व्हीएस न्यूज - जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही आपला सुवर्णपदक पटकावत महिला कुस्तीपटूंचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे. साक्षीबरोबरच अन्य महिला कुस्तीपटूंनीही धमाकेदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. साक्षीने ६२ किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये न्यूझिलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
याशिवाय, भारतीय महिला कुस्तीपटूंनी स्पर्धेमध्ये नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत. यामध्ये साक्षी मलिकसह इतर कुस्तीपटूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटूंनी एकूण १० वजनी गटात पदके पटकावली आहेत. तर सुशीलकुमारने ७४ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाइलमध्ये न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरला चीतपट करत सुवर्ण पदक पटकावले आहे. याच गटात भारताच्या प्रवीण राणाने कांस्य पदक पटकावले.
माझ्यासाठी हा गौरवाचा आणि भावूक करणारा क्षण आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ३ वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. मी हा विजय माझे माता-पिता, गुरू सतपाल, अध्यात्मिक योगगुरू स्वामी रामदेव आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांना अर्पण करतो.’ असे ट्विटही सुशीलने आपल्या विजयानंतर केले. याबरोबरच महिला कुस्तीपटूंनी केलेली कामगिरी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असल्याचे त्याने म्हटले.
व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ६० वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता. आयओएच्या निवडणुकीतून मी माघार घेत असून,अध्यक्षपदासाठी बात्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खन्ना यांनी आयओए निवडणूक आयोगाला लिहिले होते. मात्र हे पत्र खन्ना यांनी ३ डिसेंबरची माघार घेण्याची मुदत उलटल्यानंतर पाठवले होते. त्यामुळे औपचारिकता म्हणून झालेल्या निवडणुकीत बात्रा यांना १४२ मते पडली, तर खन्ना यांना १३ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत.
भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष बिरेंद्र बैश्य हेसुद्धा सुरुवातीला अध्यक्षपदासाठी उत्सुक होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली. दिल्ली उच्च न्यायालयामुळे निवडणुकीपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते. क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून निवडणुकीला अंतरिम स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न क्रीडा प्रशासक अॅड. राहुल मेहरा यांनी केला. मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.
कोषाध्यक्ष पदासाठी आनंदेश्वर पांडे यांची निवड झाली आहे, तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत आर. के. आनंद यांनी जनार्दनसिंग गेहलोत यांचा ९६-३५ असा पराभव केला. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०३२च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या भारताच्या यजमानपदाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. या स्पर्धाच्या आयोजनासाठी सरकारचे आर्थिक बळ महत्त्वाचे असते.
- नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष.
व्हीएस न्यूज - क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग व्हावा, अशी साऱ्यांचीच इच्छा आहे. जर सामने १० षटकांचे खेळवण्यात आले तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता येऊ शकतो, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.
‘‘क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता यावा, असे आपण सारेच म्हणत आहोत. माझ्या मते दहा षटकांचे सामने खेळवले तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता येऊ शकतो. दहा षटकांचे सामने हे फुटबॉलच्या लढतींसारखे ९० मिनिटांमध्ये संपतील. त्यामुळे दहा षटकांच्या सामन्यांचा आराखडा मला ऑलिम्पिकसाठी योग्य वाटतो,’’ असे सेहवाग म्हणाला.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी-१० क्रिकेट लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये सेहवाग हा ‘मराठा अरेबियन्स’ या संघाचा कर्णधार आहे. ही लीग १४-१७ डिसेंबर या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. सेहवागच्या संघात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर व कामरान अकमल यांचा सहभाग आहे.
व्हीएस न्यूज - भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजनी गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलत हा पराक्रम केला. वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदकाची कमाई करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मलेश्वरीनं विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.
अमेरिकेतील अनाहिममध्ये आयोजित स्पर्धेत चानूने ४८ किलो वजनी गटात तिने सुरुवातीला स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलले. त्यानंतर जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलत तिने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले. यापूर्वी कर्णम मलेश्वरीनं १९९४ आणि १९९५ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. देशासाठी सुवर्ण कामगिरी केल्यानंतर चानूला अश्रू अनावर झाले. या स्पर्धेत थायलंडची सुकचारोनला रौप्य तर सेगुरा अना हिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चानूला अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर तिने पुन्हा एकदा आपल्यातील कसब दाखवून दिले.
व्हीएस न्यूज - २०१७ वर्षापाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचं २०१८ या आगामी वर्षातलं वेळापत्रकही व्यस्त असणार असे संकेत मिळत आहेत. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ३ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. वर्षभर घरच्या मैदानावर खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा भारतासाठी एखाद्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिला परदेश दौरा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर ८ ते २० मार्चदरम्यान भारतीय संघ श्रीलंकेत तिरंगी वन-डे मालिका खेळणार आहे. भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या ३ संघांमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक संघ दोन सामने खेळणार असून अंतिम सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडीयमवर खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या तिरंगी मालिकेचं आयोजन केलेलं आहे. १९९८ साली श्रीलंकेच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त निधास चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिरंगी मालिकेत सहभागी होण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला विनंती केली होती. यानंतर बीसीसीआयने श्रीलंका आणि भारत यांच्यात घरच्या मैदानावर छोटीशी मालिका खेळण्याची अट घातली होती. यानूसार भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यानंतर बीसीसीआयने तिरंगी मालिकेत आपण सहभागी होत असल्याचं कळवलं आहे.
“श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने आयोजित मालिकेत भारतीय संघाला सहभागी होता आलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. श्रीलंका हा आमचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे या महत्वाच्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या तिरंगी मालिकेचं आमंत्रण आम्ही स्विकारलं आहे.” बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने, ६ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.
फोर्ब्स मासिकाने दिला अहवाल
व्हीएस न्यूज - टेनिसपटू रॉजर फेडररच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्री़डा प्रकारात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, रॉजर फेडररने आतापर्यंत बक्षिसांच्या माध्यमातून ११ कोटी २ लाख ३५ हजार ६८२ अमेरिकी डॉलर्सची कमाई केली. फेडररने टायगर वुड्सच्या ११ कोटी ६१ हजार अमेरिकी डॉलर्स या कमाईला मागे टाकत, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू हा मान मिळवला.
गेल्या वर्षात दुखापतींमुळे ग्रासलेल्या फेडररला मैदानात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र यंदाच्या वर्षात रॉजर फेडररने दणक्यात पुनरागमन करत आपल्याला टेनिसचा अनभिषिक्त सम्राट का म्हणतात हे दाखवून दिलं. यंदा फेडररच्या खात्यात ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची विजेतेपदं जमा आहेत. याव्यतिरिक्त अन्य स्पर्धांच्या अंतिम फेरीतही फेडररने बाजी मारली आहे. या कामगिरीमुळे रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान मिळवलं.
२०१७ हे वर्ष रॉजर फेडररच्या कारकिर्दीसाठी अत्यंत सकारात्मक गेलं आहे. २००९ सालापासून फेडररने सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तर २००७ साली फेडररने सर्वाधिक स्पर्धांची विजेतेपदं पटकावण्याची किमया साधली. वर्षाच्या सुरुवातीस जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या रॉजर फेडररने आपल्या खेळात सुधारणा करुन आता क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं आहे.
व्हीएस न्यूज - पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वासीम अक्रमने सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा खरा हिरो म्हटले आहे. एका पुस्तक प्रदर्शनाच्या सोहळ्यादरम्यान झालेल्या चर्चेमध्ये अक्रमने सचिनवर स्तुती-सुमने उधळली.‘गल्फ न्युज’वरून या कार्यक्रमातील चर्चेचे प्रेक्षेपण करण्यात आले.
सचिन एक उत्तम खेळाडू तर आहेस शिवाय तो एक महान व्यक्तीही आहे. इतक्या दिर्घ कारकिर्दीमध्ये सचिनचे नाव कोणत्याच वादात आले नसल्याचे कौतूक वाटते असे अक्रम म्हणाला. खेळाच्या मैदानावर आणि बाहेर म्हणजेच‘ऑन अॅण्ड ऑफ द फिल्ड’ सचिन नेहमी क्रिकेटच जगत आला. सचिनच्या रुपात जगाने सर्वात महान खेळाडूचा खेळ पाहिल्याचे समाधान अक्रमने व्यक्त केले.
सचिनबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दलच्या आठवणींनाही अक्रमने यावेळी बोलताना उजाळा दिला. जेव्हा मी सचिनला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच या मुलात काहीतरी खास असल्याचे मला जाणवले. पाकिस्तान विरुद्धच त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याचे खेळण्याचे तंत्र आणि पद्धत पाहून मला आश्चर्य वाटले. त्याच्या आवडत्या लेंथला चेंडू टाकल्यावर तो ज्याप्रकारे चेंडूवर तुटून पडायचा ते पाहून आश्चर्यच वाटायचे असे अक्रमने सांगितले. सचिनच्या पदार्पणात मला वाटलेली शक्यता त्याने खरी करुन दाखवली आणि विशेष म्हणजे मी त्याची प्रत्येक झेप पाहिली आहे. त्याचे आवडते फटके खेळताना मी त्याला मैदानात पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शकत साजरे करुन तो क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या पंक्तीमध्ये सामिल झाल्याचे अक्रम म्हणाला.
अक्रमने भारताचे आघाडीचे माजी फलंदाज सुनिल गावस्कर यांचीही भरभरून स्तृती केली. मी अनेक महान फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. मात्र भारताच्या सर्वोत्तम आघाडीच्या फलंदाजांपैकी एक असणाऱ्या सुनिल गावस्कर यांची विकेट माझ्यासाठी नेहमीच खास राहील. आजच्या खेळाडूंना फलंदाजी कशी करावी हे शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी गावस्करांची फलंदाजी नक्की पहावी. हेल्मेट न घालता फलंदाजी करणारा हा फलंदाज कायमच अव्वल राहिल्याचे विशेष कौतूक वाटते असेही अक्रम म्हणाला.
कोहली सध्याचा सर्वोत्तम खेळाडू
तीनही प्रकराच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा संभाळणाऱ्या विराट कोहलीला अक्रमने सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये अत्तापर्यंत ३२ शतके केली आहे. त्यातील अनेक शतके ही प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना म्हणजे दुसऱ्या डावात झळकवली आहेत यावरूनच कोहलीचा दर्जा कळून येतो असे अक्रम म्हणाला.
व्हीएस न्यूज - जपानमध्ये महिलांच्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत चीनवर मात करुन विजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आधीच्या क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेला भारतीय महिलांचा संघ आता १० व्या क्रमांकावर आलेला आहे. भारताच्या पुढे कोरिया आणि स्पेन हे दोन मातब्बर संघ आहेत.
या यादीत नेदरलँडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे इंग्लंड आणि अर्जेंटीनाचा संघ आहे. या क्रमवारीत अमेरिकेच्या स्थानात घसरण झाली असून, हा संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या क्रमवारीत चौथं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंड आणि जर्मनीचा महिला संघ हा अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिलेला आहे.
चिलीने या क्रमवारीत आपल्या कामगिरीत सुधारणा करत २० व्या स्थानावरुन थेट १५ वं स्थान मिळवलं आहे. पॅन अमेरिकन चषकात रौप्यपदक मिळवल्याचा चिलीच्या संघाला फायदा झाल्याचं दिसून येतंय. चिली व्यतिरीक्त चेक रिपब्लीक (१९ वं स्थान) आणि सिंगापूर (३५ वं स्थान) यांच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली पहायला मिळते आहे. भारतीय पुरुषांचा हॉकीसंघ क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर कायम आहे.
व्हीएस न्यूज - पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लढतीत भारताने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वर्चस्व राखले. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटविश्व आतुर असेल. दुसऱ्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघ व्यवस्थापनाने सहाव्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते; पण तरीही धोनीने आक्रमक फटकेबाजी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे भारताला जर हा निर्णायक सामना जिंकायचा असेल तर भारताला धोनीच्या फलंदाजी स्थानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे; पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात असून या सामन्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका सध्याच्या घडीला १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जो जिंकेल त्यांना मालिका खिशात टाकता येईल. गेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रो आणि ट्रेंट बोल्ट यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताकडूनही चांगला प्रतिकार झाला असला तरी त्यांना न्यूझीलंडचे आव्हान गाठता आले नव्हते.
दुसऱ्या सामन्यात कोहलीने अर्धशतकी खेळी साकारली होती, तर धोनीनेही त्याला आक्रमक खेळी साकारत चांगली साथ दिली होती; पण या आजी-माजी कर्णधारांना संघाला विजय मिळवून देता आला नव्हता. रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पंडय़ा हे बिनीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला हा सामना जिंकायचा असेल तर संघाला फलंदाजीवर अधिक भर द्यावा लागेल. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या बोल्टचा सामना कसा करायचा,याची रणनीतीही त्यांना आखावी लागेल. भारताच्या गोलंदाजांनी सातत्यपूर्ण चांगला मारा केला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा संघाला असेल.
बोल्ट हा न्यूझीलंडच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. भारताच्या आतापर्यंतच्या दौऱ्यात बोल्टने सातत्यपणे भेदक मारा केला आहे. बोल्ट चांगला मारा करत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळताना दिसलेली नाही. जर दुसऱ्या टोकाकडून त्याला चांगली साथ मिळाली तर हा सामना न्यूझीलंडला जिंकता येऊ शकतो. गेल्या सामन्यात मुन्रोने दमदार शतक झळकावले होते, त्यामुळे या सामन्यात तो कशी फलंदाजी करतो, यावर साऱ्यांचे लक्ष असेल. मुन्रोबरोबरच मार्टिन गप्तिलही चांगल्या फॉर्मात आला आहे. आतापर्यंत गप्तिलला मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.
संघ -
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, लोकेश राहुल.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रँडहोमी, मार्टिन गप्तिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, अॅडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी.
सामन्याची वेळ : सायं. ७ वा.पासून.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.
व्हीएस न्यूज - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सन याच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक फासे भारताच्या बाजूने पडले. रोहित-धवन यांनी विक्रमी सलामी दिली. त्यामुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 202 धावसंख्या उभारली. किवींसाठी हे आव्हान आवाक्याबाहेरचे ठरले. त्यांना आठ बाद 149 इतकीच मजल मारता आली. धवन-रोहितने158 धावांची सलामी दिली. ही कोणत्याही विकेटसाठी भारतातर्फे विक्रमी भागीदारी ठरली. यापूर्वी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट-रोहित यांनी 138 धावांची भागीदारी रचली होती. अंतिम टप्यात विराट आणि धोनी यांनी टोलेबाजी करीत भारताला द्विशतकी टप्पा पार करून दिला. रोहितला 16 धावांवर जीवदान मिळाले. त्याने मिचेल सॅंटनरला षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. धवनलाही जीवदान मिळाले.
नेहराला बहुमान…
दिल्ली-जिल्हा क्रिकेट संघटनेने (डीडीसीए) नेहराला अनोखी मानवंदना दिली. फिरोजशाह कोटला मैदानाच्या एका बाजूला आशिष नेहरा एन्ड असे नाव देण्यात आले. हा एन्ड पूर्वी डॉ. आंबेडकर स्टेडियम या नावाने ओळखला जात होता. मंगळवारी गेट क्रमांक दोनला वीरेंद्र सेहवागचे नाव देण्यात आले होते.
संक्षिप्त धावफलक…
भारत - 20 षटकांत 3 बाद 202 (रोहित शर्मा 80-55 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, शिखर धवन 80- 52 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, विराट कोहली नाबाद 26-11 चेंडू, 3 षटकार, धोनी नाबाद 7-2 चेंडू, 1 षटकार, ट्रेंट बोल्ट 4-0-49-1, टीम साऊदी 4-0-44-0, ईश सोधी 4-0-25-2)वि.वि. न्यूझीलंड ः 20 षटकांत 8 बाद 149 (मार्टिन गुप्तिल 4, केन विल्यम्सन 28-24 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, टॉम लॅथम 39-36 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, मिचेल सॅंटनर 27-14 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, आशिष नेहरा 4-0-29-0, युजवेंद्र चहल 4-0-26-2, अक्षर पटेल 4-0-20-2)
अय्यरचे पदार्पण, नेहराचा अलविदा….
या सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. त्याला चार षटकांत एकही विकेट मिळू शकली नाही.
व्हीएस न्यूज - महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग तिसरा विजय नोंदवत गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिलांनी मलेशियाच्या संघावर २-० ने मात केली. याआधी भारतीय संघानी सिंगापूर आणि चीनला पराभवाचा धक्का दिला आहे. ९ गुणांसह भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
सिंगापूर आणि चीनविरुद्ध सामन्याच्या तुलनेत मलेशियाच्या संघाने आज भारतीय महिलांना चांगलच झुंजवलं. अखेर वंदना कटारिया (५४ वे मिनीट) आणि गुरजित कौर (५५ वे मिनीट) यांनी लागोपाठ गोल करत भारताचा विजय सुनिश्चीत केला. पहिल्या सत्रात मलेशिया आणि भारताने बचावात्मक खेळ केल्यामुळे गोलपोस्ट रिकामीच राहिली. दुसऱ्या सत्रात मलेशियाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची सुरेख संधी चालून आली होती. मात्र भारतीय बचावपटूंनी मलेशियाचे प्रयत्न हाणून पाडले. यानंतरत मध्यांतरानंतरच्या सत्रातही दोनही संघाकडून गोल करण्याचे जोरदार प्रयत्न झाले, मात्र कोणत्याही संघाला यात यश आलं नाही.
हा सामना बरोबरीत सुटणार असं वाटत असतानाच, वंदना कटारियाने मैदानी गोल करत भारताचं खातं उघडलं. यापाठोपाठ गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नवर गोल करत पाठोपाठ भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर सामना संपण्याच्या वेळेस मलेशियाच्या खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय खेळाडूंचा बचाव भेदणं त्यांना जमलं नाही.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002