व्हीएस न्यूज - जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे निर्णायक षटकांत अचूक मारा करणारे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे मत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले. ‘बुमराह आणि भुवनेश्वरच्या रूपाने आमच्याकडे दोन सवरेत्कृष्ट गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली भेदक गोलंदाजी पाहता दोघांचेही कौतुक करायला हवे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत आहे, त्यांच्याकडे बरेच आक्रमक फलंदाज आहेत. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यामुळे भारताला मोठय़ा फरकाने मालिका जिंकण्यात यश आले. न्यूझीलंडविरुद्धही भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. ग्रीन पार्क खेळपट्टीवर रविवारी ४ षटकांत ३५ धावा करणे, शक्य होते. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने अचूक मारा करताना किवींना विजयापासून रोखले. केवळ न्यूझीलंडविरुद्ध नाही तर मागील काही सामन्यांत दडपण असूनही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना विजयात मोलाचे योगदान दिले आहे,’’ असे रोहितने सांगितले.
कानपूरमधील तिसरी एकदिवसीय लढत जिंकून भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली.‘मुंबईतील पहिल्या वनडेत आम्हाला २०-२५ धावा कमी पडल्या. मात्र मागील दोन्ही वनडेत खेळ उंचावला. पिछाडी भरून काढताना क्रिकेटपटूंनी दाखवलेली जिगर उल्लेखनीय आहे,’ असे रोहितने सांगितले.
व्हीएस न्यूज - सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकानंतर अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला ६ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिका २-० अशी खिशात घातली. भारताने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीर कॉलिन मुन्रो (७५) आणि कर्णधार केन विल्यमसन (६४) धावांच्या दमदार खेळीनंतर लॅथमने न्यूझीलंडच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, सामना रंगतदार स्थितीत असताना बुमराहाच्या गोलंदाजीवर तोधावबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडला निर्धारित ५० षटकात ७ बाद ३३१ धावांपर्यंत मजल मारता आली. मालिकेतील विजयाने भारताने सलग सात द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शतकाच्या जोरावर भारताने पाहुण्या न्यूझीलंडसमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्ण घेतला. त्यानंतर सातव्या षटकात शिखर धवनला बाद करत त्यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, रोहित शर्मा (१४७) आणि विराट कोहली (११३) यांना रोखण्यात न्यूझीलंड गोलंदाज अपयशी ठरले. परिणामी निर्धारित ५० षटकात भारताने ६ बाद ३३७ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या ४२ व्या षटकात १४७ धावावर खेळत असलेल्या रोहित शर्माला मिचेल सँटनरने बाद केले. त्यानंतर सँटनरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात पांड्या अवघ्या ८ धावांवर बाद झाला. साऊदीने विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवत चौथा धक्का दिला. न्यूझीलंड गोलंदाज अखेरच्या षटकात भारताला लागोपाठ धक्के देत असताना महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर धोनीही बाद झाला. त्याने १७ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. केदार जाधवने १० चेंडूत १८ तर दिनेश कार्तिकने ३ चेंडूत नाबाद ४ धावा केल्या.
व्हीएस न्यूज - कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर खेळवल्या गेलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ धावांनी मात करुन, २-१ या फरकाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारताने न्यूझीलंडलाही घरच्या मैदानावर पुन्हा एकदा पराभवाचं पाणी पाजलं. कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मांनी शतकी खेळी करुन भारताला ३३७ धावांपर्यंत मजल मारुन दिली.
भारताने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना कॉलिन मुनरो आणि कर्णधार केन विलियमसनने न्यूझीलंडला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संकटात सापडला. यावेळी पहिल्या सामन्यातील शतकवीर टॉम लॅथमने रॉस टेलर आणि हेन्री निकोलस या खेळाडूंसोबत छोट्या भागीदाऱ्या रचून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान या सामन्यात भारतीय खेळाडूंनी तब्बल १७ विक्रमांची नोंद केली.
१ – या वर्षात २ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.
२- कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वात जलद ५ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. ९३ डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली आहे.
३- वन-डे सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात ९ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरलाय. विराटने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सचा विक्रम मोडला. डिव्हीलियर्सने २०५ डावांमध्ये ९ हजार धावा काढल्या होत्या, तर विराट कोहलीने हा टप्पा केवळ १९४ धावांमध्ये पूर्ण केला आहे.
४ – एका वर्षात २ हजार पेक्षा जास्त धावा करण्याची विराट कोहलीची ही दुसरी वेळ ठरली.
५ – विराट कोहलीपाठोपाठ २०१७ या वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरला.
६ – वन-डे क्रिकेट सामन्यात सर्वात जलद १५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरलाय. १६५ डावांमध्ये रोहितने ही किमया साधली आहे.
७ – मार्टीन गप्टीलला बाद करत जसप्रीत बुमराहने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ५० वा बळी टिपला. केवळ २८ सामन्यांमध्ये बुमराहने ही कामगिरी केली आहे. अजित आगरकरनंतर सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. अजित आगरकरने आपल्या २३ व्या सामन्यात ५० वा बळी टिपला होता.
७ – विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये ४ द्विशतकी भागीदाऱ्या जमा आहेत.
८ – वन-डे क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय खेळाडू ठरला.
९ – एका कॅलेंडर वर्षात कर्णधार या नात्याने ६ शतकं झळकावणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे.
१० – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सातवी द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकली. सर्वात जास्त मालिका कर्णधार म्हणून जिंकण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर जमा झालाय.
११ – भारताची सलामीची जोडी कालच्या सामन्यात ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्यासाठी १० वेळा अपयशी ठरली.
१२- विराट कोहलीने आतापर्यंत २०० वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. आपल्या संघाचं सर्वाधीकवेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीचा समावेश.
१३ – विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये १२ शतकी भागीदाऱ्या जमा आहेत.
१४ – कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं कालच्या सामन्यात १३ वं अर्धशतक. सर्वाधीक अर्धशतकं झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटला दुसरं स्थान.
१५ – घरच्या मैदानावरचं विराट कोहलीचं हे १४ वं शतक ठरलं. या यादीत सचिन तेंडुलकर विराट कोहलीच्या पुढे आहे, सचिनच्या नावावर घरच्या मैदानात २० शतकांची नोंद आहे.
१४६० – २०१७ या वर्षात विराट कोहलीने आतापर्यंत १४६० धावा काढल्या आहेत. एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधीक धावा काढणाचा, ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटींगचा विक्रम विराटने मोडला. रिकी पाँटींगने २
व्हीएस न्यूज - न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या श्रेयस अय्यरने रणजी सामन्यात सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. रणजी सामन्यात मुंबईकडून खेळणाऱ्या श्रेयसने तामिळनाडूविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने २१ वर्षापूर्वी केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यातील अपयशानंतर रणजी सामन्यात त्याने पुन्हा एकदा धमाका केला. वांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानात मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयसने १२४ चेंडूत १३८ धावांची दमदार खेळी केली. चांगल्या लयीत खेळत असताना तो धावबाद झाला. धावबाद झाल्यामुळे मोठा विक्रम करण्याची अय्यरची संधी हुकली असली तरी रणजीच्या इतिहासात मुंबईकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या सचिनच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने १९९६ मध्ये रणजी सामन्यात एका डावात ९ षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता.
रणजी सामन्यात मुंबईकडून सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा माजी क्रिकेटर आणि भारताचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावे आहे. त्यांनी १९८५ मध्ये बडोद्याविरुद्धच्या सामन्यात १२३ चेंडूत नाबाद २०० धावांची खेळी केली होती. यात त्यांनी १३ षटकार मारले होते. याच सामन्यात शास्त्रींनी एका षटकात सहा षटकार खेचले होते. भारत- न्यूझीलंड यांच्यात १ नोव्हेंबरला दिल्लीत, ४ नोव्हेंबरला राजकोटमध्ये आणि ७ नोव्हेंबरला थिरुवनंतपूरला टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. रणजीतील वादळी खेळी श्रेयसला या सामन्यात टीम इलेव्हनमध्ये स्थान देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
व्हीएस न्यूज – स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षांच्या बंदीचा काळ सरल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आयपीएलच्या ११ व्या हंगामात पुनरागमनासाठी सज्ज झालेले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आपल्या नावावर लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी राजस्थानच्या संघाने कंबर कसलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या नावातील राजस्थान हा शब्द वगळला असून यापुढे हा संघ केवळ रॉयल्स या नावाने ओळखला जाणार आहे. याचसोबत राजस्थानच्या संघव्यवस्थापनाने आपला तळ राजस्थानवरुन पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या बदलांना मान्यता दिल्याचंही समजतंय.
याशिवाय चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक आणि इंडियन सिमेंट कंपनीचे सर्वेसर्वा एन.श्रीनीवासन यांनी आपल्या मालकीचे समभाग कंपनीतल्या इतर भागधारकांच्या नावावर केले आहेत. २०१५ साली गाजलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा आणि एन. श्रीनीवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन हे दोषी आढळले होते. यानंतर बीसीसीआयने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती मुकुल मुदगल समितीने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घातली होती. दरम्यानच्या काळात बीसीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टीस लोढा समितीने गुरुनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा यांना भारतीय क्रिकेटमधून बेदखल करण्याची शिक्षा सुनावली होती.
पुणे सुपरजाएंट संघाचे मालक संजीव गोएंका यांच्याशी झालेल्या करारानुसार राजस्थान संघ व्यवस्थापनाने आपल्या नावातील राजस्थान हा शब्द वगळून केवळ रॉयल्स हा शब्द ठेवल्याचं समजतंय. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत पुण्याच्या संघात चेन्नईच्या अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्यामुळे नवीन हंगामासाठी केलेला हा बदल चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांसाठी किती फायदेशीर ठरतो हे पहावं लागणार आहे.
व्हीएस न्यूज - कोलकात्यात १६ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या जागी कर्णधारपदी रोहित शर्माची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. करीयरच्या महत्वाच्या टप्प्यावर असलेला विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. परंतू विराट काही दिवसांसाठी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ३१ वे शतक झळकवून विराटने सर्वाधिक शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र विराटला काही दिवसांसाठी क्रिकेटमधून ब्रेक हवा आहे. तसे त्याने बीसीसीआयला कळवले आहे. विराटने खासगी कारणांसाठी विश्रांती मागितली असल्याने पुन्हा एकदा त्याच्या आणि अनुष्काच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान विराट सुट्टीवर गेल्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी लागू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी कर्णधारपदी रोहितची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने मुंबईकर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीसाठी रहाणेला कर्णधारपद मिळू शकते. बीसीसीआयने दोन कसोटींसाठी संघ निवडला आहे. विराट तिस-या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे.
विराटच्या जागी रोहितची निवड करण्यामागे फॉर्म किंवा लीडरशीप क्वालिटी याचा काहीही संबंध नाही. फक्त भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता तात्पुरत्या स्वरुपाचा हा बदल केला जाऊ शकतो.
विराटच्या सुट्टी अर्जाबाबत नेमके कारण समोर अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मात्र, डिसेंबर महिन्यात विराटला अनुष्कासोबत लग्न करायचे असल्याने त्याने बोर्डाकडे सुट्टीची मागणी केली आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर दुसरीकडे जानेवारी २०१८ला टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वीच विराट-अनुष्काला लग्नगाठ बांधायची असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
कोहलीची विश्रांती लांबवली-
संघ निवडीआधी कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती मिळणार असल्याची मोठी चर्चा रंगली होती. मात्र, कोहलीने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका आणि लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यादरम्यान ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता व नागपूर येथे खेळविण्यात येतील. त्याचवेळी, कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये कोहलीला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, यानंतर होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खडतर दौ-यासाठी कोहली तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.
व्हीएस न्यूज - कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये काही अमुलाग्र बदल करत आयसीसीने काही दिवसांपूर्वी कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेत आयसीसीशी संलग्न असलेल्या प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सामने खेळायचे आहेत. २०१९ च्या विश्वचषकानंतर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेत सहभागी होण्याआधी आयसीसीवर दबावतंत्र टाकायला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने द्विपक्षीय कराराचं पालन केलं तरच आम्ही आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेत भाग घेऊ असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
” जोपर्यंत बीसीसीआय आमच्यात झालेल्या कराराचं पालन करत नाही, तोपर्यंत आम्ही वन-डे लीग आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या करणार नाही. या कराराचं पालन झालं तरच पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवेल”,असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
जर भारत-पाक सामन्यांशिवाय आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेला महत्व प्राप्त होणार नाही. प्रत्येक क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयसीसीच्या करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. मात्र २०१४ साली बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या कराराचं बीसीसीआय पालन करत नाही. तोपर्यंत पाकिस्तान आयसीसीच्या करारावर स्वाक्षऱ्या करणार नाही असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलाय.
२०१४ साली भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारानूसार दोन्ही संघाना २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळणं अनिवार्य होतं. मात्र पाकिस्तानकडून सतत होणारे अतिरेकी हल्ले पाहता, भारताने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे क्रीडासंबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारत-पाक क्रिकेट सामन्यांचं घोंगड हे भिजत पडलंय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या भूमिकेवर आयसीसी काय निर्णय घेतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
व्हीएस न्यूज - भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा सामना करणे आम्हाला आव्हानात्मक ठरेल, अशी कबुली न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने रविवारी दिली.
‘‘कुलदीप आणि चहल हे दोघेही गुणी गोलंदाज आहेत. आयपीएलमध्ये त्यांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता भारताचे प्रतिनिधित्व करताना चांगले यश मिळवले आहे. त्यामुळेच त्यांच्या गोलंदाजीचा सामना करणे आम्हाला आव्हानात्मक ठरेल,’’ असे विल्यमसनने सांगितले.
‘‘मुळात ‘चायनामन’ गोलंदाज हे क्रिकेटमध्ये कमी घडतात. परंतु या गोलंदाजांनी उत्तम यश मिळवले आहे. कुलदीप आणि चहल हे दोघेही कौशल्यापूर्ण गोलंदाजी करतात. मात्र वातावरण आणि खेळपट्टीचा अचूक अंदाज घेऊन त्यानुसार गोलंदाजी करणे महत्त्वाचे असते,’’ असे विल्यमसन म्हणाला.
आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातून अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे कुलदीप,चहल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यावर भारताच्या फिरकीची धुरा आहे. याबाबत विचारले असताना विल्यमसन म्हणाला, ‘‘भारताकडे अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे अश्विन-जडेजा यांना कदाचित विश्रांती दिली असावी. क्रिकेटच्या हंगामात बरेचसे सामने खेळायचे असतात. त्यामुळे आम्हीसुद्धा खेळाडूंचे अशा प्रकारे व्यवस्थापन करतो. प्रत्येक खेळाडूला क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळणे आता शक्य नाही. कारण आता वर्षभर क्रिकेटची रेलचेल असते.’’
न्यूझीलंडच्या बऱ्याचशा फलंदाजांनी आयपीएलमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीचा सामना केला आहे. यापैकी काही जण त्याच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाकडूनच खेळतात. त्यामुळे त्यांना कुलदीपच्या गोलंदाजीची चांगली माहिती आहे. – माइक हेसन, न्यूझीलंडचे प्रशिक्षक
व्हीएस न्यूज - WWE (वर्ल्ड रेसलिंग इन्टरटेंनमेंट) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच द ग्रेट खली या भारतीय पैलवानाचं नाव येते. खलीनंतर जिंदर महलनेही WWEमध्ये नाव कमावलं. आता यांच्याबरोबरीने पॉवरलिफ्टर चॅम्पियन कविता देवी ही WWEच्या रिंगणात उतरणार आहे. तिने नुकतेच यासंबंधी WWE बरोबर करार केला आहे. कविता देवी WWEमधील पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. जिंदर महलनेच यासंबंधीची माहिती आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान दिली.
मुळची हरयाणाची असलेल्या कविताने रेसलिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण द ग्रेट खली (दलीपसिंग राणा) याच्या पंजाबमधील अॅकडमीमध्ये पूर्ण केले आहे. महिला कुस्तीपटू बी बी बुल बुल विरूद्ध लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कविता देवी कमालीची लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे कविता देवीने २०१६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
कविता देवीने यापूर्वी महिलांच्या मई यंग क्लासिक टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यापासून WWEच्या ओरलँडो येथील परफॉर्मन्स सेंटरमध्ये तिच्या प्रशिक्षणास सुरूवात होईल. WWEमध्ये सहभागी होणारी भारताची पहिली महिला खेळाडू होणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे कविता देवीने म्हटले आहे. मई यंग या जागतिक स्पर्धेत सहभाग नोंदवल्याचा मोठा फायदा झाला. जागतिक दर्जाच्या महिला रेसलरचा यात समावेश होता. माझ“यासाठी ही स्पर्धा अनुभव देणारी ठरली. आता WWE च्या महिला चॅम्पियनशीपचं जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्याची मला संधी आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.
जिंदर महलने कविताला शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, कविता WWEमध्ये येणे हे गौरवास्पद आहे. भारताची पहिला महिला WWE स्टार होण्याची तिला संधी आहे. भारतीय युवकांची ती प्रेरणास्थान ठरेल. तिच्या कारकिर्दीस शुभेच्छा. त्याचबरोबर WWE ने आणखी एका महिला खेळाडूंचा आपल्या चॅम्पियनशीपमध्ये समावेश केला आहे. जॉर्डनची शादिया बेसिसोबरोबरही त्यांनी करार केला आहे. WWE च्या रिंगणात उतरणारी ती पहिला अरब महिला ठरेल.
व्हीएस न्यूज - भारतीय हॉकी संघात पी. आर. श्रीजेशनंतर गोलकिपरची महत्वाची भूमिका बजावणारा आकाश चिकटे आणि नाशिकचा बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या सर्वोत्तम क्रीडापटूंचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या २३ ऑक्टोबर रोजी बॉम्बे जिमखान्यात सर्व क्रीडापटूंना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
यवतमाळसारख्या छोट्या शहरातून आलेला आकाश चिकटे सध्या पुण्यात वास्तव्याला आहे. २०१६ साली मलेशियात पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आकाशने चमकदार कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. यानंतर आपल्या कामगिरीत सुधारणा करत आकाश सध्या भारतीय हॉकी संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. २२ वर्षीय विदीत गुजराथीने २७०० एलो रेटींग पॉईंट्सचा टप्पा पार करत विक्रम रचला होता. विश्वनाथन आनंद, पेंटला हरिकृष्णन, कृष्णन शशिकरण यांच्यातर ही किमया साधणारा विदीत चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
याशिवाय, मुंबईच्या आदिती धुमातकर हिला सर्वोत्तम महिला क्रीडापटू तर पुण्याचा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक सर्वोत्तम ज्युनिअर क्रीडापटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर कॅरमपटू प्रशांत मोरे, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांनाही क्रीडा संघटनेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.
मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या वार्षिक पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी –
१. सर्वोत्तम क्रीडापटू – विदीत गुजराथी (बुद्धिबळ, नाशिक), आकाश चिकटे (हॉकी, पुणे)
२. सर्वोत्तम महिला क्रीडापटू – आदिती धुमातकर (जलतरण, मुंबई)
३. सर्वोत्तम ज्युनिअर क्रीडापटू – अभिमन्यू पुराणिक (बुद्धिबळ, पुणे)
४. सर्वोत्तम ज्युनिअर महिला क्रीडापटू – रायना सलधाना (जलतरण, मुंबई), दिव्या चितळे (टेबल टेनिस, मुंबई)
५. सर्वोत्तम क्रीडापटू, भारतीय खेळ – प्रशांत मोरे (कॅरम, मुंबई)
६. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू – केदार जाधव
७. सर्वोत्कृष्ट रणजीपटू – अभिषेक नायर (मुंबई)
८. सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू – स्मृती मंधाना (सांगली)
९. सर्वोत्कृष्ट ज्युनिअर क्रिकेटपटू – पृथ्वी शॉ (मुंबई)
१०. सर्वोत्कृष्ट संघ – मुंबई इंडियन्स
११. सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरी – मुंबई सीटी एफसी
१२. सर्वोत्कृष्ट महाविद्यालय – रिझवी कॉलेज, मुंबई
१३. सर्वोत्कृष्ट शाळा – डॉन बॉस्को हायस्कुल, माटुंगा
व्हीएस न्यूज - गेली १८ वर्ष भारतीय गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे बाळगणारा आशिष नेहरा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. येत्या १ नोव्हेंबरला आशिष नेहरा न्यूझीलंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळणार आहे. नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.
होय, आशिष नेहराने आपल्या निवृत्तीचा निर्णय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपर्यंत आशिष नेहरा खेळणार होता, मात्र यानंतर आपल्या निवृत्तीसाठी हीच वेळ योग्य असल्याचं बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणलं आहे. आशिष नेहरानंतर भारतीय गोलंदाजीची धुरा ही भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या त्रिकुटावर असणार आहे. याचसोबत आशिषने आगामी आयपीएल हंगामातही न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. २०१७ साली झालेल्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे आशिष नेहरा आयपीएलचे सामने खेळू शकला नव्हता.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानूसार न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर आशिष नेहरा आपल्या निवृत्तीची घोषणा करु शकतो. नेहराने आतापर्यंत १७ कसोटी, १२० वन-डे आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र अनेक वेळा दुखापतीमुळे नेहराला संघाबाहेर बसावं लागलं होतं. आपल्या १८ वर्षांच्या कालावधीत आशिष नेहराने भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली आहे. विशेषकरुन टी-२० सामन्यांमध्ये नवीन चेंडु हाताळण्याची आशिष नेहराची हातोटी वाखणण्याजोगी आहे. याच कारणासाठी निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आशिष नेहराला संघात जागा दिली आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात नेहराला संघात जागा मिळाली नव्हती.
व्हीएस न्यूज - भारताने पहिला टी-20 सामना सहज जिंकत आपले वर्चस्व कायम राखले. आता उभय संघांमध्ये आज होणाऱ्या दुसरा टी-20 सामना जिंकून झटपट क्रिकेटच्या मालिकेतही विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा 4-1 असा धुव्वा उडविला होता. त्यानंत पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 9 गडी राखून विजयाची नोंद केली होती. हीच विजयमालिका कायम राखण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 14 टी-20 सामन्यांतील 10 सामने जिंकून येथेही आपले वर्चस्व राखले आहे. इतकेच नव्हे तर 28 सप्टेंबर 2012 नंतर टी-20 क्रिकेटमध्ये भारताने कांगारूंविरुद्ध पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. त्यामुळेच उद्याच्या सामन्यात भारताव विजय मिळविण्यासाठी कांगारूंना सर्वोत्तम कामगिरीचीच नोंद करावी लागेल. नियमित कर्णधार स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे उपलब्ध नसताना त त्यांचत्यासाठी ही कामगिरी अधिकच आव्हानात्मक आहे.
भाताला पराभूत करण्करिता ऑस्ट्रेलियाला किमान तीन बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. पहिली म्हणजे त्यांना कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चाहल या रिस्ट स्पिनर्सच्या वैविध्यपूर्ण आणि गूढ गोलंदाजीचे कोडे साडवावे लागेल. या दोघांनी मिळून चार वन डे आणि पहिली टी-20लढत मिळून 16 बळी घेतले आहेत. अनेक ऑसी फलंदाज आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्यांच्यासाठी भातीय हवामान आणि खेळपट्ट्या हे आव्हान राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचे अपयश अधिक आश्चर्यकारक आणि ऑसी संघव्यवस्थापनासाठी चिंताजनक ठरले आहे.
त्याचप्रमाणे स्मिथच्या गैरहजेरीत पहिल्या टी-20 सामन्यात झालेली ऑस्ट्रेलियाची घसगुंडी त्यांच्यावरील दडपण वाढविणारी आहे. या सामन्यात जेमतेम 118 धावांची मजल मारता आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उद्याच्या लढतीत किमान आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल. वॉर्न व मॅक्सवेल अपयशी ठरत असताना केवळ फिंचवर ऑस्ट्रेलियन फलंदाजीची मदार आहे. परंतु सातत्याने फिरकीविरुद्ध अपयशी ठलेल्या मॅक्सवेलला फिंचने पाठिंबा दिला आहे.
भारतीय खेळाडूंना आपली चांगली कामगिरी कायम राखण्याचीच जबाबदारी पार पाडावी लागेल. अश्विन व जडेजाला बाहेर ठेवून कुलदीप व चाहल यांना दिलेल्या संधीचे त्यांनी चीज केले आहे. चाहलने तर चार वेळा मॅक्सवेलला बाद करून भारतासमोरचा मोठाच अडथळा बाजूला केला आहे. टी-20 मालिकेसाठी परतलेला शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्य कामगिरीतील सातत्य कायम राखल्यास भाताला उद्याही विजय मिळविणे अवघड जाऊ नये.
प्रतिस्पर्धी संघ-
भारत– विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चाहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा व महंमद शमी.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅनियल ख्रिस्टियन, नॅथन कूल्टर-नाईल, ऍरॉन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टिम पेने, केन रिचर्डसन, ऍडम झाम्पा, माकर्स स्टॉइनिस व अँड्रयू टाय.
सामन्याचे ठिकाण- गुवाहाटी. सामन्याची वेळ- सायं. 7-00 पासून.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002