकाम महिला बांधकाम मजूर व धारकांसाठी दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली सदर रक्कम लाभार्थींना मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु नुसती तुटपुंजी आर्थिक मदत करून चालणार नाही कोविड-19 मुळे कष्टकरी जनतेचे जग बदलले आहे आणि हातावर पोट असणाऱ्या या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कष्टकरी जनतेच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळीवर उपायोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी टास्क फोर्स स्थापन करावे अशी मागणी मी सरकारकडे केली आहे. रिक्षाचालकांचे, टेम्पो, ट्रक आणि सर्व वाहतूकदार यांचे हफ्ते थकल्यामुळे या गाड्या ओढून नेल्या जात आहेत. गुंडगिरी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली आहे, परंतु आयुक्त यात खोडा घालत आहेत या प्रश्नांची दखल घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक अठरा जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात यावे असे आवाहन यावेळी बाबा कांबळे यांनी केली आहे.
कष्टकरी जनता महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष पदी अनिता साळवे उपाध्यक्षपदी मधुरा डांगे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्षपदी शफिक भाई पटेल, कार्याध्यक्षपदी कुमार शेट्टी, उपाध्यक्षपदी अरशद अन्सारी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत कला व संस्कृती आघाडी महाराष्ट्र प्रमुख पदी मुराद काजी, लोणावळा शहराध्यक्षपदी आनंद सदावर्ते यांची निवड करण्यात आली, कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबू भाई शेख, टपरी हातगाडी पंचायत लोणावळा शहर अध्यक्ष गणेश चव्हाण, आनंद सदावर्ते, हाजी अब्बास खान, विनय बच्चे, भगवान धनवट, रवींद्र ताकतोडे, संजय डेंगळे, विलास केंद्रे, चंद्रकांत बालगुडे,सत्तार शेख यांनी परिश्रम घेतले आहेत.
व्हीएस न्यूज – नियमबाह्य कामे, कामचुकारपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.
प्रत्येक कामाचे ऑडीट केले जाणार असून निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्याची दक्षता सर्व अधिका-यांनी घ्यावी असेही ते म्हणाले. महापालिकेच्या निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालयास आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. 10 आणि 14 मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.
बैठकीस अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या मंगला कदम, वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे, मीनल यादव, नगरसदस्य तुषार हिंगे, केशव घोळवे, प्रमोद कुटे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहशहर अभियंता प्रविण लडकत, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सुनिल वाघुंडे,रामनाथ टकले, अनिल शिंदे, संदेश चव्हाण, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एस. शिंदे आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग स्तरावर चाललेली कामे, येथील समस्या, प्रश्न तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन, अतिक्रमण अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. जीर्ण वृक्षांची छाटणी, विद्युत तारांवर तसेच धोकादायक ठरणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी, हॉकर्सचे अतिक्रमण आणि व्यवस्थापन, ट्रांझिट कॅम्प, पाणी पुरवठा नियोजन याबाबत नगरसदस्यांनी विविध मुद्दे मांडले. नाल्यांची कामे तातडीने करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, पदपथावरील अतिक्रमण हटवावे, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून त्यावर तात्काळ कारवाई करावी, शाहूसृष्टी, सायन्स पार्क येथील तारांगण, विविध उद्यानांची कामे, रेंगाळलेली कामे, बर्ड व्हॅलीतील कामे, नालेसफाई, जलनि:सारणची कामे तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी मांडल्या.
बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. महसुली कामांचे नियोजन करुन ते वेळेत पार पाडावे. नालेसफाईचा साप्ताहिक अहवाल क्षेत्रीय अधिका-यांकडे नियमित सादर करावा, विविध विभागांशी संबंधित असलेल्या कामांबाबत एकत्रितपणे स्थळ पाहणी करुन कामाचे नियोजन करावे. तसेच विभागांतर्गत समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या.
शहरातील हॉकर्सचे नियोजन करण्याचे काम सुरु असून प्रत्येक भागाचा विचार करुन याबाबत व्यवस्थापन केले जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात येत आहे असे आयुक्त पाटील म्हणाले. अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करुन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिले. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन सुरु असून कोविड दक्षता समिती स्थापन केली जात आहे. या समितीच्या कामकाजाबद्दल आयुक्त पाटील यांनी बैठकीत माहिती दिली.
कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले. अधिकारी कर्मचा-यांनी चांगले काम करावे, नागरिकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना वेळेत दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा असतो त्यामुळे आपण तात्काळ उपलब्धता दाखविली पाहिजे असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. साळवे यांनी बैठकीत माहिती दिली.
व्हीएस न्युज - स्पा सेंटरमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून एका महिलेची सुटका केली आहे.
ही कारवाई बुधवारी (दि. 9) दुपारी म्हळुंगे येथे करण्यात आली. सुनास रचन मसी (वय 34, र म्हाळुंगे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी पाच वाजता स्पा सेंटरवर छापा मारला. या मध्ये पोलिसांनी एका महिलेची सुटका केली. या महिलेकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - पिरगुंट येथील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत हकनाक बळी गेलेल्या १५ कर्त्यां महिलांचे कुटुंबीय सुन्न झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिला कंपनीच्या पॅकिंग विभागात काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. सोमवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेची वार्ता कळताच महिलांच्या कुटुंबीयांवर आघात झाला असून या दुर्घटनेने मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे परिसरावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गीता भारत दिवारकर (वय ३८) मूळच्या मुंबईच्या होत्या. पती आणि मुलांसोबत त्या उरवडे परिसरात स्थायिक झाल्या होत्या. गीता यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर त्यांची बहीण जयश्री मोरे यांना अश्रू अनावर झाले. जयश्री मोरे म्हणाल्या, ‘गीता खूप कष्टाळू होती. मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना मोठे करण्याचे तिचे स्वप्न होते. कष्ट करून तिने उरवडे परिसरात दोन खोल्यांचे घरबांधले. दहा महिन्यांपूर्वी गीता या कंपनीत नोकरीला लागली. तिच्या पतीला गुडघ्यांचा त्रास आहे. गीताने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. मुलं हाताशी येत असताना काळाने तिच्यावर घाला घातला.’
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या त्रिशला संभाजी जाधव (वय ३३) मूळच्या सोलापूरच्या होत्या. नोकरीच्या शोधात त्या मुळशीत स्थायिक झाल्या होत्या. मनमिळावू स्वभावाच्या असलेले जाधव दाम्पत्याचे सर्वाशी चांगले संबंध होते. त्यांना मुले आहेत. या दुर्घटनेमुळे आम्हाला धक्का बसला असून त्यांचे कुटुंबीय सोलापूरहून पुण्याकडे येत आहेत, असे जाधव दाम्पत्याचे शेजारी राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली आणि त्याला जबाबदार कोण यासाठी शासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सांगितले. उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची वळसे पाटील यांनी पाहणी केली. मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे या वेळी उपस्थित होते.
स्वप्नांची राखरांगोळी
रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व जण कष्टकरी वर्गातील होते. प्रत्येकाला मुलांना मोठे करायचे होते. नोकरीच्या शोधात त्यांनी मिळेल ते काम केले. एक नोकरी गेल्यानंतर पुन्हा दुसरी मिळवून सर्व जणी संसाराचा गाडा हाकत होत्या. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्वच महिलांच्या कुटुंबावर मोठा आघात झाल्याची भावना नातेवाईक व्यक्त करत होते.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.
व्हीएस न्युज - पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गाैड यांच्यासह आठ जणांना अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनी तडकाफडकी निबंलित केले आहे.
अमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी दोन दिवसापुर्वी दिले आहे. एकाचवेळी वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याने खात्यात चर्चेला उधाण आले आहे.
नववर्षाच्या पार्श्वभुमीवर चरस हिमाचल प्रदेशातून रेल्वे मार्गे महाराष्ट्र व इतर राज्यात विक्रीसाठी आलेला दोघांना लोहमार्ग पोलिसांनी मागील वर्षी (२०२०) अटक केली होती. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रूपयांचा ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केला होता. हा चरस मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू येथे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर विक्रीसाठी वितरीत केला जाणार होता.
या चरसची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत १२० कोटी रुपये असल्याचे त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी सांगितले होते. ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. व्हिलेज शमशी, भुंतर, जिल्हा कूलु) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (वय ४०, रा. बंद्रोल, कुलु) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला हा तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे होता.
त्यावेळी त्यांनी तपासात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असल्याचे समजते. त्यानंतर एटीएसकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एटीएसने संबंधीत कारवाईच्या आधारे पुढे देखील कारवाई केली होती. त्यानंतर आता याच प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह आठ जणांना निलंबीत करण्यात आले आहे.
व्हीएस न्युज - तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर ही बातमी आवर्जून वाचा. नोकरदार तरुणाई सेक्सटॉर्शनची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येतेय. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करुन ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पुणे सायबर पोलिसांत या संदर्भात दोन गुन्हे तर 150 तक्रारी दाखल झाल्यानं खळबळ उडालीय.
पुण्यातील शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, लॉकडाऊन काळात घरी असताना फेसबुकवरुन एका मुलीची त्याला फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. त्यांच्यानंतर थेट व्हॉटसअॅप नंबर शेअर झाले आणि हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने याला नग्न होण्यास सांगितलं. यानेही प्रतिसाद दिला. नंतर थेट तोच व्हिडीओ व्हॅट्सअॅपला येऊन धडकला आणि पैश्याची मागणी होऊ लागली. पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर करेल असा दमही भरला. हे फक्त याच तरुणाच्या बाबत घडलं नाही तर पुण्यात 150 हून अधिक जणांच्या बाबत घडलंय. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा व्यक्तीचा समावेश आहे. भीती आणि बदनामीमुळे हे पैसे देऊन मोकळे झालेय. पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतलीय. दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहे.
काय काळजी घ्याल?
अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
परिचित नसल्यास व्हॅटसअॅप कॉलवर संवाद साधू नका
व्हिडीओ, छायाचित्र पाठवतांना विचार करा चुकीचं काही घडत असल्यास कुटुंबातील व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला किंवा पोलिसांशी संवाद साधा.
मनोरंजन किंवा कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर बघून सायबर गुन्हेगार तुमच्यावर पाळत ठेवतात. तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि सेक्सटॉर्शनचे शिकार बनतात. त्यामुळे काळजीपूर्वक सोशल मीडियाचा वापर करा.
व्हीएस न्युज - शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान शिवस्वराज्य दिन ते गांधी जयंती या दरम्यान राबविण्यात येणार आहे. अभियान गावागावात घराघरात पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले असून राज्यात आणि देशात या मोहिमेत पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावे. शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त पुणे जिल्हा मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी सभागृह पुणे जिल्हा परिषद येथे करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे), जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज राज्यभर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनविण्यासाठी एकजूटीने व एकदिलाने काम करावे. कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान आपण सुरु केले आहे हे अभियान पुणे जिल्हयाच्या आरोग्य, आर्थिक, सामाजिक विकासाला बळ देईल. छत्रपती शिवरायांनी, जिजाऊ मॉसाहेबांनी वसवलेल्या पुण्याचा गौरव वाढविण्याचा काम करेल, याची मला खात्री आहे.
सन 2016 मध्ये पुणे जिल्हा परिषदेने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याचा ठराव केला होता. आज तोच शिवराज्यभिषेक दिन राज्यस्तरावर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. ही जिल्हा परिषदेसाठी आनंदाची बाब आहे. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने आपण राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य गुढी उभारत आहोत. ही गुढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पताका आहे. अभिमान, स्वाभिमानाची ही पताका आपल्याला कायम फडकवत ठेवायची आहे. राज्याला, देशाला कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटातून आपल्याला राज्याला, देशाला बाहेर काढायचे आहे. सध्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा राज्य शासनाने जाहीर केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळेल. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. खबरदारी म्हणून प्रत्येक गावात तीस तीस बेडची कोरोना सेंटर उभारत आहोत. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाप्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिवस्वराज्य सुंदरग्राम अभियान, महिलांना सन्मान देण्यासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, महिला धोरणांबाबत राज्य नेहमी अग्रेसर आहे. मुलींना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत, राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु केली आहे. माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जिल्हयाने विविध अभियानात चांगली कामगिरी केली आहे, त्याचप्रमाणे कचरामुक्त, गावस्वच्छता, नालेसफाई, एक कुटुंब एक शोषखड्डा मोहिमेमध्येही जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेजारील गावांची कचरा समस्याबाबत महापालिका आणि ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावे. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे जिल्हा परिषदेने चांगला आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन.
जिल्ह्याच्या आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी केंद्रातून निधी आणि विविध योजना आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत राहू. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शिवस्वराज्य दिनी जिल्हा परिषदेने एक चांगला उपक्रम सुरु केला आहे. घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेबाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्य हे महत्वाचे असून त्यामुळे कचरामुक्त गाव, कचरामुक्त जिल्हा होणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कचरामुक्त पुणे जिल्हा अभियानाबाबत माहिती दिली. शोषखड्डे, उपयुक्तता व नियोजनाबाबत तालुका भोर येथील वाठार हिमा गावचे सरपंच संदीप खाटपे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत तालुका बारामती येथील जळगाव सुपेचे सरपंच श्रीमती कौशल्या खोमणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत पंचायत समिती शिरुरच्या सभापती मोनिका हरगुडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन करुन गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002